मार्कने सांगितलेला संदेश ६:१-५६
६ तिथून निघाल्यावर तो आपल्या गावी आला+ आणि त्याचे शिष्यही त्याच्यामागे आले.
२ मग शब्बाथाच्या दिवशी तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला. तेव्हा ऐकणाऱ्या बऱ्याच जणांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले: “हा माणूस या सगळ्या गोष्टी कुठून शिकला?+ ही बुद्धी आणि चमत्कार* करायची शक्ती याला कोणी दिली?+
३ हाच तो सुतारकाम करणारा+ मरीयाचा मुलगा+ आहे ना? हा याकोब,+ योसेफ, यहूदा आणि शिमोन यांचाच भाऊ आहे ना?+ याच्या बहिणीही इथेच राहत नाहीत का?” म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
४ पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्त त्याच्या स्वतःच्या गावात, नातेवाइकांत आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”+
५ म्हणून, त्याने तिथे फक्त काही आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरं केलं. याशिवाय इतर कोणतेही चमत्कार* तो त्या ठिकाणी करू शकला नाही.
६ खरंतर, त्यांचा अविश्वास पाहून त्याला आश्चर्य वाटलं. मग तो आसपासच्या गावांत फिरून तिथे शिकवू लागला.+
७ त्यानंतर, त्याने त्या १२ जणांना बोलावलं. तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला+ आणि त्याने त्यांना दुष्ट स्वर्गदूत* काढायचा अधिकार दिला.+
८ तसंच, त्याने त्यांना अशी आज्ञा दिली, की त्यांनी प्रवासात आपल्यासोबत एका काठीशिवाय दुसरं काहीही, म्हणजे भाकरी किंवा जेवणाची पिशवी किंवा बटव्यात* पैसे* घेऊ नयेत,+
९ तर पायांत जोडे घालावेत आणि अंगात दोन वस्त्रं घालू नयेत.
१० तसंच तो त्यांना म्हणाला: “कोणत्याही घरात जाल तेव्हा त्या शहरातून निघेपर्यंत तिथेच मुक्काम करा.+
११ एखाद्या ठिकाणी लोकांनी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्यांना साक्ष मिळावी म्हणून तिथून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.”+
१२ तेव्हा ते निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा+ अशी घोषणा करू लागले,
१३ आणि त्यांनी बऱ्याच दुष्ट स्वर्गदूतांना काढलं+ आणि पुष्कळ आजारी लोकांना तेल लावून बरं केलं.
१४ ही गोष्ट हेरोद* राजाच्या कानावर आली, कारण येशूचं नाव खूप प्रसिद्ध झालं होतं आणि लोक म्हणू लागले: “बाप्तिस्मा देणारा योहान मेलेल्यांतून उठलाय, म्हणूनच तो ही अद्भुत कार्यं करतोय.”+
१५ पण काही जण म्हणत होते: “हा एलीया आहे.” तर इतर काही म्हणत होते: “तो जुन्या काळातल्या संदेष्ट्यांपैकी एक आहे.”+
१६ पण हेरोदने हे ऐकलं तेव्हा तो म्हणाला: “ज्या योहानचं मी डोकं कापलं होतं, तोच पुन्हा उठलाय.”
१७ हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्याशी लग्न केलं होतं. आणि तिच्यामुळेच त्याने स्वतः माणसं पाठवून योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबलं होतं.+
१८ कारण योहान त्याला बऱ्याच वेळा म्हणाला होता: “तू आपल्या भावाच्या बायकोला आपली बायको केली हे कायद्याने योग्य नाही.”+
१९ त्यामुळे हेरोदिया मनातल्या मनात त्याचा द्वेष करत होती आणि त्याला मारून टाकायची संधी शोधत होती; पण तिला ते करता आलं नाही.
२० कारण हेरोदच्या मनात योहानबद्दल आदर होता आणि तो त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. योहान एक नीतिमान आणि पवित्र माणूस आहे हे त्याला माहीत होतं.+ योहानने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर काय करावं हे त्याला समजायचं नाही, तरीसुद्धा तो आनंदाने त्याचं ऐकून घ्यायचा.
२१ पण, शेवटी एक दिवशी हेरोदियाला हवी असलेली संधी मिळाली. त्या दिवशी हेरोदचा वाढदिवस+ होता आणि त्याने आपल्या उच्च अधिकाऱ्यांना, सेनापतींना आणि गालीलमधल्या प्रतिष्ठित लोकांना मेजवानी दिली.+
२२ त्या वेळी हेरोदियाची मुलगी नाचली आणि तिने हेरोदला आणि मेजवानीला आलेल्या लोकांना खूश केलं. तेव्हा, राजा तिला म्हणाला: “तुला जे काही हवं असेल ते माग आणि मी तुला ते देईन.”
२३ तो शपथ घेऊन म्हणाला: “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”
२४ म्हणून ती बाहेर आपल्या आईकडे गेली आणि म्हणाली: “मी काय मागू?” तेव्हा ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं.”
२५ त्यामुळे तिने लगेच राजाकडे जाऊन आपली मागणी सांगितली. ती म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं, मला आत्ताच्या आता एका थाळीत आणून दिलं जावं, अशी माझी इच्छा आहे.”+
२६ हे ऐकून राजाला फार वाईट वाटलं. तरीसुद्धा त्याने दिलेल्या शपथांमुळे आणि मेजवानीला आलेल्या लोकांमुळे* त्याला नाही म्हणता आलं नाही.
२७ म्हणून त्याने लगेच एका अंगरक्षकाला पाठवलं आणि त्याला योहानचं डोकं घेऊन येण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्याने तुरुंगात जाऊन योहानचं डोकं कापलं
२८ आणि तो एका थाळीत ते घेऊन आला. त्याने ते मुलीला दिलं आणि मुलीने ते आपल्या आईला दिलं.
२९ योहानच्या शिष्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी येऊन त्याचा मृतदेह घेतला आणि तो एका कबरेत* ठेवला.
३० मग, प्रेषित येशूच्या भोवती जमले आणि त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि लोकांना शिकवल्या होत्या त्यांबद्दल त्याला सांगितलं.+
३१ तिथे बऱ्याच लोकांची ये-जा सुरू असल्यामुळे त्यांना जेवायलासुद्धा वेळ मिळाला नव्हता. म्हणून येशू त्यांना म्हणाला: “एखाद्या एकांत ठिकाणी चला आणि थोडी विश्रांती घ्या.”+
३२ म्हणून ते नावेतून एका एकांत ठिकाणी जायला निघाले.+
३३ पण लोकांनी त्यांना जाताना पाहिलं आणि बऱ्याच जणांना याबद्दल कळलं. तेव्हा, सगळ्या शहरांतून लोक धावत जाऊन त्यांच्याआधीच तिथे पोहोचले.
३४ नावेतून उतरताच लोकांचा मोठा समुदाय पाहून येशूला त्यांचा कळवळा आला,+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.+ मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.+
३५ आता दिवस मावळायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “इथे आसपास कोणीही राहत नाही आणि खूप उशीरही झालाय.+
३६ म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते जवळपासच्या खेड्यापाड्यांत जाऊन खायला काहीतरी विकत घेऊ शकतील.”+
३७ पण तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” तेव्हा ते म्हणाले: “आम्ही जाऊन २०० दिनारांच्या* भाकरी विकत आणून लोकांना खायला देऊ का?”+
३८ तो त्यांना म्हणाला: “जा आणि तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते पाहा.” त्यांनी जाऊन पाहिलं आणि ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासेही आहेत.”+
३९ मग त्याने सगळ्या लोकांना लहानलहान गट करून गवतावर बसायला सांगितलं.+
४० तेव्हा ते शंभर-शंभर आणि पन्नास-पन्नास लोकांचे गट करून बसले.
४१ त्यानंतर त्याने त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेतले आणि वर आकाशाकडे पाहून धन्यवाद दिला.+ मग त्याने भाकरी मोडून लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिल्या. तसंच, त्याने ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले.
४२ मग सगळे पोटभर जेवले
४३ आणि भाकरींच्या उरलेल्या तुकड्यांनी १२ टोपल्या भरल्या, शिवाय मासेही उरले होते.+
४४ त्या दिवशी जेवणाऱ्या पुरुषांची संख्या ५,००० होती.
४५ मग त्याने लगेच आपल्या शिष्यांना नावेत बसून पलीकडे बेथसैदा इथे आपल्यापुढे जायला सांगितलं. आणि तो स्वतः लोकांना निरोप देऊ लागला.+
४६ पण लोकांना पाठवून दिल्यानंतर तो प्रार्थना करायला एका डोंगरावर गेला.+
४७ संध्याकाळ झाली तेव्हा नाव समुद्राच्या मधोमध होती, पण तो अजूनही एकटाच डोंगरावर होता.+
४८ रात्री सुमारे चौथ्या प्रहरी,* वारा विरुद्ध दिशेचा असल्यामुळे शिष्यांना नाव चालवणं खूप अवघड जात आहे असं त्याला दिसलं. तेव्हा तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे येऊ लागला. पण असं वाटत होतं की तो त्यांच्या पुढे जाणार आहे.
४९ त्याला समुद्रावर चालताना पाहून ते मनात म्हणाले, “आपल्याला काहीतरी भास होतोय!” आणि ते मोठ्याने ओरडू लागले.
५० कारण त्याला पाहून ते सगळे घाबरले होते. पण लगेच तो त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “तुम्ही का घाबरता? भिऊ नका, मी आहे.”+
५१ मग तो नावेत त्यांच्याकडे गेला तेव्हा वारा शांत झाला. हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं.
५२ कारण भाकरींच्या चमत्काराचा अर्थ त्यांना कळला नव्हता आणि त्यांचं मन अजूनही अंधारात होतं.
५३ नंतर ते पलीकडे गनेसरेतच्या किनाऱ्यावर आले आणि त्यांनी नाव बांधून ठेवली.+
५४ पण ते नावेतून उतरताच लोकांनी येशूला ओळखलं.
५५ तेव्हा आसपासच्या संपूर्ण भागात लोकांची धावपळ सुरू झाली. जिथे जिथे येशू आला आहे असं त्यांनी ऐकलं, तिथे तिथे ते आजारी लोकांना खाटांवर घेऊन त्याच्याकडे आणू लागले.
५६ तो शहरांत किंवा खेड्यापाड्यांत जिथे कुठे जायचा तिथे ते आजारी लोकांना भर बाजारात आणून ठेवायचे; आणि ‘फक्त तुमच्या कपड्यांच्या काठाला हात लावू द्या,’+ अशी ते त्याला विनंती करायचे. तेव्हा, ज्यांनी ज्यांनी त्याच्या कपड्यांना हात लावला ते सगळे बरे झाले.
तळटीपा
^ किंवा “अद्भुत कार्यं.”
^ किंवा “अद्भुत कार्यं.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तांबं.”
^ कदाचित एक प्रकारचा कमरपट्टा ज्यात पैसे ठेवले जायचे.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “जेवायला बसलेल्या लोकांमुळे.”
^ किंवा “स्मारक कबरेत.”
^ म्हणजे, पहाटे सुमारे ३ वाजेपासून सुमारे ६ वाजता सूर्योदय होईपर्यंत.