मार्कने सांगितलेला संदेश ८:१-३८

  • येशू ४,००० लोकांना जेवू घालतो (१-९)

  • चिन्ह दाखवण्याची मागणी (१०-१३)

  • परूश्‍यांचं आणि हेरोदचं खमीर (१४-२१)

  • बेथसैदामध्ये आंधळ्या माणसाला बरं करणं (२२-२६)

  • येशू हा ख्रिस्त असल्याचं पेत्र ओळखतो (२७-३०)

  • येशू आपल्या मृत्यूबद्दल आधीच सांगतो (३१-३३)

  • येशूचा शिष्य असण्याचा अर्थ (३४-३८)

 त्या दिवसांत, पुन्हा लोकांचा एक मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नव्हतं. म्हणून येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: २  “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही.+ ३  मी जर त्यांना असंच उपाशी घरी पाठवून दिलं, तर वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील. काही जण तर फार दुरून आले आहेत.” ४  पण त्याचे शिष्य त्याला म्हणाले: “लोक पोटभर जेवू शकतील इतक्या भाकरी या एकांत ठिकाणी कुठून आणाव्यात?” ५  तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले: “सात.”+ ६  मग लोकांना खाली बसायला सांगून येशूने त्या सात भाकरी घेतल्या आणि देवाला धन्यवाद देऊन त्या मोडल्या. त्याने त्या शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना वाढल्या.+ ७  त्यांच्याजवळ काही लहान मासेही होते. तेव्हा धन्यवाद देऊन त्याने शिष्यांना तेही वाढायला सांगितले. ८  मग लोक पोटभर जेवले आणि जेव्हा त्यांनी उरलेलं अन्‍न गोळा केलं, तेव्हा सात मोठ्या टोपल्या भरल्या.+ ९  त्या वेळी, जेवणाऱ्‍या पुरुषांची संख्या जवळजवळ ४,००० होती. मग येशूने त्यांना निरोप दिला. १०  त्यानंतर लगेच तो आपल्या शिष्यांसोबत नावेत बसून दल्मनुथाच्या प्रदेशात आला.+ ११  तिथे परूशी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहण्यासाठी, ‘आम्हाला स्वर्गातून एखादं चिन्ह दाखव,’ असं ते म्हणू लागले.+ १२  तेव्हा त्याला मनापासून वाईट वाटलं आणि तो म्हणाला: “ही पिढी चिन्ह का मागत राहते?+ मी तुम्हाला खरं सांगतो, या पिढीला एकही चिन्ह दिलं जाणार नाही.”+ १३  मग तो त्यांना सोडून पुन्हा नावेत बसला आणि पलीकडच्या किनाऱ्‍यावर गेला. १४  पण शिष्य आपल्यासोबत भाकरी घ्यायला विसरले. नावेत त्यांच्याजवळ खायला एका भाकरीशिवाय काहीच नव्हतं.+ १५  येशूने अगदी स्पष्ट शब्दांत त्यांना ताकीद दिली: “जागे राहा. परूशी लोकांच्या आणि हेरोदच्या खमिरापासून* सांभाळा.”+ १६  तेव्हा, भाकरी का घेतल्या नाहीत यावरून ते आपसात वाद घालू लागले. १७  हे ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तुम्ही वाद का घालता? अजूनही तुमच्या लक्षात येत नाही का? अजूनही तुमची मनं अंधारात आहेत का? १८  ‘डोळे असूनही तुम्हाला दिसत नाही का आणि कान असूनही तुम्हाला ऐकू येत नाही का?’ तुम्हाला आठवत नाही का, १९  मी पाच भाकरी+ मोडून ५,००० माणसांना जेवू घातलं, तेव्हा उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या तुम्ही भरल्या होत्या?” ते त्याला म्हणाले: “बारा.”+ २०  “आणि मी सात भाकरी मोडून ४,००० माणसांना जेवू घातलं, तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या* भरल्या होत्या?” ते त्याला म्हणाले: “सात.”+ २१  तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मग अजूनही तुम्हाला समजत नाही का?” २२  त्यानंतर ते बेथसैदा इथे आले. तिथे लोकांनी एका आंधळ्या माणसाला येशूकडे आणलं. त्याने त्याला स्पर्श करावा अशी ते विनंती करू लागले.+ २३  तेव्हा, त्याने त्या आंधळ्या माणसाचा हात धरून त्याला गावाबाहेर नेलं. मग त्याच्या डोळ्यांवर थुंकून+ त्याने त्याच्यावर हात ठेवले आणि तो त्याला म्हणाला: “तुला काही दिसतं का?” २४  तेव्हा तो माणूस समोर पाहून म्हणाला: “मला लोक दिसत आहेत, पण असं वाटतं की झाडं इथेतिथे चालत आहेत.” २५  मग येशूने पुन्हा त्या माणसाच्या डोळ्यांवर हात ठेवले, तेव्हा त्याची दृष्टी परत आली. त्याला सगळं काही अगदी स्पष्ट दिसू लागलं. २६  येशूने त्याला, “या गावात जाऊ नकोस,” असं सांगून घरी पाठवलं. २७  नंतर येशू आणि त्याचे शिष्य कैसरीया फिलिप्पैच्या गावांमध्ये जायला निघाले. वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारलं: “मी कोण आहे असं लोक म्हणतात?”+ २८  ते त्याला म्हणाले: “बाप्तिस्मा देणारा योहान.+ पण काही जण तुला एलीया+ म्हणतात आणि इतर जण तू संदेष्ट्यांपैकी एक आहेस असं म्हणतात.” २९  मग त्याने त्यांना विचारलं: “पण, तुम्हाला काय वाटतं, मी कोण आहे?” तेव्हा पेत्रने उत्तर दिलं: “तू ख्रिस्त आहेस.”+ ३०  पण याबद्दल कोणालाही सांगू नका, असं त्याने त्यांना बजावून सांगितलं.+ ३१  तसंच, मनुष्याच्या मुलाला बरीच दुःखं सोसावी लागतील आणि वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री त्याला नाकारतील आणि ठार मारतील+ आणि तीन दिवसांनंतर तो उठेल, असं तो शिष्यांना सांगू* लागला.+ ३२  खरंतर, तो त्यांना ही गोष्ट अगदी उघडउघड सांगत होता. पण पेत्र त्याला बाजूला घेऊन गेला आणि त्याला रागवू लागला.+ ३३  तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि पेत्रला दटावून म्हटलं: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा!* तुझे विचार देवाचे नाहीत, तर माणसांचे आहेत.”+ ३४  मग आपल्या शिष्यांसोबत लोकांनाही जवळ बोलावून तो म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे चालत राहावं.+ ३५  कारण जो आपला जीव* वाचवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल, पण जो माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी आपला जीव* गमावतो तो त्याला वाचवेल.+ ३६  खरोखर, माणसाने संपूर्ण जग मिळवलं, पण आपला जीव* गमावला तर त्याचा काय उपयोग?+ ३७  किंवा माणूस आपल्या जिवाच्या* मोबदल्यात काय देऊ शकेल?+ ३८  कारण या व्यभिचारी* आणि पापी पिढीत जर कोणाला माझी आणि माझ्या वचनांची लाज वाटत असेल, तर मनुष्याचा मुलगा आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र स्वर्गदूतांसोबत येईल,+ तेव्हा त्यालाही त्या माणसाची लाज वाटेल.”+

तळटीपा

म्हणजे, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “मोठ्या टोपल्या.”
शब्दशः “शिकवू.”
शब्दशः “माझ्या मागे हो.”
किंवा “आपलं जीवन.”
किंवा “आपलं जीवन.”
किंवा “जीवन.”
किंवा “जीवनाच्या.”
किंवा “विश्‍वासघातकी.”