मार्कने सांगितलेला संदेश ९:१-५०

  • येशूचं रूपांतर (१-१३)

  • दुष्ट स्वर्गदूताने पछाडलेल्या मुलाला बरं करतो (१४-२९)

    • विश्‍वास असेल तर सगळं काही शक्य (२३)

  • येशूच्या मृत्यूबद्दल पुन्हा भविष्यवाणी (३०-३२)

  • कोण श्रेष्ठ यावरून शिष्यांमध्ये वाद (३३-३७)

  • जो आपल्या विरोधात नाही तो आपल्या सोबत (३८-४१)

  • अडखळायला लावणाऱ्‍या गोष्टी (४२-४८)

  • “स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा” (४९, ५०)

 मग येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, इथे उभे असलेल्यांपैकी काही जण असे आहेत, की जे देवाच्या राज्याला शासन करत असलेलं जोपर्यंत पाहणार नाहीत, तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”+ २  नंतर, सहा दिवसांनी येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्यासोबत एका उंच डोंगरावर नेलं. तिथे त्यांच्याशिवाय आणखी कोणीही नव्हतं. मग त्यांच्यासमोर त्याचं रूपांतर झालं.+ ३  त्याचे कपडे चमकू लागले आणि कोणत्याही धोब्याला करता येणार नाहीत, इतके ते शुभ्र झाले. ४  तसंच, त्यांना तिथे मोशे आणि एलीया येशूसोबत बोलताना दिसले. ५  मग पेत्र येशूला म्हणाला: “रब्बी,* बरं झालं आम्ही आलो. आम्हाला तीन तंबू टाकू दे; एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.” ६  खरंतर, ते फार घाबरले होते. त्यामुळे, काय बोलावं हे पेत्रला सुचत नव्हतं. ७  तेवढ्यात, एक ढग खाली उतरला आणि त्याने त्यांना झाकून टाकलं. त्या ढगातून असा आवाज ऐकू आला:+ “हा माझा प्रिय मुलगा आहे,+ याचं ऐका.”+ ८  मग अचानक त्यांनी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा तिथे येशूशिवाय त्यांच्यासोबत आणखी कोणीही नव्हतं. ९  नंतर, डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना बजावून सांगितलं, की मनुष्याच्या मुलाला मेलेल्यांतून उठवलं जात नाही, तोपर्यंत त्यांनी जे पाहिलं त्याबद्दल कोणालाही सांगू नये.+ १०  त्यांनी येशूचं बोलणं मनावर घेतलं,* पण त्याच्या मेलेल्यांतून उठण्याचा काय अर्थ असेल याबद्दल ते आपसात चर्चा करू लागले. ११  त्यांनी त्याला विचारलं: “शास्त्री असं का म्हणतात की आधी एलीया+ आला पाहिजे?”+ १२  येशू त्यांना म्हणाला: “एलीया खरोखरच आधी येईल आणि तो सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या व्यवस्थित करेल.+ पण मनुष्याच्या मुलाबद्दल असं का लिहिलंय, की त्याला बरीच दुःखं सहन करावी लागतील+ आणि त्याला तुच्छ लेखलं जाईल?+ १३  मी तर तुम्हाला सांगतो, की एलीया+ आधीच आलाय आणि त्याच्याबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे, त्यांनी त्याच्यासोबत वाटेल तसं केलं.”+ १४  मग ते इतर शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांच्याभोवती लोकांचा मोठा समुदाय जमला आहे आणि शास्त्री त्यांच्यासोबत वाद घालत आहेत.+ १५  पण येशूला पाहताच सगळे लोक आश्‍चर्यचकित झाले आणि त्याला भेटायला धावत गेले. १६  तेव्हा त्याने त्यांना विचारलं: “तुम्ही त्यांच्याशी कशाबद्दल वाद घालताय?” १७  यावर गर्दीतल्या एकाने उत्तर दिलं: “गुरू, माझ्या मुलामध्ये एक मुका दुष्ट स्वर्गदूत* आहे, म्हणून मी त्याला तुमच्याकडे आणलं.+ १८  तो जेव्हा जेव्हा माझ्या मुलाला धरतो तेव्हा तेव्हा त्याला जमिनीवर आपटतो. मग माझ्या मुलाच्या तोंडातून फेस निघू लागतो, तो दात खाऊ लागतो आणि अगदी गळून जातो. त्या दुष्ट स्वर्गदूताला काढून टाकायची मी तुमच्या शिष्यांना विनंती केली, पण त्यांना ते करता आलं नाही.” १९  तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? त्याला इथे माझ्याजवळ आणा.”+ २०  त्यांनी मुलाला त्याच्याजवळ आणलं, पण त्याला पाहताच तो दुष्ट स्वर्गदूत मुलाच्या शरीराला पिळवटू लागला. तेव्हा मुलगा जमिनीवर पडला आणि लोळू लागला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. २१  मग येशूने त्याच्या वडिलांना विचारलं: “याला असं केव्हापासून होतंय?” तो म्हणाला: “लहानपणापासून. २२  आणि बऱ्‍याच वेळा हा दुष्ट स्वर्गदूत त्याला आगीत आणि पाण्यात टाकून त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला काही करता आलं, तर कृपा करून आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” २३  येशू त्याला म्हणाला: “‘काही करता आलं तर,’ असं का म्हणतोस? ज्याला विश्‍वास आहे त्याला सगळं काही शक्य आहे.”+ २४  तेव्हा लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले: “मला विश्‍वास आहे! तो आणखी दृढ करायला मला मदत करा!”+ २५  येशूने लोकांना त्यांच्याकडे धावत येताना पाहिलं, तेव्हा तो त्या दुष्ट स्वर्गदूताला दटावून म्हणाला: “अरे मुक्या आणि बहिऱ्‍या दुष्ट स्वर्गदूता! मी तुला आज्ञा देतो, की त्याच्यातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीच त्याच्यात जाऊ नकोस!”+ २६  मग तो दुष्ट स्वर्गदूत मोठ्याने ओरडून आणि मुलाच्या शरीराला बऱ्‍याच वेळा पिळवटून त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा मुलगा मेलेल्या माणसासारखा जमिनीवर पडून राहिला. त्यामुळे बरेच लोक म्हणू लागले: “मेला तो!” २७  पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठवलं तेव्हा तो उठून उभा राहिला. २८  नंतर तो एका घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांतात विचारलं: “आम्ही त्याला का काढू शकलो नाही?”+ २९  तो त्यांना म्हणाला: “अशा प्रकारचे दुष्ट स्वर्गदूत फक्‍त प्रार्थनेनेच निघू शकतात.” ३०  मग ते तिथून निघून गालीलमधून जात होते, पण कोणालाही याबद्दल कळू नये अशी त्याची इच्छा होती. ३१  कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता आणि असं सांगत होता, की “मनुष्याच्या मुलाचा विश्‍वासघात करून त्याला लोकांच्या हवाली केलं जाईल आणि ते त्याला ठार मारतील.+ पण, त्याला मारल्यानंतर तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.”+ ३२  त्यांना त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण याबद्दल त्याला विचारायचं त्यांना धैर्यही झालं नाही. ३३  मग ते कफर्णहूम इथे आले आणि घरात गेल्यानंतर त्याने त्यांना विचारलं: “रस्त्यात तुम्ही कशाबद्दल वाद घालत होता?”+ ३४  पण ते शांतच राहिले, कारण आपल्यापैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल ते वाद घालत होते. ३५  तेव्हा खाली बसून त्याने १२ शिष्यांना जवळ बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “ज्याला तुमच्यामध्ये पहिला व्हायचं असेल, त्याने सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यांचा सेवक झालं पाहिजे.”+ ३६  मग त्याने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला त्यांच्यामध्ये उभं केलं. त्याच्या खांद्यांवर हात ठेवून तो त्यांना म्हणाला: ३७  “जो अशा एखाद्या लहान मुलाला+ माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो, तो फक्‍त मलाच नाही, तर ज्याने मला पाठवलं त्यालाही स्वीकारतो.”+ ३८  योहान त्याला म्हणाला: “प्रभू, आम्ही एकाला तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढताना पाहिलं आणि आम्ही त्याला अडवायचा प्रयत्न केला कारण तो तुझ्यामागे चालत नाही.”+ ३९  पण येशू म्हणाला: “त्याला अडवायचा प्रयत्न करू नका, कारण असा कोणीही नाही जो माझ्या नावाने अद्‌भुत कार्य करेल आणि नंतर लगेच माझी निंदा करेल. ४०  कारण जो आपल्या विरोधात नाही तो आपल्या सोबत आहे.+ ४१  मी तुम्हाला खरं सांगतो, की तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहात हे ओळखून जो तुम्हाला पेलाभर पाणी प्यायला देईल,+ त्याला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.+ ४२  पण माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो, त्याच्या गळ्यात जात्याचा मोठा दगड* बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं, तर तेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+ ४३  जर तुझा हात तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून टाक. दोन हातांसोबत गेहेन्‍नात,* म्हणजे विझवता न येणाऱ्‍या आगीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू होऊन जीवनात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ४४ *​—— ४५  आणि जर तुझा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून टाक. दोन पायांसोबत गेहेन्‍नात टाकलं जाण्यापेक्षा, लंगडं होऊन जीवनात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.+ ४६ *​—— ४७  तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो काढून फेकून दे.+ कारण एकच डोळा असून देवाच्या राज्यात* जाणं तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे, नाहीतर दोन डोळे असून तुला गेहेन्‍नाच्या* आगीत टाकलं जाईल.+ ४८  तिथे किडे कधी मरत नाहीत आणि आग कधी विझत नाही.+ ४९  जेवणात वरून मीठ टाकतात, तसा प्रत्येक माणसावर अग्नीचा वर्षाव केला जाईल.+ ५०  मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+

तळटीपा

किंवा “गुरू.”
किंवा कदाचित, “ही गोष्ट आपल्यातच ठेवली.”
किंवा “गाढव ओढतं तसा जात्याचा दगड.”
किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”
अति. क३ पाहा.
किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”
अति. क३ पाहा.
किंवा “सर्वकाळाच्या जीवनात.”