यशया १३:१-२२

  • बाबेलविषयी न्यायाचा संदेश (१-२२)

    • यहोवाचा दिवस जवळ आहे! ()

    • मेदचे लोक बाबेलला उलथवून टाकतील (१७)

    • बाबेलमध्ये कधीही लोकवस्ती होणार नाही (२०)

१३  आमोजचा मुलगा यशया+ याने एक दृष्टान्त पाहिला; त्यात बाबेलविषयी न्यायाचा संदेश देण्यात आला होता.+ तो असा:  २  “ओसाड डोंगरावर सैन्यासाठी निशाणी म्हणून झेंडा उभारा.+ त्यांना हाक मारून हाताने खुणवा,म्हणजे ते प्रतिष्ठित लोकांच्या दरवाजांतून आत शिरतील.  ३  मी ज्यांना नेमलंय त्यांना मी हुकूम दिलाय.+ माझा क्रोध व्यक्‍त करण्यासाठी मी माझ्या योद्ध्यांना बोलावलंय. यामुळे ते गर्वाने फुगून आनंदित झाले आहेत.  ४  ऐका! डोंगरांवरून लोकांचा आवाज ऐकू येतोय;तो आवाज मोठ्या जमावाच्या आवाजासारखा आहे. ऐका! राज्यांचा गलबला ऐकू येतोय! एकत्र झालेल्या राष्ट्रांचा गलबला कानी पडतोय!+ सैन्यांचा देव यहोवा युद्धासाठी सैन्य तयार करतोय.+  ५  ते दूरच्या देशातून,क्षितिजापासून येत आहेत.+ यहोवा आणि त्याच्या क्रोधाची शस्त्रं,संपूर्ण पृथ्वीचा नाश करायला येत आहेत.+  ६  शोक करा! कारण यहोवाचा दिवस जवळ आलाय! विनाशाचा तो दिवस सर्वशक्‍तिमान देवाकडून असेल.+  ७  त्यामुळे सगळ्यांचे हात गळून जातील,आणि भीतीने प्रत्येक माणसाच्या काळजाचं पाणी पाणी होईल.+  ८  लोक गोंधळात पडतील.+ प्रसूतीच्या वेळी स्त्रीला वेदना होतात,तशा त्यांना वेदना होतील आणि कळा येतील. ते भयचकित होऊन एकमेकांकडे पाहतील,आणि त्यांच्या चेहऱ्‍यावर भीती व चिंता असेल.  ९  पाहा! यहोवाचा दिवस येतोय! तो क्रोधाचा आणि जळजळीत रागाचा निर्दयी दिवस असेल. तो दिवस पापी लोकांचा देशातून समूळ नाश करण्यासाठी,आणि लोकांना दहशत बसेल अशी देशाची अवस्था करण्यासाठी येत आहे.+ १०  कारण आकाशातले तारे आणि नक्षत्रं* प्रकाश देणार नाहीत;+सूर्य उगवेल पण काळोखच राहील. आणि चंद्र प्रकाश पाडणार नाही. ११  मी पृथ्वीवरच्या रहिवाशांकडून त्यांच्या वाईट कामांबद्दल,आणि दुष्टांकडून त्यांच्या अपराधांबद्दल हिशोब घेईन.+ मी अहंकारी लोकांचा गर्व मोडून टाकीन,आणि घमेंडी हुकूमशहांना नमवीन.+ १२  मी माणसांची संख्या शुद्ध सोन्यापेक्षा,+ओफीरच्या सोन्यापेक्षा दुर्मिळ करीन.+ १३  मी, सैन्यांचा देव यहोवा आकाश हादरवून टाकीन,आणि माझ्या जळजळीत क्रोधाच्या दिवशी,मी माझ्या भयंकर रागाने पृथ्वी तिच्या जागेवरून हलवीन.+ १४  प्रत्येकाची अवस्था पाठलाग होणाऱ्‍या सांबरासारखी,*आणि मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होईल. प्रत्येक जण आपल्या लोकांकडे, आपल्या देशात पळून जाईल.+ १५  जो कोणी सापडेल त्याला भोसकलं जाईल,आणि जो कोणी पकडला जाईल त्याला तलवारीने मारून टाकलं जाईल.+ १६  त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या मुलाबाळांना आपटून त्यांचे तुकडे-तुकडे केले जातील.+ त्यांची घरंदारं लुटली जातील,आणि त्यांच्या बायकांची अब्रू घेतली जाईल. १७  ज्यांच्या नजरेत चांदीला काहीच किंमत नाही,आणि ज्यांना सोन्याचं काहीच आकर्षण नाही,त्या मेदच्या लोकांना मी त्यांच्याविरुद्ध आणीन.+ १८  ते आपल्या धनुष्यांनी तरुण माणसांना मारून टाकतील;+पोटच्या फळाला, मुलाबाळांना ते दयामाया दाखवणार नाहीत. १९  सर्व राज्यांत वैभवशाली असलेली,+आणि खास्द्यांचं सौंदर्य व भूषण असलेली बाबेल!+ तिची दशा, देवाने उलथवून टाकलेल्या सदोम आणि गमोरा यांसारखी होईल.+ २०  तिच्यात पुन्हा कधीही लोकवस्ती होणार नाही,आणि पिढ्या न्‌ पिढ्या तिथे कोणीही राहणार नाही.+ अरबी लोक तिथे तंबू ठोकणार नाहीत,आणि मेंढपाळ आपले कळप तिथे बसवणार नाहीत. २१  वाळवंटातले जंगली प्राणी तिथे राहतील,तिथल्या लोकांची घरं घुबडांनी भरून जातील,शहामृगांची तिथे वस्ती होईल,+आणि रानबकऱ्‍या* तिथे नाचतील. २२  तिच्या बुरुजांमधून जनावरांच्या ओरडण्याचा,तिच्या आलिशान महालांमधून कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येईल. तिचा काळ जवळ आला आहे, तिचे दिवस आणखी वाढवले जाणार नाहीत.”+

तळटीपा

शब्दशः “आणि त्यांचे केसिल,” कदाचित मृगशीर्ष नक्षत्र आणि त्याच्या आजूबाजूची नक्षत्रं.
हरणाची एक जात.
किंवा कदाचित, “बकऱ्‍यांसारखी दैवतं.”