यशया १९:१-२५

  • इजिप्तविरुद्ध न्यायाचा संदेश (१-१५)

  • यहोवा कोण आहे हे इजिप्तला कळेल (१६-२५)

    • इजिप्तमध्ये यहोवासाठी एक वेदी (१९)

१९  इजिप्तविरुद्ध न्यायाचा संदेश:+ पाहा! यहोवा एका ढगावर स्वार होऊन वेगाने इजिप्तमध्ये येत आहे. त्याच्यासमोर इजिप्तच्या निरर्थक दैवतांचा थरकाप उडेल,+आणि भीतीने इजिप्तच्या काळजाचं पाणी पाणी होईल.  २  “मी इजिप्तच्या लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवीन,आणि ते आपसात लढतील;भाऊ आपल्या भावाशी, शेजारी आपल्या शेजाऱ्‍याशी,एक शहर दुसऱ्‍या शहराशी, आणि एक राज्य दुसऱ्‍या राज्याशी लढेल.  ३  इजिप्तच्या लोकांचा गोंधळ उडेल. मी त्यांच्या योजना निष्फळ करीन.+ ते मदतीसाठी आपल्या व्यर्थ दैवतांकडे धाव घेतील;ते आपल्या मांत्रिकांकडे, भूतविद्या करणाऱ्‍यांकडे आणि ज्योतिष्यांकडे मदतीसाठी धाव घेतील.+  ४  मी इजिप्तला एका निर्दयी मालकाच्या हाती देईन,आणि एक क्रूर राजा त्यांच्यावर राज्य करेल,”+ असं खरा प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.  ५  समुद्राचं पाणी आटून जाईल,आणि नदी सुकून कोरडी खडखडीत पडेल.+  ६  नद्यांना घाणेरडा वास सुटेल;इजिप्तमधल्या नाईलच्या कालव्यांचं पाणी कमी होऊन ते कोरडे पडतील. बोरू* आणि लव्हाळं सडून जाईल.+  ७  नाईल नदीजवळची झाडंझुडपं,तिच्या तोंडाशी असलेली हिरवळ वाळून जाईल. नाईलच्या आसपासची पेरणी केलेली सगळी शेतजमीन+ सुकून जाईल.+ तिथलं सगळं काही वाऱ्‍याने उडून जाईल, आणि मागे काहीच उरणार नाही.  ८  मासेमारी करणारे शोक करतील,नाईल नदीत गळ टाकणारे रडतील,आणि पाण्यात जाळी टाकणाऱ्‍यांची संख्या कमी होईल.  ९  जवसाच्या* धाग्यांपासून कापड बनवणाऱ्‍यांना,+आणि हातमागावर* पांढरं कापड विणणाऱ्‍यांना लज्जित केलं जाईल. १०  इजिप्तच्या विणकाम करणाऱ्‍यांना चिरडलं जाईल;आणि मजुरीवर काम करणारे सगळे शोक करतील. ११  सोअनचे+ अधिकारी अक्कलशून्य आहेत. फारोचे सगळ्यात हुशार सल्लागार त्याला मूर्खपणाचे सल्ले देतात.+ मग तुम्ही फारोला असं कसं म्हणू शकता,की “आम्ही सुज्ञ लोकांचे वंशज आहोत,प्राचीन काळातल्या राजांची मुलं आहोत”? १२  हे फारो! आता कुठे गेली तुझी सुज्ञ माणसं?+ सैन्यांचा देव यहोवा याने इजिप्तबद्दल जे ठरवलं आहे,ते जर त्यांना माहीत असेल तर त्यांनी तुला ते सांगावं. १३  सोअनचे अधिकारी मूर्खपणे वागले आहेत,नोफच्या*+ अधिकाऱ्‍यांची फसवणूक करण्यात आली आहे,इजिप्तच्या कुलप्रमुखांनी इजिप्तची दिशाभूल केली आहे. १४  यहोवाने इजिप्तला गोंधळात टाकलं आहे;+एखादा दारुडा जसा आपल्याच ओकारीत झोकांड्या खात राहतो,तसं इजिप्तच्या पुढाऱ्‍यांनी प्रत्येक गोष्टीत इजिप्तला इकडे-तिकडे भरकटायला लावलं आहे. १५  इजिप्तकडे काहीच काम उरणार नाही;इजिप्तच्या डोक्यासाठी किंवा शेपटासाठी, इजिप्तच्या फांदीसाठी किंवा लव्हाळ्यासाठी* काहीच काम राहणार नाही. १६  सैन्यांचा देव यहोवा याने इजिप्तवर आपला हात उगारल्यामुळे, त्या दिवशी इजिप्तची अवस्था घाबरलेल्या आणि भीतीने थरथर कापणाऱ्‍या बायकांसारखी होईल.+ १७  इजिप्तला यहूदाच्या प्रदेशाची दहशत बसेल. कोणी यहूदाचं नाव जरी काढलं तरी इजिप्तला भीती वाटेल. सैन्यांचा देव यहोवा याने इजिप्तच्या बाबतीत जे काही ठरवलं आहे त्यामुळे असं घडेल.+ १८  त्या दिवशी, कनानी भाषा बोलणारी आणि सैन्यांचा देव यहोवा याला एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणारी पाच शहरं इजिप्तमध्ये असतील.+ त्यांपैकी एका शहराला ‘विनाश नगर’ म्हटलं जाईल. १९  त्या दिवशी, इजिप्तच्या मधोमध यहोवासाठी एक वेदी असेल, आणि सीमेवर यहोवासाठी एक स्तंभ असेल. २०  या गोष्टी इजिप्तमध्ये सैन्यांचा देव यहोवा याचं चिन्ह आणि साक्ष म्हणून असतील. कारण, आपला छळ करणाऱ्‍यांमुळे लोक यहोवाकडे मदतीसाठी याचना करतील, आणि त्यांना वाचवायला तो एक महान तारणकर्ता पाठवेल. २१  त्या दिवशी, आपण कोण आहोत हे यहोवा इजिप्तच्या लोकांना प्रकट करेल, आणि इजिप्तचे लोक यहोवाला ओळखतील. ते यहोवाला बलिदानं आणि अर्पणं वाहतील. तसंच, ते त्याला एक नवस करतील आणि तो फेडतील. २२  यहोवा इजिप्तला मारेल,+ पण त्याला बरंही करेल. इजिप्तचे लोक यहोवाकडे परत येतील आणि तो त्यांच्या विनंत्या ऐकेल व त्यांना बरं करेल. २३  त्या दिवशी इजिप्तपासून अश्‍शूरपर्यंत एक महामार्ग असेल.+ मग अश्‍शूर इजिप्तला येईल आणि इजिप्त अश्‍शूरला जाईल. आणि इजिप्त अश्‍शूरसोबत मिळून देवाची सेवा करेल. २४  त्या दिवशी, इस्राएल हा इजिप्तचा आणि अश्‍शूरचा तिसरा सोबती बनेल,+ आणि तो पृथ्वीसाठी आशीर्वाद ठरेल. २५  कारण सैन्यांचा देव यहोवा त्याला आशीर्वाद देऊन म्हणेल: “माझी प्रजा असलेले इजिप्तचे लोक, माझ्या हातची कृती असलेले अश्‍शूरचे लोक आणि माझा वारसा असलेले इस्राएलचे लोक आशीर्वादित असोत.”+

तळटीपा

किंवा “अळशीच्या.”
किंवा “मेम्फिसच्या.”
किंवा कदाचित, “खजुराच्या झाडाच्या फांदीसाठी किंवा बोरूसाठी.”