यशया २६:१-२१
२६ त्या दिवशी यहूदा देशात+ हे गीत गायलं जाईल:+
“आमचं शहर मजबूत आहे.+
देवाकडून मिळणारं तारण शहराच्या भिंतीसारखं,आणि भिंतीभोवती असलेल्या सुरक्षेच्या उतारांसारखं आहे.+
२ शहराचे दरवाजे उघडा,+ म्हणजे नीतिमान राष्ट्र,विश्वासूपणे वागणारं राष्ट्र आत येऊ शकेल.
३ तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहणाऱ्यांचं* तू रक्षण करशील.
तू त्यांना कायम टिकणारी शांती देशील.+
कारण त्यांनी तुझ्यावर आपला भरवसा ठेवलाय.+
४ यहोवावर नेहमी भरवसा ठेवा,+कारण याह,* यहोवा हा सर्वकाळ टिकून राहणारा खडक आहे.+
५ उंच ठिकाणी राहणाऱ्यांना,उंचावर असलेल्या शहराला त्याने खाली पाडलंय.
त्याने ते जमीनदोस्त केलंय;त्याने ते धुळीस मिळवलंय.
६ ते पायांखाली तुडवलं जाईल;दीनदुबळ्यांच्या आणि जुलूम सोसलेल्या लोकांच्या पायांखाली ते तुडवलं जाईल.”
७ नीतिमान माणसाचा मार्ग सरळ असतो.
तू प्रामाणिक आणि सरळ आहेस,म्हणून तू नीतिमानाचा मार्ग सपाट करशील.
८ हे यहोवा! तुझ्या न्यायाच्या मार्गावर चालत असताना,आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले असतात.
आमचा जीव तुझ्या नावासाठी आणि तुझ्या स्मरणासाठी* आसुसलेला असतो.
९ रात्रीच्या वेळी माझ्या जिवाला तुझी उत्कंठा लागलेली असते,हो, माझं मन तुला शोधत असतं.+
तू पृथ्वीचा न्याय करतोस,तेव्हा लोक नीतिमत्त्व शिकतात.+
१० दुष्टाला दया दाखवली,तरी तो नीतिमत्त्व शिकणार नाही.+
तो सरळ मार्गाने चालणाऱ्या लोकांच्या देशातही दुष्टपणे वागेल,+आणि यहोवाची महानता पाहू शकणार नाही.+
११ हे यहोवा! तू हात उगारला आहेस, पण त्यांना तो दिसत नाही.+
तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि लज्जित होतील.
हो, तुझी आग तुझ्या शत्रूंना भस्म करेल.
१२ हे यहोवा, तू आम्हाला शांती देशील.+
कारण आम्ही जे काही पूर्ण केलं आहे,ते खरंतर तुझ्या बळामुळेच शक्य झालं आहे.
१३ हे यहोवा आमच्या देवा, तुझ्याशिवाय आमच्यावर इतर मालकांनीही शासन केलं,+पण आम्ही फक्त तुझ्याच नावाची स्तुती करतो.+
१४ ते मरून गेले आहेत; ते परत उठणार नाहीत.
त्यांच्यामध्ये शक्ती उरली नाही, ते पुन्हा जिवंत होणार नाहीत.+
त्यांचा समूळ नाश करण्यासाठी आणि त्यांचं नामोनिशाण मिटवून टाकण्यासाठी,तू त्यांच्याकडे आपलं लक्ष वळवलं आहेस.
१५ हे यहोवा, तू आपला गौरव केला आहेस,+तू राष्ट्राची वाढ केली आहेस;त्यातल्या लोकांची संख्या वाढवली आहेस.
आणि देशाच्या सीमा तू दूरपर्यंत पसरवल्या आहेत.+
१६ हे यहोवा, दुःखाच्या काळात ते तुझ्याकडे वळले;तू त्यांना शिक्षा केलीस तेव्हा त्यांनी हळू आवाजात प्रार्थना केली,आणि तुझ्यापुढे आपलं मन मोकळं केलं.+
१७ प्रसूतीचा काळ जवळ आलेल्या गरोदर स्त्रीला
जशा वेदना होतात आणि वेदनेने ती ओरडते,तशी हे यहोवा, तू आमची स्थिती केली आहेस.
१८ आम्ही गरोदर झालो, आम्हाला प्रसूतीच्या वेदनाही झाल्या,पण आम्ही जसं काय वाऱ्याला जन्म दिला.
आम्ही आमच्या देशाचं तारण केलं नाही,देशात राहण्यासाठी आम्ही कोणालाही जन्माला घातलं नाही.
१९ देव म्हणतो: “तुझे मेलेले जिवंत होतील.
माझ्या लोकांच्या मृतदेहांमध्ये पुन्हा जीव येईल.+
मातीत मिळालेल्या रहिवाशांनो,+जागे व्हा आणि जल्लोष करा!
कारण तुझं दव सकाळी पडलेल्या दवासारखं आहे;*
मेलेल्यांना जिवंत करण्यासाठी पृथ्वी त्यांना बाहेर टाकेल.
२० जा माझ्या लोकांनो, आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा,दारं लावून घ्या.+
देवाचा क्रोध शांत होईपर्यंत
थोडा वेळ लपून राहा.+
२१ कारण पाहा! यहोवा आपल्या निवासस्थानातून येतोय.
तो देशातल्या लोकांकडून त्यांच्या अपराधांचा हिशोब घेण्यासाठी येतोय.
देशात झालेला रक्तपात लपून राहणार नाही,आणि जे मारले गेले त्यांना झाकलं जाणार नाही.”
तळटीपा
^ किंवा कदाचित, “ज्यांचं मन स्थिर आहे त्यांचं.”
^ “याह” हे यहोवा या नावाचं संक्षिप्त रूप आहे.
^ म्हणजे, देवाची आणि त्याच्या नावाची आठवण केली जावी, आणि ते जाहीर केलं जावं.
^ किंवा कदाचित, “झाडपाल्यावर पडलेल्या दवासारखं आहे.”