यशया २८:१-२९
२८ एफ्राईममधल्या दारुड्यांच्या दिखाऊ* मुकुटाचा* धिक्कार असो!+
दारूने झिंगलेल्यांचं जे सुपीक खोरं,*त्याच्या डोक्यावर असलेल्या मुकुटाचा धिक्कार असो!
त्याचं वैभवी सौंदर्य कोमेजणाऱ्या फुलासारखं आहे.
२ पाहा! यहोवाकडे शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असा कोणीतरी आहे.
तो गडगडाटासह पडणाऱ्या गारांच्या पावसासारखा,नासधूस करणाऱ्या वादळी वाऱ्यासारखा,आणि मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराच्या झपाट्यासारखा,त्या मुकुटाला पूर्ण ताकदीने जमिनीवर आपटेल.
३ एफ्राईममधल्या दारुड्यांचे दिखाऊ* मुकुट पायांखाली तुडवले जातील.+
४ सुपीक खोऱ्याच्या डोक्यावर असलेलं,वैभवी सौंदर्याचं कोमेजणारं फूल,उन्हाळ्याच्या आधीच पिकलेल्या अशा अंजिरासारखं होईल,जे बघितल्या बघितल्या लोक लगेच हातात घेऊन खाऊन टाकतात.
५ त्या दिवशी, सैन्यांचा देव यहोवा आपल्या उरलेल्या लोकांसाठी एक वैभवी मुकुट आणि फुलांचा सुंदर हार बनेल.+
६ तो न्यायाधीशांना योग्य न्याय करण्याची प्रेरणा देईल आणि शहराच्या दरवाजावर शत्रूचा हल्ला परतवून लावणाऱ्यांना शक्ती देईल.+
७ याजक आणि संदेष्टेसुद्धा द्राक्षारसामुळे वाट चुकतात;दारू पिऊन ते झोकांड्या खातात.
द्राक्षारसामुळे ते भरकटतात;द्राक्षारस त्यांना गोंधळून टाकतो,ते दारू पिऊन झिंगतात;त्यांचे दृष्टान्त त्यांना बहकवतात,आणि ते योग्य न्यायनिवाडा करू शकत नाहीत.+
८ त्यांचे मेज ओकारीच्या घाणीने भरले आहेत;स्वच्छ जागाच उरलेली नाही.
९ ते म्हणतात, “हा कोणाला ज्ञान शिकवायला निघालाय?
कोणाला संदेश समजावून सांगायला निघालाय?
नुकतंच दूध तुटलेल्या बाळांना?
ज्यांनी नुकतंच आईच्या अंगावर दूध पिण्याचं सोडलंय, त्यांना?
१० बघावं तेव्हा तो हेच म्हणत असतो, ‘आज्ञेवर आज्ञा, आज्ञेवर आज्ञा,ओळीवर ओळ, ओळीवर ओळ,*+थोडं इथे, थोडं तिथे.’”
११ म्हणून अडखळत आणि परक्या भाषेत बोलणाऱ्या लोकांद्वारे तो या लोकांशी बोलेल.+
१२ तो त्यांना एकदा असं म्हणाला होता: “ही विश्रांतीची जागा आहे. थकल्या-भागलेल्यांनी इथे विश्रांती घ्यावी आणि ताजंतवानं व्हावं.” पण त्यांनी काही ऐकलं नाही.+
१३ म्हणून यहोवा पुन्हा त्यांना म्हणेल:
“आज्ञेवर आज्ञा, आज्ञेवर आज्ञा,ओळीवर ओळ, ओळीवर ओळ,*+थोडं इथे, थोडं तिथे.”
म्हणजे जेव्हा ते चालतील,तेव्हा ते अडखळून मागे पडतील,त्यांना दुखापत होईल आणि जाळ्यात अडकून ते पकडले जातील.+
१४ म्हणून हे गर्विष्ठांनो,यरुशलेममध्ये असलेल्या लोकांच्या अधिकाऱ्यांनो, यहोवाचं ऐका.
१५ कारण तुम्ही म्हणता:
“आम्ही मृत्यूशी करार केलाय,+आम्ही कबरेशी* करार केलाय.*
जेव्हा पुराच्या पाण्याचा जोरदार लोंढा येईल,तेव्हा तो आमच्यापर्यंत पोहोचणार नाही.
कारण आम्ही खोटेपणाचा आश्रय घेतलाय,आम्ही लबाडीखाली लपून बसलोय.”+
१६ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो:
“मी सीयोनमध्ये एक मजबूत पाया घालतोय,पारखलेल्या,+ मौल्यवान अशा एका कोपऱ्याच्या दगडाचा+ पाया घालतोय.+
त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीही घाबरणार नाही.+
१७ मी न्यायाला मोजमापाची दोरी,+आणि नीतिमत्त्वाला ओळंबा म्हणून वापरीन.+
गारांच्या पावसाने खोटेपणाचा आश्रय वाहून जाईल,आणि पुराच्या पाण्यात लपण्याची जागा बुडून जाईल.
१८ तुम्ही मृत्यूशी केलेला करार रद्द होईल,कबरेशी* केलेला तुमचा करार टिकणार नाही.+
जेव्हा पुराच्या पाण्याचा जोरदार लोंढा येईल,तेव्हा तुम्ही चिरडले जाल.
१९ पुराच्या पाण्याचा तो लोंढा जेव्हा जेव्हा येईल,तेव्हा तेव्हा तुम्ही वाहून जाल.+
कारण तो दररोज सकाळी,आणि दिवसरात्र वाहील.
दहशत बसल्यावरच त्यांना संदेशाचा अर्थ समजेल.”*
२० कारण पाय पसरायला पलंग छोटा पडत आहे,आणि पांघरूण घ्यायची चादरही अरुंद आहे.
२१ यहोवा आपलं कार्य, आपलं विलक्षण कार्य करण्यासाठी उठेल;तो जसा परासीम डोंगरावर उठला होता,तो गिबोनजवळच्या खोऱ्यात जसा उठला होता,+तसा तो आपलं अद्भुत कार्य पूर्ण करण्यासाठी उठेल.+
२२ आता थट्टा करू नका,+नाहीतर तुमच्या बेड्या आणखी आवळल्या जातील.
कारण मी सर्वोच्च प्रभूकडून, सैन्यांचा देव यहोवा याच्याकडून असं ऐकलं आहे,की संपूर्ण देशाचा* विनाश ठरला आहे.+
२३ माझ्या बोलण्याकडे कान द्या;मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐका.
२४ नांगरणी करणारा सतत जमिनीची नांगरणीच करत बसतो का?
बी पेरण्याचं सोडून तो नुसतं मातीची ढेकळं फोडत आणि जमीन भुसभुशीत करत बसतो का?+
२५ जमीन एकसारखी केल्यावर,तो तिच्यात जिरे आणि काळे जिरे विखरून पेरणी करत नाही का?
तो गहू, ज्वारी आणि जव आपापल्या जागी,आणि शेताच्या कडेला खपली गहू*+ पेरत नाही का?
२६ कारण देव त्याला योग्य मार्ग शिकवतो;*
तो त्याला शिक्षण देतो.+
२७ काळ्या जिऱ्यांची मळणी, मळणीच्या फळीने केली जात नाही,+आणि जिऱ्यांवरून कधी मळणीची चाकं फिरवली जात नाहीत.
तर, काळे जिरे काठीने आणि जिरे दांड्याने झोडपले जातात.
२८ एखादा माणूस, पीठ होईपर्यंत धान्याची मळणी करतो का?
नाही, पीठ होईपर्यंत तो धान्याची मळणी करत नाही;+आणि धान्याचा भुगा होईपर्यंत,तो घोड्यांनी ओढली जाणारी मळणीची चाकं त्यावरून फिरवत नाही.+
२९ या सगळ्या गोष्टीही सैन्यांचा देव यहोवा याच्याकडूनच आहेत.
त्याचा संकल्प* अद्भुत आहे,आणि त्याची कार्यं* महान आहेत.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मगरूर; घमेंडी.”
^ हे शोमरोन या राजधानीच्या शहराला सूचित करत असावं असं दिसतं.
^ किंवा “मगरूर; घमेंडी.”
^ किंवा “मोजमाप करायच्या दोरीवर दोरी, मोजमाप करायच्या दोरीवर दोरी.”
^ किंवा “मोजमाप करायच्या दोरीवर दोरी, मोजमाप करायच्या दोरीवर दोरी.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “कबरेसोबत दृष्टान्त पाहिलाय.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “संदेशाचा अर्थ समजल्यावर त्यांना दहशत बसेल.”
^ किंवा “पृथ्वीचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “शिस्त लावतो; ताडन करतो.”
^ किंवा “सल्ला.”
^ किंवा “बुद्धी.”