यशया ३:१-२६

  • यहूदाचे पुढारी लोकांची दिशाभूल करतात (१-१५)

  • सीयोनच्या मुलींचा न्याय (१६-२६)

 पाहा! खरा प्रभू, सैन्यांचा देव यहोवा,यरुशलेमचा आणि यहूदाचा सगळा आधार काढून घेईल आणि त्यांचा सगळा पुरवठा बंद करेल;तो त्यांच्या अन्‍नपाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद करेल.+  २  त्यांचा आधार असलेली शक्‍तिशाली माणसं आणि योद्धे,न्यायाधीश आणि संदेष्टे,+ शकुन पाहणारे आणि वडीलजन,  ३  प्रतिष्ठित माणसं, सल्लागार, ५० जणांचे प्रमुख,+तरबेज जादूगार आणि कुशल मांत्रिक या सगळ्यांना तो त्यांच्यापासून काढून टाकेल.+  ४  मी पोरांना त्यांचे अधिकारी बनवीन,आणि चंचल* मनाचे त्यांच्यावर अधिकार गाजवतील.  ५  लोक एकमेकांवर अत्याचार करतील,प्रत्येक जण आपल्या सोबत्यावर जुलूम करेल.+ मुलगा म्हाताऱ्‍या माणसाच्या अंगावर धावून जाईल,किंमत नसलेला माणूस प्रतिष्ठित माणसाशी उद्धटपणे वागेल.+  ६  प्रत्येक जण आपल्या वडिलांच्या घरात आपल्या भावाला धरून म्हणेल: “तुझ्याकडे झगा आहे, तर तू आमचा अधिकारी हो,आणि या उद्ध्‌वस्त झालेल्या जागेचा ताबा घे.”  ७  पण त्या दिवशी तो विरोध करून म्हणेल: “मी तुमच्या जखमांची मलमपट्टी करणारा होणार नाही. माझ्या स्वतःच्या घरात खायला-प्यायला नाही, घालायला कपडे नाहीत,मला लोकांवर अधिकारी बनवू नका.”  ८  यरुशलेम अडखळलं आहे,आणि यहूदा पडलं आहे. कारण त्यांचं वागणं-बोलणं यहोवाच्या विरुद्ध आहे. वैभवशाली देवाच्या डोळ्यांसमोर ते उद्धटपणे वागतात.+  ९  त्यांच्या चेहऱ्‍यावरचे हावभाव त्यांच्याविरुद्ध साक्ष देतात. ते आपलं पाप लपवत नाहीत;सदोमसारखं ते आपल्या पापांबद्दल उघडपणे बोलतात.+ त्यांचा धिक्कार असो! कारण ते स्वतःवर संकट ओढवून घेत आहेत. १०  नीतीने वागणाऱ्‍याला सांगा, की त्याचं भलं होईल;त्याला आपल्या कामाचं प्रतिफळ मिळेल.+ ११  पण दुष्टपणे वागणाऱ्‍याचा धिक्कार असो! त्याच्यावर संकट कोसळेल. कारण त्याने जे केलंय, तेच त्याच्या बाबतीतही घडेल. १२  माझ्या लोकांविषयी म्हणाल, तर त्यांच्या कामाची देखरेख करणारे जुलूम करतात,आणि स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. माझ्या लोकांनो, तुमचे पुढारी तुम्हाला बहकवत आहेत,ते तुमची दिशाभूल करत आहेत.+ १३  यहोवा लोकांना दोषी ठरवण्यासाठी उभा राहत आहे,तो राष्ट्रांना निकाल सुनावण्यासाठी उभा राहत आहे. १४  यहोवा त्याच्या लोकांच्या वडीलजनांवर आणि अधिकाऱ्‍यांवर न्यायदंड बजावेल. “तुम्ही द्राक्षमळा जाळून टाकलाय,आणि तुमच्या घरात गोरगरिबांकडून लुटलेल्या वस्तू आहेत.+ १५  माझ्या लोकांना चिरडायची,गरिबांची तोंडं मातीत ठेचायची तुमची हिंमत कशी झाली?”+ असं सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. १६  यहोवा म्हणतो: “सीयोनच्या मुली गर्विष्ठ आहेत,त्या ताठ मानेने चालतात;त्या डोळे मारत, आपल्या पायांतल्या पैजणांचा छुमछुम आवाज करत, ठुमकत चालतात. १७  म्हणून यहोवा सीयोनच्या मुलींच्या डोक्यांवर खवडे* उठवेल,त्यांच्या डोक्यावर एकही केस उरणार नाही, असं यहोवा करेल.+ १८  त्या दिवशी यहोवा त्यांचं सौंदर्य काढून घेईल;तो त्यांच्या बांगड्या, डोक्यावरची आभूषणं, चंद्रकोरीच्या आकाराचे दागिने,+ १९  त्यांचे कानांतले, कंकणं, ओढण्या, २०  त्यांचे पदर, पैंजण, पट्टे,अत्तराच्या कुप्या, ताईत, २१  त्यांच्या अंगठ्या, नथी, २२  चांगल्या प्रतीचे कपडे, अंगरखे, झगे, बटवे, २३  हातात धरण्याचे आरसे,+ मलमलीचे कपडे,*पगड्या आणि ओढण्या काढून घेईल. २४  बाल्सम* तेलाऐवजी+ त्यांच्या अंगाला सडका वास येईल;कमरपट्ट्याऐवजी त्या दोरी बांधतील;वेणीफणी केलेले त्यांचे केस जाऊन, त्यांना टक्कल पडेल;+भरजरी कपड्यांऐवजी त्या गोणपाट घालतील;+आणि सौंदर्याऐवजी त्यांच्या अंगावर डाग* असेल. २५  तुझी माणसं तलवारीने मारली जातील,आणि तुझे शूर योद्धे लढाईत मरतील.+ २६  सीयोनचे दरवाजे रडतील आणि शोक करतील,+आणि सीयोन ओसाड पडून जमिनीवर बसून राहील.”+

तळटीपा

किंवा “अस्थिर.”
एक प्रकारचा त्वचा रोग.
किंवा “अंतरवस्त्रं.”
म्हणजे, एखाद्या गुलामाच्या किंवा कैद्याच्या शरीरावर चटका देऊन केलेली खूण.