यशया ३६:१-२२

  • सन्हेरीब यहूदावर हल्ला करतो (१-३)

  • रबशाके यहोवाची निंदा करतो (४-२२)

३६  हिज्कीया राजाच्या शासनकाळाच्या १४ व्या वर्षी, अश्‍शूरचा राजा+ सन्हेरीब याने तटबंदी असलेल्या यहूदाच्या सगळ्या शहरांवर हल्ला करून ती शहरं काबीज केली.+ २  मग अश्‍शूरच्या राजाने रबशाके*+ याला लाखीश+ इथून एक मोठी सेना घेऊन यरुशलेमला हिज्कीया राजाकडे पाठवलं. ते सर्व वरच्या तळ्याच्या पाटाजवळ* येऊन तैनात झाले;+ पाण्याचा हा पाट, धोब्याच्या मैदानाकडे जाणाऱ्‍या महामार्गावर होता.+ ३  मग राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम,+ सचिव शेबना+ आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं बाहेर त्याच्याकडे आले. ४  तेव्हा रबशाके त्यांना म्हणाला: “जा, जाऊन हिज्कीयाला सांगा, ‘अश्‍शूरचा महान राजा असं म्हणतो: “कसल्या गोष्टीचा तुला एवढा भरवसा आहे?+ ५  तू म्हणतोस, ‘माझ्याकडे युद्धनीती आणि युद्ध करायची ताकद आहे.’ पण हे सगळे वायफळ शब्द आहेत. तू कोणाच्या भरवशावर माझ्याविरुद्ध बंड करायला निघालास?+ ६  इजिप्तच्या? तो तर चेपलेली वेताची काठी* आहे. कोणी त्या काठीवर टेकायला जरी गेला, तरी ती तुटून त्याच्याच हातात घुसेल. जे इजिप्तच्या राजावर, फारोवर भरवसा ठेवतात त्यांच्यासाठी तो असल्या वेताच्या काठीसारखाच आहे.+ ७  आणि तुम्ही जर असं म्हणत असाल, की ‘आमचा भरवसा आमच्या यहोवा देवावर आहे,’ तर हा तोच देव आहे ना ज्याच्या वेदी आणि ज्याची उच्च स्थानं* हिज्कीयाने पाडून टाकली,+ आणि ‘तुम्ही यरुशलेममधल्या या वेदीपुढेच नमन केलं पाहिजे,’ असं त्याने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना सांगितलं?”’+ ८  तर आता चल, माझ्या प्रभूशी, अश्‍शूरच्या राजाशी पैज लाव!+ मी तुला २,००० घोडे देतो. हिंमत असेल तर त्यांच्यासाठी तितके घोडेस्वार आणून दाखव. ९  इजिप्तने तुला रथ आणि घोडेस्वार जरी पुरवले, तरी माझ्या प्रभूची सेवा करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांपैकी सगळ्यात छोट्या अधिकाऱ्‍याला तरी तू हरवू शकशील का? १०  तुला काय वाटतं, मी काय यहोवाच्या परवानगीशिवाय या देशाचा नाश करायला आलोय? यहोवाने स्वतः मला सांगितलंय: ‘जाऊन त्या देशावर हल्ला कर आणि त्याचा नाश कर.’” ११  त्यावर एल्याकीम, शेबना+ आणि यवाह हे तिघं रबशाकेला+ म्हणाले: “कृपया आपल्या या सेवकांशी अरामी* भाषेत बोला.+ कारण आम्हाला ती भाषा समजते. शहराच्या भिंतीवर असलेल्या लोकांसमोर आमच्याशी यहुदी लोकांच्या भाषेत बोलू नका.”+ १२  पण रबशाके म्हणाला: “माझ्या प्रभूने मला काय फक्‍त तुमच्या प्रभूशी आणि तुमच्याशी बोलायला पाठवलंय? त्यांनी मला शहराच्या भिंतीवर असलेल्या लोकांशीही बोलायला पाठवलंय. कारण तुमच्यासोबत तेसुद्धा स्वतःचं मलमूत्र खातील.” १३  मग रबशाके पुढे आला आणि यहुदी लोकांच्या भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला:+ “अश्‍शूरचा महान राजा काय म्हणतो ते ऐका.+ १४  राजा असं म्हणतो, ‘हिज्कीया तुम्हाला फसवतोय. त्याचं ऐकू नका. तो काही तुम्हाला वाचवू शकणार नाही.+ १५  तो तुम्हाला असं सांगतोय, की “यहोवा आपल्याला नक्की वाचवेल. हे शहर अश्‍शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही.” पण त्याचं ऐकून यहोवावर भरवसा ठेवू नका.+ १६  तुम्ही हिज्कीयाचं काहीही ऐकू नका. कारण अश्‍शूरचा राजा असं म्हणतो: “माझ्याशी सलोखा करा आणि मला शरण या. मग तुमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या द्राक्षवेलीचं आणि अंजिराच्या झाडाचं फळ खाईल; आणि प्रत्येक जण आपापल्या विहिरीचं पाणी पिईल. १७  नंतर मी येईन आणि तुम्हाला तुमच्या देशासारख्या असलेल्या एका देशात घेऊन जाईन;+ एका अशा देशात जिथे भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस आहे; जिथे भाकरी आणि द्राक्षमळे आहेत. १८  हिज्कीयाचं काहीएक ऐकू नका. ‘यहोवा आपल्याला वाचवेल,’ असं म्हणून तो खरंतर तुम्हाला फसवतोय. दुसऱ्‍या कोणत्याही राष्ट्रांच्या देवांनी त्यांच्या लोकांना अश्‍शूरच्या राजाच्या हातून वाचवलंय का?+ १९  हमाथ आणि अर्पाद यांचे देव कुठे आहेत?+ सफरवाईमचे देव कुठे आहेत?+ यांच्यापैकी कोणीही शोमरोनला माझ्या हातून वाचवू शकला का?+ २०  आजपर्यंत या सगळ्या देशांतल्या देवांपैकी कोणत्याही देवाने त्यांच्या देशाला माझ्या हातून वाचवलं नाही. तर मग, यहोवा कसं काय यरुशलेमला माझ्या हातून वाचवू शकेल?”’”+ २१  पण ते शांत राहिले आणि त्यांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. कारण राजाचा असा हुकूम होता, की “तुम्ही त्याला काहीच उत्तर देऊ नका.”+ २२  मग राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, सचिव शेबना+ आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं आपले कपडे फाडून हिज्कीया राजाकडे आले; आणि रबशाके जे काही बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितलं.

तळटीपा

किंवा “मुख्य प्यालेबरदार.”
किंवा “कालव्याजवळ.”
किंवा “बोरू.”
किंवा “सीरियाच्या.”