यशया ३९:१-८
-
बाबेलवरून आलेले दूत (१-८)
३९ त्या दिवसांत, बलदानच्या मुलाने, म्हणजे बाबेलचा राजा मरोदख-बलदान याने आपल्या दूतांच्या हातून हिज्कीयाला पत्रं पाठवली आणि त्यासोबत नजराणाही पाठवला.+ कारण हिज्कीया आजारी होता, पण आता तो बरा झाला आहे असं त्याने ऐकलं होतं.+
२ हिज्कीयाने आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना राजभांडारातला खजिना दाखवला.+ त्याने त्यांना आपलं सोनं, चांदी, बाल्सम* तेल व इतर मौल्यवान तेल; तसंच, आपलं शस्त्रांचं संपूर्ण भांडार आणि राजभांडारात जे काही होतं ते सगळं दाखवलं. हिज्कीयाने त्यांना दाखवलं नाही असं त्याच्या राजमहालात आणि त्याच्या संपूर्ण राज्यात काहीही नव्हतं.
३ त्यानंतर यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्याने त्याला विचारलं: “ते लोक कुठून आले होते? काय म्हणत होते ते?” तेव्हा हिज्कीया त्याला म्हणाला: “ते लोक एका दूरच्या देशातून, बाबेलमधून आले होते.”+
४ मग त्याने विचारलं: “त्यांनी तुझ्या राजमहालात काय-काय बघितलं?” त्यावर हिज्कीया म्हणाला: “त्यांनी माझ्या राजमहालातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. माझ्या राजभांडारातलं असं काहीही नाही जे मी त्यांना दाखवलं नाही.”
५ मग यशया हिज्कीयाला म्हणाला: “सैन्यांचा देव यहोवा याचा संदेश ऐक,
६ ‘पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझ्या राजमहालात जे काही आहे ते सगळं, आणि तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवलंय ते सगळं बाबेलला नेलं जाईल. इथे काहीच उरणार नाही,’+ असं यहोवा म्हणतो.+
७ ‘आणि तुझ्या काही वंशजांना बाबेलला नेलं जाईल. तिथे ते बाबेलच्या राजाच्या महालात राजदरबारी म्हणून सेवा करतील.’”+
८ यावर हिज्कीया यशयाला म्हणाला: “यहोवाने कळवलेला संदेश योग्य आहे.” तो पुढे म्हणाला: “मी जिवंत आहे तोपर्यंत तरी माझ्या राज्यात शांती आणि स्थिरता* राहील.”+