यशया ५९:१-२१

  • इस्राएलची पापं त्यांना देवापासून दूर नेतात (१-८)

  • पापांची कबुली (९-१५क)

  • पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांसाठी यहोवा पाऊल उचलतो (१५ख-२१)

५९  पाहा! यहोवाचा हात इतका तोकडा नाही, की तो वाचवू शकत नाही.+ आणि त्याचे कान इतके बधिर झाले नाहीत, की तो ऐकू शकत नाही.+  २  तुम्ही तुमच्याच अपराधांमुळे देवापासून दूर गेला आहात.+ तुमच्याच पापांमुळे त्याने तुमच्यापासून तोंड फिरवलं आहे,आणि म्हणून तो तुमचं ऐकत नाही.+  ३  तुमचे हात रक्‍ताने माखले आहेत,+आणि तुमची बोटं अपराधाने भरली आहेत. तुमचे ओठ खोटं बोलतात+ आणि तुमची जीभ वाईट गोष्टी पुटपुटते.  ४  नीतीच्या बाजूने बोलणारा कोणीही नाही,+आणि न्यायालयात जाणारा कोणीही खरं बोलत नाही. ते पोकळ गोष्टींवर भरवसा ठेवतात+ आणि व्यर्थ गोष्टी बोलतात. त्यांना संकटाचा गर्भ राहतो आणि ते वाइटाला जन्म देतात.+  ५  ते विषारी सापांची अंडी उबवतात. ती अंडी खाणारा नक्की मरेल,आणि अंड फोडलं तर त्यातूनही विषारी सापच निघेल. शिवाय, ते कोळ्याचं जाळंही विणतात.+  ६  पण, त्यांनी विणलेल्या जाळ्याचा वस्त्र म्हणून उपयोग होणार नाही,आणि ते जे काही तयार करतात, त्याने ते आपलं अंग झाकू शकणार नाहीत.+ त्यांची सगळी कामं दुष्टपणाची आहेत,आणि त्यांचे हात हिंसेच्या कामांनी भरलेले आहेत.+  ७  त्यांचे पाय दुष्टपणा करायला धावतात,आणि निर्दोष लोकांचा रक्‍तपात करायची त्यांना घाई असते.+ त्यांच्या मनात येणारे सगळे विचार वाईट आहेत. त्यांचे सगळे मार्ग विनाशाचे आणि दुःखाचेच आहेत.+  ८  त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही,आणि त्यांच्या पाऊलवाटांमध्ये न्याय नाही.+ ते आपल्या रस्त्यांना वाकडं वळण देतात;त्यांवरून चालणाऱ्‍या कोणालाही शांती मिळणार नाही.+  ९  म्हणूनच न्याय आमच्यापासून फार लांब आहे,आणि नीतिमत्त्व आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आम्ही उजेडाची आशा धरतो, पण पाहा! आमच्या वाट्याला अंधारच येतो. आम्ही प्रकाशाची आशा धरतो, पण पाहा! आम्ही काळोखातच चालत राहतो.+ १०  आंधळ्या माणसांसारखं आम्ही भिंत चाचपडत चालतो,डोळे नसणाऱ्‍यांसारखं आम्ही इथे-तिथे चाचपडत राहतो.+ भरदुपारी आम्ही संध्याकाळच्या अंधारात चालल्यासारखं धडपडतो. आम्ही शक्‍तिशाली माणसांमध्ये मेलेल्या माणसांसारखे आहोत. ११  आम्ही सगळे अस्वलांसारखं गुरगुरत राहतो,आणि कबुतरांसारखं दुःखाने घुमत राहतो. आम्ही न्यायाची आशा धरतो, पण तो आम्हाला मिळत नाही. आम्ही तारणाची आशा धरतो, पण ते आमच्यापासून फार दूर आहे. १२  कारण आम्ही तुझ्यासमोर खूप बंडं केली;+आम्ही केलेलं प्रत्येक पाप आमच्याविरुद्ध साक्ष देतं.+ आम्ही किती बंडखोरपणे वागलो,आणि किती अपराध केले याची आम्हाला जाणीव आहे.+ १३  आम्ही खूप पापं केली आणि यहोवाला नाकारलं;आम्ही आमच्या देवाकडे पाठ फिरवली. आम्ही जुलमाच्या आणि बंडाच्या गोष्टी बोललो;+आम्हाला लबाडीचा गर्भ राहिला. आम्ही मनात खोट्या गोष्टी भरल्या आणि त्या पुटपुटलो.+ १४  न्यायाला मागे ढकलण्यात आलं आहे,+आणि नीतिमत्त्व दूर उभं राहतं.+ कारण सत्य* शहराच्या चौकात अडखळून पडलं आहे,आणि खरेपणा आत येऊ शकत नाही. १५  सत्य* नाहीसं झालं आहे,+आणि वाईट गोष्टींपासून मागे वळणाऱ्‍याला लुटलं जात आहे. यहोवाने हे सगळं पाहिलं आणि त्याला फार दुःख झालं,*कारण कुठेच न्यायीपणा राहिलेला नाही.+ १६  मदत करायला एकही माणूस पुढे येत नाही,आणि मध्यस्थी करणारा कोणीही नाही, हे पाहून त्याला आश्‍चर्य वाटलं. म्हणून त्याने स्वतःच्या हाताने त्यांचं तारण केलं,*आणि त्याच्या नीतिमत्त्वाने त्याला पाऊल उचलायला प्रवृत्त केलं. १७  मग त्याने नीतिमत्त्वाचं चिलखत घातलं,आपल्या डोक्यावर तारणाचा* टोप घातला.+ त्याने सूड उगवण्याचे कपडे घातले,+आणि अंगावर आवेशाचा झगा* चढवला. १८  तो त्यांना त्यांच्या कामांचं हे फळ देईल:+ तो आपल्या शत्रूंवर क्रोधाचा वर्षाव करेल,तो आपल्या वैऱ्‍यांना शिक्षा करेल.+ तो द्वीपांना त्यांच्या कामांची परतफेड करेल. १९  सूर्यास्ताकडचे लोक यहोवाच्या नावाचं,आणि सूर्योदयाकडचे लोक त्याच्या वैभवाचं भय बाळगतील. कारण तो नदीच्या जोरदार प्रवाहासारखा येईल,यहोवाची पवित्र शक्‍ती* त्याला घेऊन येईल. २०  यहोवा म्हणतो: “सीयोनकडे सोडवणारा+ येईल,+तो अपराधापासून मागे फिरणाऱ्‍या याकोबच्या वंशजांकडे येईल.”+ २१  यहोवा म्हणतो: “मी त्यांच्याशी असा करार करतो:+ तुझ्यावर असलेली माझी पवित्र शक्‍ती आणि मी तुझ्या मुखात घातलेले माझे शब्द तुझ्या मुखातून, तसंच तुझ्या मुलांच्या आणि तुझ्या नातवंडांच्या मुखातून कधीही काढून घेतले जाणार नाहीत.” यहोवा म्हणतो, “आतापासून सर्वकाळापर्यंत ते कायम तुमच्या मुखात राहतील.”

तळटीपा

किंवा “प्रामाणिकपणा.”
किंवा “प्रामाणिकपणा.”
शब्दशः “आणि त्याच्या नजरेत हे वाईट होतं.”
किंवा “स्वतःसाठी विजय मिळवला.”
किंवा “विजयाचा.”
किंवा “बिनबाह्‍यांचा झगा.”