यशया ६१:१-११
६१ सर्वोच्च प्रभू यहोवा याची पवित्र शक्ती* माझ्यावर आहे.+
दीनदुबळ्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी यहोवाने माझा अभिषेक केला आहे.+
दुःखी मनाच्या लोकांची मलमपट्टी करण्यासाठी,बंदिवानांना सुटका जाहीर करण्यासाठी,आणि कैद्यांचे डोळे उघडले जातील हे त्यांना सांगण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.+
२ यहोवाच्या कृपेचं वर्ष जाहीर करण्यासाठी,सूड उगवण्याच्या आमच्या देवाच्या दिवसाची घोषणा करण्यासाठी,+आणि शोक करणाऱ्या सर्वांचं सांत्वन करण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.+
३ सीयोनसाठी शोक करणाऱ्यांना राखेऐवजी सुंदर पगडी देण्यासाठी,शोकाऐवजी आनंदोत्सवाचं तेल,आणि निराश मनाऐवजी स्तुतीचं वस्त्र देण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.
त्यांना नीतिमत्त्वाचे मोठे वृक्ष म्हटलं जाईल;यहोवाच्या नावाचा गौरव व्हावा म्हणून त्याने लावलेली झाडं, असं त्यांना म्हटलं जाईल.+
४ ते उद्ध्वस्त झालेली जुनी ठिकाणं पुन्हा बांधून काढतील;प्राचीन काळातली ओसाड पडलेली ठिकाणं ते पुन्हा उभारतील.+
नाश झालेली शहरं ते पुन्हा बांधतील,+पिढ्या न् पिढ्या उजाड पडलेली ठिकाणं ते पुन्हा वसवतील.+
५ “परके लोक येऊन तुमचे कळप चारतील,आणि विदेशी लोक+ तुमच्या शेतांत आणि द्राक्षमळ्यांत काम करतील.+
६ पण तुम्हाला मात्र यहोवाचे याजक म्हटलं जाईल;+ते तुम्हाला आमच्या देवाचे सेवक म्हणतील.
तुम्ही राष्ट्रांच्या धनसंपत्तीचा वापर कराल,+आणि त्यांच्या वैभवाविषयी* फुशारकी माराल.
७ अप्रतिष्ठेच्या ऐवजी माझ्या लोकांना दुप्पट हिस्सा मिळेल,अपमानाच्या ऐवजी, मिळालेल्या वाट्यामुळे ते आनंदाने जयजयकार करतील.
हो, त्यांच्या देशात त्यांना दुप्पट हिस्सा मिळेल.+
ते सदासर्वकाळ आनंदी राहतील.+
८ कारण मला, यहोवाला न्याय प्रिय आहे;+मला चोरीचा आणि अनीतीचा तिटकारा आहे.+
मी माझ्या लोकांना विश्वासूपणे त्यांची मजुरी देईन,आणि मी त्यांच्यासोबत एक सर्वकाळचा करार करीन.+
९ त्यांच्या संततीचं* राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये,आणि त्यांच्या वंशजांचं देशादेशांमध्ये नाव होईल.+
त्यांना पाहणारे सगळे ओळखतील, की ही यहोवाने आशीर्वादित केलेली संतती* आहे.”+
१० यहोवामुळे मी खूप आनंदी होईन.
माझा जीव माझ्या देवामुळे हर्ष करेल.+
कारण, त्याने मला तारणाची वस्त्रं घातली आहेत;+नवरी जशी दागिन्यांनी स्वतःला सजवते,आणि नवरा जसा याजकासारखी पगडी घालतो,+तसं त्याने मला नीतिमत्त्वाचा झगा* घातला आहे.
११ जसं जमिनीत पेरलेल्या बियांना अंकुर फुटतात,आणि बागेत पेरलेल्या बियांतून जशी रोपं वाढतात,तसं सर्वोच्च प्रभू यहोवा, सर्व राष्ट्रांपुढे आपलं नीतिमत्त्व+ आणि आपली स्तुती वाढवेल.+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “संपत्तीविषयी.”
^ शब्दशः “बीज.”
^ शब्दशः “बीज.”
^ किंवा “बिनबाह्यांचा झगा.”