यशया ६४:१-१२

  • पश्‍चात्तापाची प्रार्थना पुढे चालू (१-१२)

    • यहोवा “आमचा कुंभार” ()

६४  तू आकाश फाडून खाली आला असतास,आणि तुझ्यामुळे पर्वतांना हादरे बसले असते, तर किती बरं झालं असतं!  २  आगीने काटेकुटे भस्म होतात आणि पाण्याला उकळी येते, तसं हे झालं असतं. मग तुझं नाव तुझ्या शत्रूंना कळलं असतं,आणि तुझ्यापुढे राष्ट्रं थरथर कापली असती!  ३  आम्ही अपेक्षाही केली नव्हती अशा विस्मयकारक गोष्टी तू केल्यास.+ तू खाली आलास, आणि तुझ्यापुढे पर्वत हादरले.+  ४  जे धीराने तुझी वाट पाहतात त्यांच्यासाठी तू कार्य करणारा देव आहेस.+ तुझ्याशिवाय असा कुठलाही देव असल्याचं जुन्या काळापासून कधी कोणी ऐकलं नाही,कोणाच्या कानावर ते आलं नाही किंवा कोणी ते पाहिलंही नाही.  ५  जे आनंदाने चांगली कामं करतात,जे तुला आठवणीत ठेवून तुझ्या मार्गांवर चालतात, त्यांना तू भेटायला येतोस.+ पाहा! आम्ही पाप करत राहिलो, तेव्हा तुझा राग आमच्यावर भडकला.+ आम्ही बराच काळ असंच वागत राहिलो. मग आता आमचा बचाव होईल का?  ६  आम्ही सर्व एखाद्या अशुद्ध माणसासारखे झालो आहोत,नीतिमत्त्वाची आमची सगळी कामं मासिक पाळीच्या कापडासारखी झाली आहेत.+ आम्ही सगळे पानांसारखं सुकून जाऊ,आणि आमचे अपराध आम्हाला वाऱ्‍यासारखं वाहून नेतील.  ७  तुझ्या नावाचा धावा करणारा कोणीही नाही,तुला धरून राहण्यासाठी कोणीच काही करत नाही. कारण तू आमच्यापासून आपलं तोंड फिरवलं आहेस,+आणि आमच्या अपराधांमुळे तू आम्हाला नाश होण्यासाठी टाकून दिलं आहेस.  ८  पण हे यहोवा, तू आमचा पिता आहेस.+ आम्ही माती आहोत, आणि तू आमचा कुंभार* आहेस;+आम्ही सगळे तुझ्या हाताची कृती आहोत.  ९  हे यहोवा, आमच्यावर फार रागावू नकोस,+आणि आमचे अपराध कायम लक्षात ठेवू नकोस. कृपा करून आमच्याकडे लक्ष दे. कारण आम्ही सगळे तुझेच लोक आहोत. १०  तुझी पवित्र शहरं ओसाड रानासारखी झाली आहेत. सीयोन ओसाड रान बनली आहे,यरुशलेम पडीक जमिनीसारखी झाली आहे.+ ११  जिथे आमच्या वाडवडिलांनी तुझी स्तुती केली,ते आमचं पवित्र आणि वैभवशाली मंदिर आगीने भस्म झालं आहे.+ आम्हाला प्रिय असलेलं सगळं काही उद्ध्‌वस्त झालं आहे. १२  इतकं सगळं होऊनही, हे यहोवा, तू गप्प राहशील का? आमचा इतका छळ होत असतानाही तू शांत बसून राहशील का?+

तळटीपा

किंवा “तू आम्हाला घडवणारा.”