यशया ७:१-२५

  • आहाज राजासाठी संदेश (१-९)

    • शआर-याशूब ()

  • इम्मानुएल, एक चिन्ह (१०-१७)

  • अविश्‍वासूपणाचे परिणाम (१८-२५)

 यहूदाचा राजा आहाज+ हा योथामचा मुलगा आणि उज्जीयाचा नातू होता. त्याच्या शासनकाळात, रसीन हा सीरियाचा राजा आणि रमाल्याहचा मुलगा पेकह+ हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन आणि पेकह हे दोघं यरुशलेमशी युद्ध करायला आले. पण त्याला* काही ते शहर काबीज करता आलं नाही.+ २  तेव्हा दावीदच्या घराण्याला अशी खबर देण्यात आली: “सीरियाच्या सैन्याने एफ्राईमच्या सैन्यासोबत हातमिळवणी केली आहे.” हे ऐकून, आहाज राजाच्या आणि त्याच्या लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला; जंगलातली झाडं सोसाट्याच्या वाऱ्‍याने जशी थरथर कापतात, तसा त्यांचा थरकाप उडाला. ३  यहोवा मग यशयाला म्हणाला: “तू आपला मुलगा शआर-याशूब*+ याला घेऊन आहाजला भेटायला जा. वरच्या तळ्याचा पाट* जिथे संपतो,+ तिथे धोब्याच्या मैदानाकडे जाणाऱ्‍या महामार्गाजवळ तो तुला भेटेल. ४  तू त्याला सांग: ‘शांत राहा, विचारपूर्वक वाग. घाबरू नकोस. रमाल्याहचा+ मुलगा आणि सीरियाचा राजा रसीन हे विझत आलेल्या दोन लाकडांच्या तुकड्यांसारखे आहेत. त्यांच्या भडकलेल्या क्रोधामुळे आपलं मन खचू देऊ नकोस. ५  सीरियाने एफ्राईम आणि रमाल्याह यांसोबत मिळून तुझं नुकसान करण्यासाठी कट रचलाय. ते म्हणत आहेत: ६  “चला आपण यहूदावर हल्ला करू. आपण त्याचे तुकडे तुकडे करून* ते काबीज करू.* आणि ताबेलच्या मुलाला त्यावर राजा बनवू.”+  ७  सर्वोच्च देव यहोवा म्हणतो: “तसं मुळीच घडणार नाही,त्यांचा कट कधीच यशस्वी होणार नाही.  ८  सीरियाचं मुख्य शहर दिमिष्क आहे,आणि दिमिष्कचा प्रमुख रसीन आहे. फक्‍त ६५ वर्षांत, एफ्राईमचा पूर्णपणे चुराडा होईल,आणि त्याच्या लोकांचं नामोनिशाण मिटून जाईल.+  ९  एफ्राईमचं मुख्य शहर शोमरोन आहे,+आणि शोमरोनचा प्रमुख रमाल्याह आहे.+ तुमचा विश्‍वास मजबूत असेल,तरच तुम्ही सुरक्षित राहाल.”’” १०  यहोवा आहाजला पुढे म्हणाला: ११  “तुझा देव यहोवा याच्याकडे कोणतंही चिन्ह माग;+ मग ते खाली खोल कबरेत* असो किंवा वर उंच आकाशात असो.” १२  पण आहाज म्हणाला: “मी चिन्ह मागणार नाही. मी यहोवाची परीक्षा पाहणार नाही.” १३  त्यावर यशया त्याला म्हणाला: “हे दावीदच्या घराण्या, ऐक! तुम्ही माणसाच्या सहनशक्‍तीचा अंत पाहता तो काय कमी आहे, म्हणून आता तुम्ही देवाच्या सहनशक्‍तीचा अंत पाहताय?+ १४  त्यामुळे आता यहोवा स्वतःच तुम्हाला एक चिन्ह देतोय: पाहा! कुमारी गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल.+ ती त्याचं नाव इम्मानुएल* ठेवेल.+ १५  त्याला बरंवाईट समजण्याच्या आतच तो लोणी आणि मध खायला सुरुवात करेल. १६  कारण त्या मुलाला बरंवाईट समजण्याच्या आधीच, ज्या दोन राजांची तुला दहशत बसली आहे त्यांचा देश पूर्णपणे ओसाड होईल.+ १७  एफ्राईम यहूदापासून वेगळा झाला,+ तेव्हापासून आली नाही अशी वेळ यहोवा तुझ्यावर, तुझ्या घराण्यावर आणि तुझ्या लोकांवर आणेल. कारण तो अश्‍शूरच्या राजाला तुझ्याविरुद्ध आणणार आहे.+ १८  त्या दिवशी यहोवा शीळ घालून* इजिप्तमधल्या* नाईल नदीच्या कालव्यांच्या टोकांपासून माश्‍यांना आणि अश्‍शूरमधल्या मधमाश्‍यांना बोलावून घेईल. १९  तेव्हा त्या सगळ्या येतील आणि खोल दऱ्‍यांमध्ये व खडकांच्या कपारींमध्ये, तसंच सर्व काटेरी झुडपांवर आणि पाणी असलेल्या सर्व जागांवर पसरतील. २०  त्या दिवशी यहोवा महानदीच्या* प्रदेशातल्या भाड्याच्या वस्तऱ्‍याचा उपयोग करून, म्हणजे अश्‍शूरच्या राजाचा उपयोग करून+ तुमच्या डोक्याच्या आणि पायांच्या केसांचं मुंडण करेल. तसंच तो तुमची दाढीही काढून टाकेल. २१  त्या दिवशी प्रत्येक माणूस आपल्या कळपातली एक गाय आणि दोन मेंढ्या वाचवून ठेवेल. २२  आणि भरपूर दूध असल्यामुळे, तो लोणी खाईल. देशात उरलेला प्रत्येक जण लोणी आणि मध खाईल. २३  त्या दिवशी, जिथे १,००० चांदीच्या तुकड्यांच्या किंमतीच्या १,००० द्राक्षवेली असायच्या, तिथे फक्‍त काटेरी झुडपं आणि जंगली गवत असेल. २४  संपूर्ण प्रदेश काटेरी झुडपांनी आणि जंगली गवताने भरून गेल्यामुळे माणसांना तिथे धनुष्यबाण घेऊन जावं लागेल. २५  आणि पूर्वी जे डोंगर कुदळीने साफ केले जायचे, तिथे आता काटेरी झुडपं आणि जंगली गवत असेल. त्यांच्या भीतीने तुम्ही त्या डोंगरांच्या जवळही जाणार नाहीत. ती बैलांसाठी चरण्याची आणि मेंढरांसाठी भटकण्याची ठिकाणं बनतील.”

तळटीपा

किंवा कदाचित, “त्यांना.”
म्हणजे “फक्‍त उरलेले लोक परत येतील.”
किंवा “कालवा.”
किंवा कदाचित, “दहशत बसवून.”
किंवा “त्याच्या भिंतींना खिंडार पाडू.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे “देव आपल्यासोबत आहे.”
किंवा “शिट्टी वाजवून.”
किंवा “मिसरमधल्या.”
म्हणजे, फरात नदी.