यहेज्केल १०:१-२२

  • चाकांच्या मधून आग घेतली जाते (१-८)

  • करुबांचं आणि चाकांचं वर्णन (९-१७)

  • देवाचं तेज मंदिरातून निघून जातं (१८-२२)

१०  मी बघत होतो, तेव्हा करुबांच्या डोक्याच्या वरती पसरलेल्या सपाट छतावर नीलमण्यासारखं काहीतरी मला दिसलं. त्याचा आकार राजासनासारखा होता.+ २  मग, मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाला+ देव म्हणाला: “करुबांच्या खाली, चाकांच्या मधे जा.+ आणि करुबांच्या मधून आपल्या हातांच्या ओंजळीत जळते निखारे घेऊन+ ते शहरावर फेक.”+ तेव्हा मी पाहिलं, की तो माणूस चाकांच्या मधे गेला. ३  तो माणूस आत गेला, त्या वेळी करूब मंदिराच्या उजवीकडे उभे होते. आणि मंदिराचं आतलं अंगण ढगाने भरून गेलं होतं. ४  तेव्हा, करुबांच्या वर असलेलं यहोवाचं तेज+ तिथून निघून मंदिराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर आलं. आणि मंदिर हळूहळू ढगाने भरून गेलं.+ मंदिराचं संपूर्ण अंगण यहोवाच्या तेजाने प्रकाशमय झालं होतं. ५  करुबांच्या पंखांचा आवाज बाहेरच्या अंगणापर्यंत ऐकू येत होता; पंखांचा तो आवाज सर्वशक्‍तिमान देव बोलत असल्यासारखा होता.+ ६  मग मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाला देव म्हणाला: “चाकांच्या मधून, करुबांच्या मधून आग घे.” तेव्हा तो आत जाऊन एका चाकाजवळ उभा राहिला. ७  मग त्या करुबांपैकी एकाने आपला हात पुढे करून करुबांच्या मधे असलेल्या आगीतून काही आग काढली,+ आणि ती मलमलीचे कपडे घातलेल्या माणसाच्या+ ओंजळीत टाकली. ती घेऊन तो माणूस बाहेर गेला. ८  त्या करुबांच्या पंखांखाली माणसाच्या हातासारखे हात होते.+ ९  मी बघत होतो, तेव्हा मला त्या करुबांच्या शेजारी चार चाकं दिसली; प्रत्येक करुबाच्या शेजारी एक चाक होतं. ती चाकं एकसारखीच असून चंद्रकांत रत्नासारखी झळकत होती.+ १०  ती चारही चाकं एकसारखीच दिसत होती. आणि त्यांची घडण अशी होती जसं काय एका चाकात दुसरं चाक बसवलं आहे. ११  ती चाकं पुढे जाताना चार दिशांपैकी पाहिजे त्या दिशेला, कुठेही न वळता सरळ जाऊ शकत होती. कारण करुबांचं डोकं ज्या दिशेला असायचं, त्याच दिशेला ती न वळता जायची. १२  त्यांच्या संपूर्ण शरीरावर, पाठीवर, हातांवर आणि पंखांवर डोळे होते. तसंच, त्या चार चाकांवरही सगळीकडे डोळे होते.+ १३  मग कोणीतरी त्या चाकांना, “गरगर फिरणारी चाकं!” असं म्हटल्याचं मी ऐकलं. १४  त्या प्रत्येकाला* चार तोंडं होती; पहिलं तोंड करुबाचं, दुसरं माणसाचं, तिसरं सिंहाचं आणि चौथं गरुडाचं.+ १५  हे करूब तेच जिवंत प्राणी होते, जे मी खबार नदीजवळ+ पाहिले होते. ते जेव्हा वर जायचे, १६  किंवा पुढे जायचे तेव्हा ती चाकंही त्यांच्यासोबत जायची. आणि पृथ्वीवरून वर उंच उडण्यासाठी ते करूब जेव्हा आपले पंख पसरायचे, तेव्हा ती चाकंही त्यांच्यासोबतच असायची; ती दुसरीकडे कुठेही वळायची नाहीत.+ १७  ते थांबले, की चाकंही थांबायची; ते वर गेले, की चाकंही त्यांच्यासोबत वर जायची. कारण, त्या जिवंत प्राण्यांवर कार्य करणारी पवित्र शक्‍ती* चाकांमध्येही होती. १८  मग मंदिराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर असलेलं यहोवाचं तेज+ तिथून निघालं आणि करुबांच्या वर येऊन थांबलं.+ १९  मग मी पाहिलं, की करुबांनी उडण्यासाठी आपले पंख पसरले आणि ते पृथ्वीवरून वर गेले. ते वर गेले तेव्हा चाकंही त्यांच्यासोबत होती. ते जाऊन यहोवाच्या मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या दरवाजाच्या प्रवेशाजवळ थांबले, आणि त्यांच्या वरती इस्राएलच्या देवाचं तेज होतं.+ २०  हे तेच जिवंत प्राणी होते, जे मी खबार नदीजवळ इस्राएलच्या देवाच्या राजासनाखाली पाहिले होते.+ त्यावरून मला समजलं, की ते करूब होते. २१  त्या चौघांनाही चार तोंडं आणि चार पंख होते. आणि त्यांच्या पंखांखाली माणसाच्या हातासारखे हात होते.+ २२  त्यांची तोंडं मी खबार नदीजवळ बघितलेल्या प्राण्यांसारखीच होती.+ ते सरळ पुढे जायचे.+

तळटीपा

म्हणजे, प्रत्येक करुबाला.