यहेज्केल १९:१-१४
-
इस्राएलच्या प्रधानांबद्दल एक शोकगीत (१-१४)
१९ “तू इस्राएलच्या प्रधानांबद्दल एक शोकगीत गा.
२ तू असं म्हण,
‘तुझी आई कोण होती? ती सिंहांमध्ये वावरणारी एक सिंहीण होती.
तिने तरुण आणि शक्तिशाली सिंहांमध्ये राहून आपल्या पिल्लांना वाढवलं.
३ तिने वाढवलेल्या पिल्लांपैकी एक पिल्लू नंतर शक्तिशाली तरुण सिंह बनला.+
तो शिकार करायला शिकला,त्याने माणसांनाही फाडून खाल्लं.
४ राष्ट्रांनी त्याच्याबद्दल ऐकलं, तेव्हा त्यांनी सापळा लावून त्याला खड्ड्यात पकडलं.
मग त्याच्या नाकात वेसण घालून त्यांनी त्याला इजिप्तला आणलं.+
५ सिंहिणीने त्याची फार वाट पाहिली. पण तो परतण्याची काहीच आशा नाही हे तिने ओळखलं.
मग तिने आपल्या पिल्लांपैकी दुसऱ्या एका पिल्लाला घेतलं,आणि त्याला एक शक्तिशाली तरुण सिंह बनवून पाठवलं.
६ तोसुद्धा इतर सिंहांमध्ये वावरला आणि एक शक्तिशाली तरुण सिंह बनला.
तो शिकार करायला शिकला आणि त्याने माणसांना फाडून खाल्लं.+
७ तो दबक्या पावलांनी त्यांच्या मजबूत बुरुजांमध्ये फिरला,आणि त्याने त्यांची शहरं उद्ध्वस्त केली,उजाड पडलेल्या देशात सगळीकडे त्याची डरकाळी घुमू लागली.+
८ आसपासच्या प्रांतांतली सगळी राष्ट्रं त्याच्याविरुद्ध आली,जाळं टाकून पकडायला ती त्याच्याविरुद्ध आली,आणि त्यांनी खणलेल्या खड्ड्यात तो सापडला.
९ त्याच्या नाकात वेसण घालून त्यांनी त्याला पिंजऱ्यात टाकलं आणि बाबेलच्या राजाकडे आणलं.
इस्राएलच्या डोंगरांवर पुन्हा कधी त्याचा आवाज ऐकू येऊ नये, म्हणून त्यांनी त्याला तिथे कैद करून ठेवलं.
१० तुझी आई पाण्याच्या झऱ्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीसारखी होती.*+
भरपूर पाणी मिळत असल्यामुळे तिला खूप फांद्या फुटल्या आणि फळं आली.
११ तिच्या फांद्या वाढून मजबूत झाल्या;त्यांपासून शासकांचे राजदंड बनवता येतील इतक्या त्या मजबूत झाल्या.
ती द्राक्षवेल वाढत गेली आणि इतर झाडांपेक्षा खूप उंच झाली.
ती उंच असल्यामुळे आणि तिला भरपूर हिरव्यागार फांद्या असल्यामुळे ती लांबूनही दिसू लागली.
१२ पण क्रोधाच्या झपाट्यात तिला उपटून+ जमिनीवर फेकण्यात आलं,आणि पूर्वेकडच्या वाऱ्याने तिची फळं सुकवून टाकली.
तिच्या मजबूत फांद्या छाटून टाकण्यात आल्या,त्या वाळून गेल्या+ आणि आगीने त्यांना भस्म करून टाकलं.+
१३ आता तिला ओसाड रानात,कोरड्या आणि रुक्ष प्रदेशात लावण्यात आलंय.+
१४ तिच्या फांद्यांतली आग पसरली आणि त्या आगीने तिच्या डहाळ्या आणि फळं भस्म करून टाकली.
त्यामुळे एकही मजबूत फांदी उरली नाही, आणि शासनासाठी राजदंडही उरला नाही.+
हे एक शोकगीत आहे, आणि ते नेहमी शोकगीत म्हणून गायलं जाईल.’”
तळटीपा
^ शब्दशः “तुझी आई तुझ्या रक्तातल्या द्राक्षवेलीसारखी होती.”