यहेज्केल २३:१-४९

  • विश्‍वासघात करणाऱ्‍या दोन बहिणी (१-४९)

    • अहलाचा अश्‍शूरसोबत व्यभिचार (५-१०)

    • अहलीबाचा बाबेल आणि इजिप्तसोबत व्यभिचार (११-३५)

    • दोन्ही बहिणींना शिक्षा (३६-४९)

२३  मग पुन्हा एकदा यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: २  “मनुष्याच्या मुला, ऐक! दोन स्त्रिया होत्या. दोघी एकाच आईच्या पोटी जन्माला आल्या होत्या.+ ३  अगदी तरुणपणापासूनच त्या इजिप्तमध्ये वेश्‍या बनल्या+ आणि व्यभिचार करू लागल्या. तिथे त्यांचे स्तन कुरवाळण्यात आले आणि त्यांनी आपलं कौमार्य गमावलं. ४  त्यांच्यापैकी मोठीचं नाव अहला,* तर तिच्या बहिणीचं नाव अहलीबा.* त्या दोघी माझ्या झाल्या आणि त्यांनी मुलामुलींना जन्म दिला. अहला म्हणजे शोमरोन+ आणि अहलीबा म्हणजे यरुशलेम. ५  अहला माझी असूनही वेश्‍येसारखी वागू लागली.+ वासना पूर्ण करायला ती आपल्या प्रियकरांच्या मागे जाऊ लागली;+ ती आपल्या शेजाऱ्‍यांच्या, अश्‍शूरी लोकांच्या मागे गेली.+ ६  तिचे प्रियकर निळी वस्त्रं घालणारे राज्यपाल आणि उपअधिकारी होते. ते सगळे देखणे तरुण असून घोड्यांवर स्वारी करायचे. ७  ती अश्‍शूरच्या सगळ्यात प्रतिष्ठित पुरुषांसोबत व्यभिचार करू लागली. तसंच, आपली वासना पूर्ण करायला ती ज्यांच्या मागे गेली, त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या* नादी लागून तिने स्वतःला अशुद्धही केलं.+ ८  इजिप्तमध्ये असताना तिने जी वेश्‍येची कामं केली, ती तिने सोडली नाहीत. तिच्या तरुणपणात त्यांनी तिच्याशी संबंध ठेवले होते आणि तिचे स्तन कुरवाळले होते. आपल्या वासनांनी उत्तेजित होऊन त्यांनी तिच्याशी व्यभिचार केला होता.+ ९  म्हणून मग मी तिला तिच्या प्रियकरांच्या हवाली केलं; आपल्या कामवासना पूर्ण करायला ती ज्या अश्‍शूरच्या माणसांच्या मागे जायची त्यांच्या हवाली मी तिला केलं.+ १०  त्यांनी तिची लाज उघडी केली,+ तिच्या मुलामुलींना तिच्यापासून हिरावून घेतलं+ आणि तिला तलवारीने मारून टाकलं. स्त्रियांमध्ये ती पार बदनाम झाली होती, आणि तिला शिक्षा करण्यात आली. ११  तिची बहीण अहलीबा हिने हे सगळं पाहिलं. पण तरी आपल्या कामवासना पूर्ण करायला ती आणखी खालच्या थराला गेली. तिने आपल्या बहिणीपेक्षाही जास्त भयंकर वेश्‍येची कामं केली.+ १२  आपल्या वासना तृप्त करायला ती तिच्या शेजाऱ्‍यांच्या, अश्‍शूरच्या माणसांच्या मागे लागली.+ ते सगळे सुंदर वस्त्रं घालणारे राज्यपाल आणि उपअधिकारी होते. ते देखणे तरुण असून घोड्यांवर स्वारी करायचे. १३  तिने स्वतःला भ्रष्ट केलं, तेव्हा मी पाहिलं की त्या दोघींचं वागणं एकसारखंच होतं.+ १४  पण अहलीबा तिची वेश्‍येची कामं आणखी वाढवत राहिली. तिने भिंतींवर पुरुषांच्या कोरलेल्या प्रतिमा पाहिल्या; त्या लाल रंगाने रंगवलेल्या खास्दी माणसांच्या प्रतिमा होत्या. १५  त्यांच्या कमरेभोवती पट्टे आणि डोक्यांवर लांब फेटे होते. ते सगळे शूर योद्ध्यांसारखे दिसत होते. त्यांचं स्वरूप खास्द्यांच्या देशात जन्माला आलेल्या बाबेलच्या लोकांसारखं होतं. १६  त्यांना पाहताच ती वासनेने उत्तेजित झाली आणि तिने खास्द्यांच्या देशात त्यांच्याकडे आपले दूत पाठवले.+ १७  म्हणून बाबेलची माणसं आपलं प्रेम उधळायला तिच्या पलंगावर तिच्याकडे येत राहिली. तिच्याशी व्यभिचार करून त्यांनी तिला भ्रष्ट केलं. पण, भ्रष्ट झाल्यावर तिला त्यांची किळस वाटू लागली आणि तिने त्यांच्याकडे आपली पाठ फिरवली. १८  ती निर्लज्जपणे व्यभिचार करून आपली लाज उघडी करत राहिली,+ तेव्हा मला तिची किळस वाटली. म्हणून मी जसं तिच्या बहिणीच्या बाबतीत केलं, तसंच तिच्याही बाबतीत केलं; मी तिच्याकडे आपली पाठ फिरवली.+ १९  तिने इजिप्तमध्ये आपल्या तरुणपणाच्या दिवसांत जी वेश्‍येची कामं केली होती, ते दिवस आठवून+ ती आपली व्यभिचारी कृत्यं आणखी वाढवत राहिली.+ २०  एखादी उपपत्नी जशी गाढवाच्या आणि घोड्याच्या लिंगासारखं लिंग असलेल्या आपल्या पुरुषाच्या मागे जाते, तशी लैंगिक इच्छा अनावर होऊन ती आपल्या प्रियकरांच्या मागे गेली. २१  हे अहलीबा! तू तरुण असताना इजिप्तमध्ये त्यांनी तुझे स्तन कुरवाळले;+ आणि तशा अश्‍लील कामांसाठी तू आतुर झालीस.+ २२  म्हणून हे अहलीबा, ऐक! सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी तुझ्या प्रियकरांना तुझ्या विरोधात उठवीन;+ तुला ज्यांची किळस आली आणि ज्यांच्याकडे तू आपली पाठ फिरवलीस, त्या तुझ्या प्रियकरांना मी चारही दिशांनी तुझ्या विरोधात आणीन.+ २३  मी बाबेलच्या पुरुषांना+ आणि सगळ्या खास्दी माणसांना,+ तसंच पकोड,+ शोआ आणि कोआ इथल्या माणसांना आणि अश्‍शूरच्या पुरुषांना तुझ्या विरोधात आणीन. ते सगळे राज्यपाल आणि उपअधिकारी, योद्धे आणि खास निवडलेले पुरुष असून घोड्यांवर स्वारी करणारे देखणे तरुण आहेत. २४  ते रथांच्या आणि चाकांच्या खडखडाटासह मोठं सैन्यदल घेऊन तुझ्यावर तुटून पडतील. ते सगळे मोठ्या व छोट्या ढाली* घेऊन, डोक्यावर टोप घालून तुझ्यावर हल्ला करतील. तुला घेरायला ते तुझ्या चारही बाजूंना तैनात होतील. मी त्यांना तुझा न्याय करायचा अधिकार देईन आणि त्यांना योग्य वाटेल तशी शिक्षा ते तुला करतील.+ २५  मी तुझ्यावर माझा सगळा राग काढीन आणि ते क्रोधित होऊन तुझा चांगलाच समाचार घेतील. ते तुझं नाक आणि कान कापून टाकतील आणि तुझ्यात उरलेले लोक तलवारीने मारले जातील. ते तुझ्या मुलामुलींना तुझ्यापासून हिसकावून नेतील आणि तुझ्यात उरलेली माणसं आगीत जळून भस्म होतील.+ २६  ते तुला उघडीनागडी करतील+ आणि तुझे सुंदर दागदागिने लुटून नेतील.+ २७  इजिप्तमध्ये सुरू झालेल्या+ तुझ्या वेश्‍येच्या कामांचा आणि अश्‍लील कृत्यांचा मी अंत करून टाकीन.+ तू त्यांच्याकडे* पाहायचं सोडून देशील आणि पुन्हा कधीच तुला इजिप्तची आठवण येणार नाही.’ २८  कारण सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘बघ! तू ज्यांचा द्वेष करतेस त्यांच्या हाती मी तुला देईन; किळस येऊन ज्यांच्याकडे तू आपली पाठ फिरवलीस, त्यांच्या हवाली मी तुला करीन.+ २९  ते मोठ्या तिरस्काराने तुझा समाचार घेतील. ज्या गोष्टी मिळवायला तू बरीच मेहनत केली होतीस,+ त्या सगळ्या गोष्टी ते लुटून नेतील आणि तुला उघडीनागडी करून टाकतील. तू निर्लज्जपणे केलेला व्यभिचार, तुझी अश्‍लील कृत्यं आणि तू केलेली वेश्‍येची सगळी कामं उघड होतील.+ ३०  तू एखाद्या वेश्‍येसारखं राष्ट्रांच्या मागे गेलीस+ आणि त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या नादी लागून स्वतःला अशुद्ध केलंस,+ म्हणून या सगळ्या गोष्टी तुझ्या वाट्याला येतील. ३१  तू अगदी तुझ्या बहिणीच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललीस,+ म्हणून मी तिचा प्याला तुझ्या हाती देईन.’+ ३२  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तू आपल्या बहिणीच्या खोल आणि रुंद प्याल्यातून पिशील,+लोकांमध्ये तू थट्टेचा आणि हसण्याचा विषय होशील. कारण तो प्याला याच गोष्टींनी काठोकाठ भरलाय.+ ३३  तुझ्या बहिणीचा, शोमरोनचा प्याला दहशतीने आणि नाशाने भरलाय. तो पिऊन तू नशेत आणि दुःखात पार बुडून जाशील. ३४  तुला तो प्याला प्यावाच लागेल,पिऊन तुला तो रिकामा करावाच लागेल.+ प्याल्याची खापरं तू कुरतडून खाशील,आणि आपली छाती दुःखाने ओरबाडशील. “कारण मी स्वतः हे बोललोय,” असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.’ ३५  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तू मला विसरून गेलीस आणि माझ्याकडे पाठ फिरवलीस.+ म्हणून तुझ्या अश्‍लील कृत्यांचे आणि वेश्‍येच्या कामांचे परिणाम तुला भोगावेच लागतील.’” ३६  मग यहोवा मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, तू अहला आणि अहलीबा+ यांच्यावर न्यायदंड घोषित करशील का? त्यांनी केलेली घृणास्पद कामं तू त्यांना दाखवून देशील का? ३७  त्या दोघींनी घृणास्पद मूर्तींसोबत व्यभिचार केलाय+ आणि त्यांचे हात रक्‍ताने माखलेत. त्यांनी नुसता व्यभिचारच केला नाही, तर त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या मुलांचाही त्यांनी आपल्या मूर्तींना अन्‍न म्हणून आगीत होम केला.+ ३८  शिवाय, त्या माझ्यासोबत असंही वागल्या: त्यांनी माझं मंदिर भ्रष्ट करून टाकलं आणि माझे शब्बाथ अपवित्र केले. ३९  ज्या दिवशी त्यांनी घृणास्पद मूर्तींसाठी अर्पण म्हणून आपल्या मुलांची कत्तल केली,+ त्याच दिवशी त्यांनी माझ्या मंदिरात येऊन ते अपवित्र केलं.+ त्यांनी माझ्या स्वतःच्या घरात असं केलं. ४०  त्यांनी दूत पाठवून दूरदूरच्या ठिकाणांहून पुरुषांना बोलावून घेतलं.+ आणि ते मार्गात असताना, हे अहलीबा! तू अंघोळ करून डोळ्यांत काजळ घातलंस. तू दागदागिने घालून नटलीस,+ ४१  आणि एका आलिशान दिवाणावर जाऊन बसलीस.+ त्यासमोर असलेल्या मेजावर+ तू माझं तेल+ आणि माझा सुगंधी धूप+ ठेवलास. ४२  तिथे चैनबाजी करणाऱ्‍या लोकांच्या जमावाचा आवाज ऐकू आला. त्यांच्यामध्ये ओसाड रानातून बोलावलेले दारुडेही होते. त्यांनी त्या दोन्ही स्त्रियांच्या हातांत बांगड्या घातल्या आणि त्यांच्या डोक्यांवर सुंदर मुकुट ठेवले. ४३  तेव्हा व्यभिचार करून-करून थकलेल्या त्या स्त्रीबद्दल मी म्हणालो: ‘हिची वेश्‍येची कामं तरीही चालूच राहतील.’ ४४  माणसं वेश्‍येकडे जातात तसं ते तिच्याकडे जात राहिले. अशा प्रकारे, ते अश्‍लील कृत्यं करणाऱ्‍या स्त्रियांकडे, अहला आणि अहलीबा यांच्याकडे गेले. ४५  पण तिने केलेल्या व्यभिचारामुळे आणि रक्‍तपातामुळे+ नीतिमान माणसं तिचा योग्य न्याय करतील.+ कारण त्या दोघीही व्यभिचार करणाऱ्‍या स्त्रिया आहेत, आणि त्यांचे हात रक्‍ताने भरलेले आहेत.+ ४६  सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘त्या दोघींवर हल्ला करायला एक मोठं सैन्य आणलं जाईल. त्यांना लुटलं जाईल आणि त्यांची अशी अवस्था केली जाईल, की पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल.+ ४७  ते सैन्य त्यांना दगडमार करेल+ आणि तलवारीने त्यांची कत्तल करेल. ते त्यांच्या मुलामुलींना मारून टाकेल+ आणि त्यांची घरंदारं जाळून टाकेल.+ ४८  मी देशातल्या सगळ्या अश्‍लील कृत्यांचा अंत करून टाकीन. त्यावरून सगळ्या स्त्रिया धडा घेतील. तुमच्या अश्‍लील कृत्यांचं त्या कधीच अनुकरण करणार नाहीत.+ ४९  तुम्ही केलेल्या अश्‍लील कामांचे परिणाम आणि घृणास्पद मूर्तींसोबत केलेल्या पापांचे परिणाम ते तुमच्यावरच उलटवतील. तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी सर्वोच्च प्रभू यहोवा आहे.’”+

तळटीपा

म्हणजे, “माझा तंबू तिच्यामध्ये आहे.”
म्हणजे, “तिचा तंबू.”
इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
सहसा तिरंदाजांजवळ असणारी छोटी ढाल.
म्हणजे, इजिप्तच्या लोकांकडे.