यहेज्केल ३७:१-२८
३७ मग यहोवाची शक्ती माझ्यावर कार्य करू लागली.* यहोवाने आपल्या पवित्र शक्तीने* मला खोऱ्याच्या मधोमध आणलं.+ ते खोरं पूर्णपणे हाडांनी भरलेलं होतं.
२ मग त्याने मला त्या हाडांमधून सगळीकडे फिरायला लावलं. तेव्हा मी पाहिलं, की खोऱ्यात सगळीकडे हाडंच-हाडं पसरली आहेत आणि ती खडखडीत वाळून गेली आहेत.+
३ त्याने मला विचारलं: “मनुष्याच्या मुला, ही हाडं पुन्हा जिवंत होऊ शकतात का?” त्यावर मी म्हणालो: “सर्वोच्च प्रभू यहोवा, हे तूच सांगू शकतोस.”+
४ तेव्हा तो मला म्हणाला: “या हाडांबद्दल भविष्यवाणी कर आणि त्यांना असं म्हण, ‘सुकून गेलेल्या हाडांनो! यहोवा काय म्हणतो ते ऐका:
५ सर्वोच्च प्रभू यहोवा या हाडांना असं म्हणतो: “मी तुमच्यात श्वास फुंकीन आणि तुम्ही परत जिवंत व्हाल.+
६ मी तुमच्यावर स्नायू, मांस आणि त्वचा चढवीन. मी तुमच्यात श्वास फुंकीन आणि तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे.”’”
७ म्हणून, मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. भविष्यवाणी करताच मला हाडांच्या खडखडण्याचा आवाज आला. आणि ती हाडं एकमेकांना जुळू लागली.
८ मी पाहिलं की त्यांच्यावर स्नायू, मांस आणि त्वचा चढत आहे. पण त्यांच्यात अजूनही श्वास नव्हता.
९ मग तो मला म्हणाला: “वाऱ्याला भविष्यवाणी कर. मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी करून वाऱ्याला सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे वाऱ्या!* चारही दिशांनी ये, आणि कत्तल झालेल्या या लोकांवर वाहा; म्हणजे ते जिवंत होतील.”’”
१० म्हणून, त्याने मला सांगितलं होतं त्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. तेव्हा त्यांच्यामध्ये श्वास आला आणि ते जिवंत होऊन आपल्या पायांवर उभे राहू लागले.+ पाहता-पाहता एक अतिशय मोठं सैन्य तयार झालं.
११ मग तो मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, ही हाडं म्हणजे इस्राएलचं संपूर्ण घराणं.+ बघ, ते असं म्हणत आहेत, ‘आपली हाडं वाळून गेली आहेत. आपल्याला काहीच आशा नाही.+ आपला पूर्णपणे नाश झालाय.’
१२ म्हणून तू भविष्यवाणी करून त्यांना सांग: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, “मी तुमच्या कबरी उघडीन.+ माझ्या लोकांनो! मी तुम्हाला तुमच्या कबरींतून बाहेर काढीन आणि तुम्हाला इस्राएल देशात परत आणीन.+
१३ माझ्या लोकांनो! मी जेव्हा तुमच्या कबरी उघडून तुम्हाला बाहेर काढीन, तेव्हा तुम्हाला कळेल की मी यहोवा आहे.”’+
१४ ‘मी तुमच्यात माझी पवित्र शक्ती घालीन आणि तुम्ही जिवंत व्हाल.+ मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. मग तुम्हाला समजेल, की मी यहोवा स्वतः हे बोललोय आणि मी ते पूर्णही केलंय,’ असं यहोवा म्हणतो.”
१५ मग परत एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला:
१६ “मनुष्याच्या मुला, दोन काठ्या घे. एका काठीवर, ‘यहूदासाठी आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या लोकांसाठी,’ असं लिही.+ आणि दुसऱ्या काठीवर, ‘योसेफसाठी आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या घराण्यासाठी एफ्राईमची काठी,’ असं लिही.+
१७ मग त्या दोन्ही काठ्या एकत्र जोडून धर, म्हणजे तुझ्या हातात त्यांची एकच काठी होईल.+
१८ तुझे लोक जेव्हा तुला विचारतील, ‘या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ होतो हे आम्हाला सांगशील का?’
१९ तेव्हा त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मी एफ्राईमच्या हातात असलेल्या योसेफच्या काठीला आणि त्याच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या वंशांना घेऊन यहूदाच्या काठीला जोडीन. मी त्यांना एक काठी करीन,+ आणि ते माझ्या हातात एक होतील.”’
२० तू ज्या काठ्यांवर लिहिशील त्या आपल्या हातात धर, म्हणजे लोकांना त्या दिसतील.
२१ मग त्यांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “ज्या सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएली लोक गेले आहेत, तिथून मी त्यांना काढून आणीन. मी त्यांना चारही दिशांहून गोळा करीन आणि परत त्यांच्या देशात घेऊन येईन.+
२२ मी देशात, इस्राएलच्या डोंगरांवर त्यांचं एक राष्ट्र बनवीन.+ त्या सगळ्यांवर एकच राजा राज्य करेल.+ आणि त्यापुढे ते दोन वेगळे राष्ट्रं किंवा विभाजित झालेली दोन राज्यं म्हणून राहणार नाहीत.+
२३ परत कधीच ते आपल्या घृणास्पद मूर्तींनी,* आपल्या किळसवाण्या रितीरिवाजांनी आणि आपल्या सगळ्या अपराधांनी स्वतःला अशुद्ध करणार नाहीत.+ त्यांनी माझ्याशी अविश्वासूपणे वागून जी सगळी पापं केली, ती सोडून द्यायला मी त्यांना मदत करीन आणि त्यांना शुद्ध करीन. ते माझे लोक होतील आणि मी स्वतः त्यांचा देव होईन.+
२४ माझा सेवक दावीद त्यांचा राजा बनेल,+ आणि त्या सगळ्यांचा एकच मेंढपाळ असेल.+ ते माझ्या न्याय-निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझ्या कायद्यांचं काळजीपूर्वक पालन करतील.+
२५ मी माझा सेवक याकोब याला जो देश दिला होता आणि तुमचे पूर्वज जिथे राहिले होते,+ त्या देशात ते कायम राहतील;+ ते, त्यांची मुलं आणि त्यांच्या मुलांची मुलं कायम त्या देशात वस्ती करतील.+ आणि माझा सेवक दावीद सर्वकाळासाठी त्यांचा प्रधान असेल.+
२६ मी त्यांच्यासोबत शांतीचा एक करार करीन;+ तो करार कायम टिकणारा असेल. मी त्यांना देशात वसवीन आणि त्यांची संख्या वाढवीन.+ आणि मी त्यांच्यामध्ये सर्वकाळासाठी माझं मंदिर स्थापन करीन.
२७ माझा तंबू त्यांच्यामध्ये* असेल. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.+
२८ माझं मंदिर जेव्हा कायम त्यांच्यामध्ये राहील, तेव्हा सगळ्या राष्ट्रांना कळून येईल की इस्राएलला पवित्र करणारा मी यहोवा आहे.”’”+
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “यहोवाचा हात माझ्यावर होता.”
^ किंवा “हे श्वासा.”
^ इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
^ किंवा “त्यांच्यावर.”