यहोशवा १०:१-४३

  • इस्राएली लोक गिबोनी लोकांना युद्धात मदत करतात (१-७)

  • यहोवा इस्राएली लोकांसाठी लढतो (८-१५)

    • पळून चाललेल्या शत्रूंवर मोठ्या गारांचा पाऊस (११)

    • सूर्य स्थिर राहतो (१२-१४)

  • शत्रूंच्या पाचही राजांना ठार मारलं जातं (१६-२८)

  • दक्षिणेकडे असलेल्या शहरांवर कब्जा (२९-४३)

१०  यरुशलेमचा राजा अदोनी-सदेक याने ऐकलं, की यहोशवाने जसं यरीहो शहर आणि त्याच्या राजाच्या बाबतीत केलं,+ तसंच आय शहर आणि त्याच्या राजाच्या बाबतीतही केलं आहे;+ आणि त्या शहरावर कब्जा मिळवून त्याने त्याचा पूर्णपणे नाश केला आहे. तसंच, गिबोनी लोक इस्राएली लोकांशी शांतीचा करार करून त्यांच्यासोबत राहू लागले आहेत,+ हेसुद्धा त्याने ऐकलं, २  तेव्हा तो फार घाबरला.+ कारण गिबोन हे एखाद्या राजधानीसारखं मोठं शहर होतं. ते आय+ शहरापेक्षाही मोठं असून, त्यातले सर्व पुरुष योद्धे होते. ३  त्यामुळे यरुशलेमचा राजा अदोनी-सदेक याने हेब्रोनचा+ राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनचा राजा+ दबीर यांना असा संदेश पाठवला: ४  “गिबोनी लोकांनी यहोशवासोबत आणि इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार केलाय.+ म्हणून माझ्या मदतीला या; आपण मिळून गिबोनवर हल्ला करू.” ५  त्यामुळे गिबोनवर हल्ला करण्यासाठी पाच अमोरी+ राजे (म्हणजे यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन यांचे राजे) आपल्या सैन्यांसोबत एकत्र आले. आणि गिबोन शहराकडे जाऊन त्यांनी छावणी केली. ६  तेव्हा गिबोनी लोकांनी गिलगाल+ इथे यहोशवाला असा संदेश पाठवला: “आपल्या या दासांना सोडून देऊ नकोस.+ लवकर इकडे ये आणि आमची मदत कर! आम्हाला वाचव! कारण डोंगराळ प्रदेशातले सगळे अमोरी राजे आमच्याशी लढण्यासाठी एकत्र जमलेत.” ७  त्यामुळे यहोशवा आपल्या सगळ्या सैन्याला आणि शूर योद्ध्यांना घेऊन गिलगालमधून निघाला.+ ८  तेव्हा यहोवा यहोशवाला म्हणाला: “त्यांना घाबरू नकोस.+ कारण मी त्यांना तुझ्या हाती दिलंय.+ त्यांच्यातला एकही तुझ्यासमोर उभा राहू शकणार नाही.”+ ९  मग यहोशवा गिलगालहून निघाला आणि रात्रभर प्रवास करून त्याने अचानक शत्रूंवर हल्ला केला. १०  यहोवाने इस्राएलसमोर त्यांच्या शत्रूंना गोंधळात टाकलं,+ आणि इस्राएली सैनिकांनी गिबोनमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची कत्तल केली. इस्राएली सैनिकांनी वर बेथ-होरोनकडे जाणाऱ्‍या रस्त्याने त्यांचा पाठलाग केला, आणि अजेका व मक्केदापर्यंत त्यांना मारलं. ११  अमोरी लोक इस्राएलपासून पळ काढत बेथ-होरोनच्या उतारावर असताना, यहोवाने त्यांच्यावर मोठमोठ्या गारांचा पाऊस पाडला. बेथ-होरोनपासून अजेकापर्यंत त्यांच्यावर मोठ्या गारांचा पाऊस पडून ते मेले. खरंतर इस्राएली सैनिकांनी तलवारीने जितक्या लोकांना मारून टाकलं, त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक गारांमुळे मारले गेले. १२  यहोवाने ज्या दिवशी अमोरी लोकांना इस्राएलसमोर हरवलं, त्या दिवशी यहोशवा इस्राएली लोकांसमोर यहोवाला म्हणाला: “हे सूर्या, गिबोनवर+ स्थिर राहा;+ आणि हे चंद्रा, अयालोनच्या खोऱ्‍यावर स्थिर राहा!” १३  तेव्हा इस्राएलचं सैन्य शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर राहिला, आणि चंद्र आपल्या जागेवरून हलला नाही. याशारच्या पुस्तकात+ असं लिहिलेलं नाही का, की सूर्य आकाशाच्या मधोमध स्थिर राहिला आणि जवळजवळ संपूर्ण दिवस त्याने मावळण्याची घाई केली नाही? १४  असा दिवस त्यापूर्वी कधीही आला नव्हता किंवा त्यानंतरही कधी आला नाही, जेव्हा यहोवाने मानवाचं ऐकून असं केलं.+ कारण यहोवा इस्राएली लोकांसाठी लढत होता.+ १५  त्यानंतर यहोशवा सगळ्या इस्राएली सैनिकांसोबत गिलगाल इथे छावणीत परत आला.+ १६  यादरम्यान अमोरी लोकांचे पाच राजे पळून गेले आणि मक्केदा+ इथे एका गुहेत जाऊन लपले. १७  तेव्हा यहोशवाला असं सांगण्यात आलं: “ते पाच राजे मक्केदा+ इथे एका गुहेत लपले आहेत.” १८  म्हणून यहोशवा म्हणाला: “गुहेचं तोंड मोठ्या दगडांनी बंद करा आणि काही माणसांना तिथे पहारा द्यायला ठेवा. १९  पण बाकीच्या सैनिकांनी मात्र शत्रूंचा पाठलाग करून त्यांना ठार मारावं.+ त्यांना त्यांच्या शहरांच्या आत जाऊ देऊ नका. तुमचा देव यहोवा याने त्यांना तुमच्या हाती दिलंय.” २०  यहोशवाने आणि इस्राएली सैनिकांनी शत्रूंची इतकी मोठी कत्तल केली, की जवळजवळ त्यांच्या सगळ्या सैन्याचा नाश झाला. फक्‍त थोडेच लोक वाचले आणि मजबूत भिंती असलेल्या शहरांत पळून गेले. २१  त्यानंतर सगळे इस्राएली सैनिक मक्केदा इथे छावणीत यहोशवाकडे सुरक्षित परत आले. इस्राएलविरुद्ध एकही शब्द बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. २२  मग यहोशवा म्हणाला: “गुहेचं तोंड उघडा आणि त्या पाच राजांना माझ्यासमोर आणा.” २३  म्हणून त्यांनी गुहेतून यरुशलेमचा राजा, हेब्रोनचा राजा, यर्मूथचा राजा, लाखीशचा राजा आणि एग्लोनचा राजा, या पाच राजांना त्याच्यासमोर आणलं.+ २४  ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलावलं. आणि त्याच्यासोबत युद्धात गेलेल्या सैनिकांच्या अधिकाऱ्‍यांना तो म्हणाला: “पुढे या, आणि या राजांच्या मानांवर पाय ठेवा.” म्हणून ते पुढे आले आणि त्यांनी त्या राजांच्या मानांवर पाय ठेवले.+ २५  मग यहोशवा त्यांना म्हणाला: “घाबरू नका किंवा भिऊ नका.+ हिंमत धरा आणि खंबीर व्हा. कारण तुम्ही ज्या शत्रूंशी लढाल त्या सगळ्यांचं यहोवा असंच करेल.”+ २६  मग यहोशवाने त्या राजांना ठार मारून त्यांचे मृतदेह पाच वधस्तंभांवर* लटकवून ठेवले, आणि संध्याकाळपर्यंत ते मृतदेह तसेच लटकत राहिले. २७  मग सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाने ते मृतदेह वधस्तंभांवरून खाली काढायला सांगितले,+ आणि ज्या गुहेत ते राजे लपले होते, तिथेच ते मृतदेह फेकून देण्याची आज्ञा दिली. त्यानंतर गुहेचं तोंड मोठ्या दगडांनी बंद करण्यात आलं, आणि ते दगड आजपर्यंत तसेच आहेत. २८  त्या दिवशी यहोशवाने मक्केदावर+ कब्जा केला आणि त्याच्या राजाचा आणि तिथल्या सगळ्यांचा तलवारीने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवलं नाही.+ त्याने जसं यरीहोच्या राजाच्या बाबतीत केलं, तसंच मक्केदाच्या राजाच्या+ बाबतीतही केलं. २९  मग यहोशवा सर्व इस्राएली सैनिकांसोबत मक्केदामधून लिब्ना इथे गेला, आणि लिब्नाशी लढला.+ ३०  यहोवाने लिब्ना आणि त्याच्या राजालाही+ इस्राएली लोकांच्या हाती दिलं. त्यांनी तिथल्या सगळ्यांचा तलवारीने नाश केला; कोणालाही जिवंत सोडलं नाही. त्यांनी यरीहोच्या राजाचं जसं केलं होतं,+ तसंच लिब्नाच्या राजाचंही केलं. ३१  त्यानंतर यहोशवा सर्व इस्राएली सैनिकांसोबत लिब्नामधून निघून लाखीश+ इथे गेला, आणि तिथे छावणी करून ते त्यांच्याशी लढले. ३२  यहोवाने लाखीशला इस्राएली लोकांच्या हाती दिलं, आणि त्यांनी दुसऱ्‍या दिवशी त्याच्यावर कब्जा मिळवला. त्यांनी लिब्नाप्रमाणेच लाखीशमध्येही सगळ्यांचा तलवारीने नाश केला.+ ३३  गेजेरचा+ राजा होराम लाखीशच्या लोकांना मदत करण्यासाठी आला, पण यहोशवाने त्याला आणि त्याच्या लोकांना ठार मारलं. त्यातल्या एकालाही त्याने जिवंत सोडलं नाही. ३४  मग यहोशवा सर्व इस्राएली सैनिकांना घेऊन लाखीशमधून एग्लोन+ इथे गेला. तिथे छावणी करून ते एग्लोन शहराशी लढले. ३५  त्याच दिवशी त्यांनी एग्लोनवर कब्जा मिळवला, आणि लाखीशसारखंच तिथल्या सगळ्यांचा तलवारीने नाश केला.+ ३६  मग यहोशवा एग्लोनमधून सर्व इस्राएली सैनिकांना घेऊन हेब्रोन+ इथे गेला, आणि ते तिथल्या लोकांशी लढले. ३७  त्यांनी हेब्रोनवर कब्जा केला, आणि तिथल्या राजाचा, लोकांचा आणि आसपासच्या नगरांतल्या सगळ्यांचा तलवारीने नाश केला. त्यांनी एकालाही जिवंत सोडलं नाही. यहोशवाने एग्लोनसारखंच हेब्रोनचा आणि तिथल्या सगळ्यांचा नाश केला. ३८  शेवटी, यहोशवा सगळ्या इस्राएली सैनिकांसोबत दबीर+ इथे गेला आणि त्याने त्या शहराशी लढाई केली. ३९  त्याने दबीर शहर, त्याचा राजा आणि शहराच्या आसपासची नगरं यांवर कब्जा मिळवला. इस्राएली सैनिकांनी तिथल्या सगळ्यांचा तलवारीने नाश केला.+ त्यांनी कोणालाही जिवंत ठेवलं नाही.+ यहोशवाने हेब्रोनचं, तसंच लिब्ना आणि त्याच्या राजाचं जे केलं, तेच दबीर आणि त्याच्या राजाचंही केलं. ४०  यहोशवाने त्या संपूर्ण प्रदेशावर, म्हणजे सगळ्या डोंगराळ भागावर, नेगेबवर, शेफीलावर,*+ उतारांवर आणि तिथल्या सगळ्या राजांवर विजय मिळवला. त्याने कोणालाही जिवंत सोडलं नाही. इस्राएलचा देव यहोवा याने आज्ञा दिली होती,+ त्याप्रमाणे त्याने तिथल्या सर्वांचा नाश केला.+ ४१  यहोशवाने कादेश–बर्ण्यापासून+ गाझापर्यंतचा+ सगळा प्रदेश, गोशेनचा+ सगळा प्रदेश आणि गिबोनपर्यंतचा+ सगळा प्रदेश यांच्यावर कब्जा मिळवला. ४२  यहोशवाने तिथल्या सगळ्या राजांना आणि त्यांच्या सगळ्या प्रदेशाला एकाच वेळेस जिंकून घेतलं. कारण इस्राएलचा देव यहोवा हा इस्राएलच्या बाजूने लढत होता.+ ४३  मग यहोशवा सगळ्या इस्राएली सैनिकांसोबत गिलगाल इथे छावणीत परत आला.+

तळटीपा

किंवा “झाडांवर.”
किंवा “टेकड्यांच्या प्रदेशावर.”