यहोशवा ११:१-२३

  • उत्तरेकडे असलेल्या शहरांवर कब्जा (१-१५)

  • यहोशवाने जिंकलेला प्रदेश (१६-२३)

११  हासोरचा राजा याबीन याने जेव्हा घडलेल्या गोष्टी ऐकल्या, तेव्हा त्याने मादोनचा राजा+ योबाब याला आणि शिम्रोनचा राजा व अक्षाफचा राजा+ यांना संदेश पाठवला. २  यासोबतच त्याने उत्तरेकडच्या डोंगराळ भागातल्या राजांना, किन्‍नेरेथच्या दक्षिणेकडे असलेल्या सपाट प्रदेशातल्या* राजांना, शेफीलातल्या व पश्‍चिमेकडे दोरच्या+ डोंगरांवर असलेल्या राजांना; ३  तसंच पूर्व व पश्‍चिमेकडे असलेले कनानी+ आणि डोंगराळ भागातले अमोरी,+ हित्ती, परिज्जी व यबूसी, आणि मिस्पामधल्या हर्मोन+ डोंगराच्या पायथ्याजवळ राहणारे हिव्वी+ यांना संदेश पाठवला. ४  तेव्हा ते सगळे आपल्या सैन्यांसोबत आले. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात घोडे आणि रथ होते. त्या सर्वांची संख्या समुद्रकिनाऱ्‍यावरच्या वाळूइतकी अगणित होती. ५  या सर्व राजांनी एकत्र येण्याचं ठरवलं, आणि इस्राएली लोकांशी लढण्यासाठी त्यांनी मेरोम सरोवराजवळ छावणी केली. ६  तेव्हा यहोवा यहोशवाला म्हणाला: “त्यांच्यामुळे घाबरून जाऊ नकोस.+ कारण उद्या या वेळी मी त्या सगळ्यांना तुझ्या हाती देईन आणि तू त्यांना मारून टाकशील. त्यांच्या घोड्यांच्या पायांच्या शिरा कापून टाक+ आणि त्यांचे रथ जाळून टाक.” ७  मग यहोशवाने आणि त्याच्या सैनिकांनी मेरोम सरोवराकडे येऊन अचानक शत्रूंवर हल्ला केला. ८  तेव्हा यहोवाने शत्रूंना इस्राएलच्या हाती दिलं,+ आणि इस्राएली लोकांनी त्यांच्यावर विजय मिळवला. इस्राएली लोकांनी मोठ्या सीदोनपर्यंत+ आणि मिस्रफोथ-माईमपर्यंत,+ तसंच पूर्वेकडे मिस्पेच्या खोऱ्‍यापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांना ठार मारलं; त्यांनी एकालाही जिवंत सोडलं नाही.+ ९  यहोवाने सांगितलं होतं तसंच यहोशवाने केलं; त्याने घोड्यांच्या पायांच्या शिरा कापून टाकल्या आणि रथ जाळून टाकले.+ १०  इतकंच नाही, तर यहोशवाने मागे येऊन हासोरवरही कब्जा केला आणि त्याच्या राजाला तलवारीने मारून टाकलं.+ कारण हासोर हे त्या सगळ्या राज्यांमध्ये प्रमुख होतं. ११  त्यांनी तिथल्या सगळ्या लोकांचा तलवारीने नाश केला;+ कोणालाही जिवंत सोडलं नाही.+ मग त्याने हासोर शहर जाळून टाकलं. १२  यहोशवाने त्या सर्व राजांच्या शहरांवर कब्जा केला आणि त्या राजांना तलवारीने मारून टाकलं.+ यहोवाचा सेवक मोशे याने त्याला आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे त्याने तिथल्या सर्वांचा पूर्णपणे नाश केला.+ १३  पण हासोर शहराशिवाय टेकड्यांवर असलेलं दुसरं कोणतंही शहर इस्राएली लोकांनी जाळलं नाही; हासोर शहर मात्र यहोशवाने जाळलं. १४  इस्राएली लोकांनी त्या शहरातली सगळी मालमत्ता आणि गुरंढोरं लुटली.+ पण त्यांनी तिथल्या सर्व लोकांचा तलवारीने नाश केला.+ त्यांनी एकालाही जिवंत सोडलं नाही.+ १५  यहोवाने आपला सेवक मोशे याला जी आज्ञा दिली होती, ती मोशेने यहोशवाला दिली;+ आणि यहोशवाने अगदी त्याप्रमाणेच केलं. यहोवाने मोशेला ज्या गोष्टी करण्याची आज्ञा दिली होती, त्यांपैकी एकही गोष्ट करण्याची यहोशवाने सोडली नाही.+ १६  यहोशवाने या सगळ्या प्रदेशांवर कब्जा मिळवला: सर्व डोंगराळ प्रदेश, संपूर्ण नेगेब,+ गोशेनचा सगळा प्रदेश, शेफीला,+ अराबा+ आणि इस्राएलचा डोंगराळ प्रदेश आणि त्याच्या पायथ्याशी असलेला टेकड्यांचा प्रदेश,* १७  म्हणजे सेईरजवळ असलेल्या हालाक डोंगरापासून, हर्मोन+ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनच्या खोऱ्‍यातल्या बाल-गादपर्यंतच्या+ सगळ्या प्रदेशावर त्याने कब्जा मिळवला. आणि तिथल्या सर्व राजांवर विजय मिळवून त्याने त्यांना मारून टाकलं. १८  या सगळ्या राजांसोबत यहोशवाने बऱ्‍याच काळापर्यंत युद्ध केलं. १९  गिबोनमध्ये राहणाऱ्‍या हिव्वी लोकांशिवाय इतर कोणीही इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार केला नाही.+ इस्राएली लोकांनी बाकीची सगळी शहरं युद्धं करून जिंकली.+ २०  यहोवाने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे,+ त्यांना कोणतीही दया न दाखवता त्यांचा पूर्णपणे नाश व्हावा,+ म्हणून यहोवाने त्यांची मनं कठोर होऊ दिली+ आणि त्यामुळे ते इस्राएली लोकांशी लढले. २१  त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेश, हेब्रोन, दबीर, अनाब यांमधल्या, तसंच यहूदाच्या आणि इस्राएलच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशांमधल्या अनाकी+ लोकांचा नाश केला; यहोशवाने त्यांचा आणि त्यांच्या शहरांचा पूर्णपणे नाश केला.+ २२  इस्राएलच्या संपूर्ण देशात एकही अनाकी उरला नाही; फक्‍त गाझा,+ गथ+ आणि अश्‍दोद+ इथेच थोडेफार अनाकी लोक उरले.+ २३  यहोवाने मोशेला वचन दिलं होतं त्याप्रमाणे यहोशवाने संपूर्ण देशावर ताबा मिळवला.+ मग यहोशवाने तो देश इस्राएली लोकांना त्यांच्या वंशांच्या हिश्‍शांप्रमाणे वारसा म्हणून वाटून दिला.+ त्यानंतर देशाला युद्धापासून आराम मिळाला.+

तळटीपा

किंवा “अराबातल्या.”
किंवा “शेफीला.”