यहोशवा १३:१-३३

  • ताब्यात घेण्यासाठी बाकी असलेला प्रदेश (१-७)

  • यार्देनच्या पूर्वेकडे वाटून देण्यात आलेला प्रदेश (८-१४)

  • रऊबेनचा वारसा (१५-२३)

  • गादचा वारसा (२४-२८)

  • पूर्वेकडे असलेला मनश्‍शेचा वारसा (२९-३२)

  • यहोवा हाच लेवी वंशाचा वारसा (३३)

१३  आता यहोशवा वृद्ध झाला होता आणि त्याचं आयुष्य संपत आलं होतं.+ त्यामुळे यहोवा त्याला म्हणाला: “तू वयोवृद्ध झाला आहेस आणि तुझं आयुष्य संपत आलंय; पण अजूनही बराचसा प्रदेश ताब्यात घ्यायचा* बाकी आहे. २  जो प्रदेश बाकी आहे+ तो म्हणजे: पलिष्टी आणि गशूरी+ लोकांचा संपूर्ण प्रदेश. ३  (हा इजिप्तच्या पूर्वेकडे* असलेल्या नाईल* नदीपासून, उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत पसरलेला आहे. हा कनानी लोकांचा प्रदेश समजला जायचा.)+ या प्रदेशात गाझा, अश्‍दोद,+ अष्कलोन,+ गथ+ आणि एक्रोन+ इथे राहणाऱ्‍या लोकांचाही प्रदेश येतो. यांवर पलिष्ट्यांचे पाच राजे+ राज्य करतात. याशिवाय दक्षिणेकडे असलेला अव्वीचा+ प्रदेश; ४  कनानी लोकांचा संपूर्ण प्रदेश, सीदोनी+ लोकांचा माराह आणि अमोरी लोकांच्या देशाच्या सीमेजवळ असलेल्या अफेकपर्यंतचा प्रदेश; ५  गिबली+ लोकांचा प्रदेश आणि हर्मोन डोंगराच्या पायथ्याजवळ असलेल्या बाल-गादपासून लेबो-हमाथपर्यंत*+ पूर्वेकडे असलेला संपूर्ण लबानोनचा प्रदेश; ६  लबानोन+ ते मिस्रफोथ–माईमपर्यंतच्या+ डोंगराळ भागात राहणाऱ्‍या सर्व लोकांचा प्रदेश, आणि सर्व सीदोनी+ लोकांचा प्रदेश. मी या प्रदेशांत राहणाऱ्‍या सगळ्या लोकांना इस्राएलपुढून हाकलून देईन.+ तू फक्‍त मी आज्ञा दिल्याप्रमाणे हा देश इस्राएली लोकांना वाटून दे;+ तो त्यांचा वारसा होईल. ७  तो इस्राएलच्या नऊ वंशांना आणि मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला वारसा म्हणून वाटून दे.”+ ८  मनश्‍शेच्या उरलेल्या अर्ध्या वंशाला, तसंच रऊबेन आणि गाद या वंशांना, यहोवाचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडे जो प्रदेश वारशात दिला होता तो त्यांनी घेतला.+ तो प्रदेश म्हणजे: ९  आर्णोन+ खोऱ्‍याच्या सीमेवर असलेल्या अरोएर+ शहरापासून, आणि त्याच खोऱ्‍याच्या मध्यभागी असलेल्या शहरापासून दीबोनपर्यंत पसरलेला मेदबाचा संपूर्ण पठारी प्रदेश; १०  आणि हेशबोनमधून राज्य करणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन, याची अम्मोनी लोकांच्या प्रदेशाच्या सीमेपर्यंत असलेली सगळी शहरं;+ ११  तसंच गिलादचा प्रदेश आणि गशूरी व माकाथी लोकांचा+ प्रदेश, हर्मोन डोंगराचा आणि सलकापर्यंत+ पसरलेला बाशानचा+ सगळा प्रदेश; १२  बाशानच्या ओग राजाचं संपूर्ण राज्य. (हा राजा उरलेल्या रेफाई लोकांपैकी होता.)+ तो अष्टरोथ आणि एद्रई इथे राज्य करायचा. मोशेने या सगळ्यांना हरवलं होतं आणि त्यांना देशातून हाकलून दिलं होतं.+ १३  पण इस्राएली लोकांनी गशूरी आणि माकाथी लोकांना देशातून हाकलून दिलं नाही.+ त्यामुळे ते आजपर्यंत इस्राएलमध्ये राहत आहेत. १४  फक्‍त लेवी वंशाला त्याने वारशात कोणताही प्रदेश दिला नाही.+ कारण त्याने त्यांना वचन दिलं होतं, की इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी अग्नीत जाळून केलेली अर्पणं हीच त्यांचा वारसा असतील.+ १५  मोशेने रऊबेन वंशाच्या घराण्यांना त्यांच्या हिश्‍शाप्रमाणे प्रदेश वारसा म्हणून वाटून दिला. १६  त्यांना वारशात मिळालेला प्रदेश म्हणजे: आर्णोन खोऱ्‍याच्या सीमेवर असलेल्या अरोएर शहरापासून, आणि त्याच खोऱ्‍याच्या मध्यभागी असलेल्या शहरापासून मेदबाचा संपूर्ण पठारी प्रदेश; १७  हेशबोन आणि पठारी प्रदेशातली सर्व नगरं,+ दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन,+ १८  याहस,+ कदेमोथ,+ मेफाथ,+ १९  किर्याथाईम, सिब्मा+ आणि खोऱ्‍याजवळच्या डोंगरावर असलेलं सरेथ-शाहार; २०  बेथ-पौर, पिसगाचे उतार,+ बेथ-यशिमोथ,+ २१  पठारी प्रदेशात असलेली सर्व शहरं आणि हेशबोनमधून+ राज्य करणारा अमोरी लोकांचा राजा सीहोन याचं संपूर्ण राज्य. मोशेने सीहोन राजाला, आणि त्याच प्रदेशात राहून त्याच्या हाताखाली राज्य करणाऱ्‍या मिद्यानच्या प्रधानांना, म्हणजे अवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा यांना हरवलं.+ २२  इस्राएली लोकांनी ज्यांना तलवारीने मारून टाकलं त्यांत बौरचा मुलगा बलामसुद्धा+ होता; तो शकुन पाहणारा होता.+ २३  यार्देन नदी ही रऊबेन वंशाच्या प्रदेशाची सीमा होती; हा प्रदेश आणि त्यातली सगळी शहरं व त्यांच्या आसपासच्या वस्त्या रऊबेन वंशाच्या घराण्यांसाठी असलेला वारसा होता. २४  मोशेने गाद वंशाच्या घराण्यांनासुद्धा त्यांच्या हिश्‍शाप्रमाणे प्रदेश वारसा म्हणून वाटून दिला. २५  त्यांना वारशात मिळालेला प्रदेश म्हणजे: याजेर+ आणि गिलादची सर्व शहरं आणि राब्बाच्या+ समोर असलेल्या अरोएरपर्यंतचा अम्मोनी+ लोकांचा अर्धा प्रदेश; २६  आणि हेशबोनपासून+ रामाथ-मिस्पे व बटोनीमपर्यंत, आणि महनाइमपासून+ दबीरच्या सीमेपर्यंतचा प्रदेश; २७  खोऱ्‍यात असलेलं बेथ-हाराम, बेथ-निम्रा,+ सुक्कोथ+ व साफोनचा प्रदेश, आणि हेशबोनमधून+ राज्य करणारा राजा सीहोन याचं उरलेलं राज्य. हा प्रदेश किन्‍नेरेथ*+ समुद्राच्या दक्षिणेकडे, यार्देनच्या पूर्वेला असून त्याची सीमा यार्देन नदी होती. २८  हा प्रदेश आणि त्यातली सगळी शहरं व त्यांच्या आसपासच्या वस्त्या गाद वंशाच्या घराण्यांसाठी असलेला वारसा होता. २९  मोशेने मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाच्या घराण्यांनाही त्यांच्या हिश्‍शाप्रमाणे प्रदेश वारसा म्हणून वाटून दिला.+ ३०  त्यांना वारशात मिळालेला प्रदेश म्हणजे: महनाइमपासून+ संपूर्ण बाशानपर्यंतचा प्रदेश, म्हणजेच बाशानचा राजा ओग याच्या संपूर्ण राज्यापर्यंत पसरलेला प्रदेश; आणि बाशानमध्ये असलेली याईरची+ सगळी खेडी* आणि ६० नगरं. ३१  गिलादचा अर्धा प्रदेश आणि बाशानचा राजा ओग याच्या राज्यातली अष्टरोथ व एद्रई+ ही शहरं मनश्‍शेचा मुलगा माखीर याच्या मुलांना,+ म्हणजे माखीरच्या अर्ध्या घराण्याला मिळाली. ३२  अशा प्रकारे मोशेने यरीहोच्या पूर्वेला, यार्देनच्या पलीकडे, मवाबच्या ओसाड रानात असताना त्यांना वारसा म्हणून प्रदेश वाटून दिला.+ ३३  पण लेवी वंशाला मात्र मोशेने वारसा म्हणून कोणताही प्रदेश दिला नाही.+ कारण त्याने वचन दिलं होतं, त्याप्रमाणे इस्राएलचा देव यहोवा हाच त्यांचा वारसा असणार होता.+

तळटीपा

किंवा “जिंकायचा.”
किंवा “शीहोर.”
शब्दशः “समोर.”
किंवा “हमाथच्या प्रवेशापर्यंत.”
म्हणजे, गनेसरेत सरोवर किंवा गालील समुद्र.
मूळ भाषेत हा शब्द अशा खेड्यांना सूचित करतो जिथे लोक तंबूंमध्ये राहतात.