यहोशवा १४:१-१५

  • यार्देनच्या पश्‍चिमेकडे वाटून देण्यात आलेला प्रदेश (१-५)

  • कालेबला हेब्रोन दिलं जातं (६-१५)

१४  एलाजार याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल वंशांच्या घराण्यांचे प्रमुख यांनी इस्राएली लोकांना कनान देशात त्यांच्या हिश्‍शाची जमीन वाटून दिली; आणि ती त्यांच्यासाठी वारसा असणार होती.+ २  यहोवाने मोशेद्वारे आज्ञा दिल्याप्रमाणे, साडेनऊ वंशांना ही जमीन चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आली.+ ३  मोशेने उरलेल्या अडीच वंशांना वारसा म्हणून यार्देनच्या पलीकडे*+ जमिनीचा वाटा दिला होता. पण इतर वंशांप्रमाणे त्याने लेवी वंशाला मात्र वारसा म्हणून कोणताही वाटा दिला नाही.+ ४  योसेफच्या वंशजांचे, मनश्‍शे आणि एफ्राईम+ असे दोन वंश मानले जायचे.+ लेव्यांना देशात जमिनीचा कोणताही वाटा मिळाला नाही; पण त्यांना राहण्यासाठी काही शहरं+ आणि त्यांच्या मालमत्तेसाठी व गुराढोरांसाठी काही कुरणं मात्र देण्यात आली.+ ५  यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना देश वाटून देण्यात आला. ६  मग यहूदा वंशाचे पुरुष गिलगाल+ इथे यहोशवाकडे आले, आणि कनिज्जी यफुन्‍नेचा मुलगा कालेब+ यहोशवाला म्हणाला: “खरा देव यहोवा याने तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल कादेश-बर्ण्या+ इथे त्याचा सेवक मोशे+ याला काय म्हटलं होतं, हे तुला चांगलं माहीत आहे.+ ७  यहोवाचा सेवक मोशे याने मला कादेश-बर्ण्यामधून देश हेरायला पाठवलं,+ तेव्हा मी ४० वर्षांचा होतो; आणि त्या देशाबद्दल मी सगळं काही अगदी खरं-खरं येऊन सांगितलं.+ ८  पण माझ्यासोबत गेलेल्या बांधवांनी अशी काही माहिती दिली, जी ऐकून लोक अतिशय घाबरून गेले.* मी मात्र माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलं.+ ९  त्या दिवशी मोशेने मला शपथ देऊन म्हटलं: ‘ज्या जमिनीला तुझे पाय लागले आहेत, ती जमीन तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी कायमचा वारसा होईल. कारण तू माझा देव यहोवा याचं पूर्ण मनाने ऐकलंस.’+ १०  इस्राएली लोक ओसाड रानातून प्रवास करत असताना+ यहोवाने माझ्याविषयी मोशेला वचन दिलं होतं,+ त्याप्रमाणे गेल्या ४५ वर्षांपासून यहोवाने मला सांभाळलंय;+ आज मी ८५ वर्षांचा आहे. ११  आणि मोशेने मला पाठवलं तेव्हा माझ्यात जितकी ताकद होती, तितकीच आजही आहे. युद्धासाठी आणि इतर कामांसाठी माझ्यात अजूनही आधीसारखीच ताकद आहे. १२  म्हणून यहोवाने त्या दिवशी वचन दिलं होतं त्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. तिथे अनाकी+ लोक मजबूत आणि मोठ्या भिंती असलेल्या शहरांत राहतात,+ हे तू त्या दिवशी ऐकलं होतंस. पण यहोवाने मला वचन दिल्याप्रमाणे, यहोवा नक्की माझ्यासोबत असेल,+ आणि मी त्या लोकांना शहरांतून हाकलून देईन.”+ १३  त्यामुळे यहोशवाने यफुन्‍नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला, आणि वारसा म्हणून हेब्रोन दिलं.+ १४  कनिज्जी यफुन्‍नेचा मुलगा कालेब याने पूर्ण मनाने इस्राएलचा देव यहोवा याचं ऐकलं, म्हणून त्याला हेब्रोन देण्यात आलं आणि ते आजपर्यंत त्याचा वारसा म्हणून आहे.+ १५  हेब्रोनचं पूर्वीचं नाव किर्याथ-अर्बा+ होतं. (अर्बा हा अनाकी लोकांमध्ये महान पुरुष होता.) त्यानंतर देशाला युद्धापासून आराम मिळाला.+

तळटीपा

म्हणजे, पूर्वेकडे.
शब्दशः “लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.”