यहोशवा १७:१-१८
१७ मग योसेफचा प्रथमपुत्र+ मनश्शे+ याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून+ जमिनीचा वाटा देण्यात आला. मनश्शेचा प्रथमपुत्र, म्हणजे गिलादचा पिता माखीर+ हा एक योद्धा होता. त्यामुळे त्याला गिलाद आणि बाशानचा+ प्रदेश मिळाला.
२ आणि मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना, म्हणजे अबियेजेर,+ हेलेक, अस्रीयेल, शखेम, हेफेर आणि शमीदा यांच्या मुलांना त्यांच्या घराण्यांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जमिनीचा वाटा देण्यात आला; हे सगळे, योसेफचा मुलगा मनश्शे याच्या वंशातून आलेले वेगवेगळ्या घराण्यांचे पुरुष होते.+
३ पण हेफेरचा मुलगा सलाफहाद+ याला एकही मुलगा नव्हता; त्याला सगळ्या मुलीच होत्या. सलाफहाद हा हेफेरचा, हेफेर हा गिलादचा, गिलाद हा माखीरचा आणि माखीर हा मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादच्या मुलींची नावं महला, नोआ, होग्ला, मिल्का आणि तिरसा अशी होती.
४ त्या मुली एलाजार+ याजक, नूनचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली लोकांचे प्रधान यांच्याकडे येऊन म्हणाल्या: “आम्हाला आमच्या भाऊबंदांमध्ये वारसा दिला जावा अशी आज्ञा यहोवाने मोशेला दिली होती.”+ त्यामुळे यहोवाच्या आज्ञेप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलांच्या भाऊबंदांसोबत वारसा देण्यात आला.+
५ मनश्शेच्या वंशाला यार्देनच्या पलीकडे* मिळालेल्या गिलाद आणि बाशान प्रदेशांशिवाय जमिनीचे आणखी दहा वाटे मिळाले;+
६ कारण मनश्शेच्या मुलांसोबत त्याच्या मुलींनासुद्धा वारसा मिळाला. आणि मनश्शेच्या बाकीच्या वंशजांना गिलादचा प्रदेश मिळाला.
७ मनश्शेच्या वंशाला मिळालेल्या प्रदेशाची सीमा आशेरपासून, शखेमच्या+ समोर असलेल्या मिखमथाथ+ इथपर्यंत होती; पुढे ती दक्षिणेकडे* असलेल्या एन-तप्पूहाच्या लोकांच्या प्रदेशापर्यंत गेली.
८ तप्पूहाचा+ प्रदेश मनश्शेचा झाला, पण मनश्शेच्या प्रदेशाच्या सीमेवर असलेलं तप्पूहा शहर मात्र एफ्राईमच्या वंशजांचं होतं.
९ तिथून मनश्शेच्या प्रदेशाची सीमा खाली कानाहच्या ओढ्याकडे, ओढ्याच्या दक्षिणेकडे गेली. तिथे मनश्शेच्या प्रदेशात एफ्राईमचीही काही शहरं होती,+ आणि मनश्शेच्या प्रदेशाची सीमा ओढ्याच्या उत्तरेकडे असून ती शेवटी समुद्रापर्यंत जाऊन संपली.+
१० सीमेच्या दक्षिणेकडचा प्रदेश एफ्राईम वंशाचा, तर उत्तरेकडचा प्रदेश मनश्शे वंशाचा होता. मनश्शेच्या प्रदेशाची एका बाजूची सीमा महासागर* होती,+ त्यांची* उत्तरेकडची सीमा आशेरच्या प्रदेशापर्यंत, आणि पूर्वेकडची सीमा इस्साखारच्या प्रदेशापर्यंत होती.
११ मनश्शे वंशाला इस्साखारच्या आणि आशेरच्या प्रदेशांत बेथ-शान, इब्लाम,+ दोर,+ एन-दोर,+ तानख+ आणि मगिद्दो ही शहरं आणि त्यांत राहणारे लोक देण्यात आले; यांपैकी तीन शहरं डोंगराळ भागातली होती. यासोबतच शहरांच्या आसपासची नगरंही मनश्शे वंशाला देण्यात आली.
१२ पण ते या शहरांवर कब्जा मिळवू शकले नाहीत; कारण कनानी लोक तिथून निघून जायला तयार नव्हते.+
१३ इस्राएली लोक जेव्हा शक्तिशाली झाले, तेव्हा त्यांनी कनानी लोकांना गुलाम बनवलं;+ पण त्यांनी त्यांना पूर्णपणे घालवून दिलं नाही.+
१४ योसेफचे वंशज यहोशवाला म्हणाले: “आजपर्यंत यहोवाचा आशीर्वाद आमच्यावर असल्यामुळे आमची संख्या खूप वाढली आहे.+ पण असं असूनही तू आम्हाला* वारसा म्हणून एकच वाटा*+ का दिलास?”
१५ तेव्हा यहोशवा त्यांना म्हणाला: “तुमची संख्या जर एवढी वाढली आहे आणि एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश+ तुम्हाला कमी पडतोय, तर परिज्जी+ व रेफाई+ लोकांच्या प्रदेशात जा, आणि तिथली जंगलं तोडून स्वतःसाठी जागा करा.”
१६ त्यावर योसेफचे वंशज म्हणाले: “हा डोंगराळ प्रदेश आम्हाला खरंच कमी पडतोय. शिवाय बेथ-शान+ खोऱ्यात आणि त्याच्या आसपासच्या नगरांत, तसंच इज्रेलच्या खोऱ्यात+ राहणाऱ्या कनानी लोकांकडे युद्धाचे लोखंडी रथ आहेत,+ आणि त्यांच्या चाकांना लांब सुऱ्या आहेत.”
१७ मग यहोशवा योसेफच्या घराण्याला, म्हणजे एफ्राईम आणि मनश्शे वंशांना म्हणाला: “तुम्ही खरोखरच संख्येने जास्त आहात आणि तुमचं सामर्थ्यही अफाट आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एक वाटा मिळणार नाही,+
१८ तर तुम्हाला डोंगराळ प्रदेशही मिळेल.+ तिथे जंगल असलं, तरी तुम्ही ते तोडून आपल्यासाठी जागा करू शकाल; आणि ती तुमच्या प्रदेशाची सीमा ठरेल. तिथले कनानी लोक जरी शक्तिशाली असले, आणि त्यांच्या लोखंडी रथांच्या चाकांना धारदार सुऱ्या असल्या, तरी तुम्ही नक्कीच त्यांना तिथून हाकलून द्याल.”+
तळटीपा
^ म्हणजे, पूर्वेकडे.
^ शब्दशः “उजवीकडे.”
^ म्हणजे, मनश्शेच्या लोकांची किंवा मनश्शेच्या प्रदेशाची.
^ म्हणजे, भूमध्य समुद्र.
^ शब्दशः “मला.”
^ शब्दशः “चिठ्ठ्या टाकून आणि प्रदेश मापून एकच वाटा.”