यहोशवा १८:१-२८

  • शिलो इथे बाकीचा देश वाटून देण्यात येतो (१-१०)

  • बन्यामीनला मिळालेला वारसा (११-२८)

१८  मग सगळे इस्राएली लोक शिलो+ इथे एकत्र जमले, आणि त्यांनी तिथे भेटमंडप उभा केला;+ कारण आतापर्यंत त्यांनी देश ताब्यात घेतला होता.+ २  पण इस्राएलचे असे सात वंश होते, ज्यांना अजूनही त्यांच्या हिश्‍शाचा वारसा वाटून देण्यात आला नव्हता. ३  त्यामुळे यहोशवा इस्राएली लोकांना म्हणाला: “तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने तुम्हाला जो देश दिलाय, तो ताब्यात घ्यायला तुम्ही आणखी किती दिवस टाळाटाळ कराल?+ ४  सगळ्या वंशांना आपापल्या वारशाची जमीन वाटून देता यावी, म्हणून प्रत्येक वंशातून माझ्यासाठी तीन माणसं निवडा. ते संपूर्ण देशाचा दौरा करतील आणि त्याची सगळी माहिती मिळवून माझ्याकडे परत येतील. ५  त्यांनी देशाचे सात वाटे करावेत.+ यहूदाचा वंश दक्षिणेकडे त्याच्याच प्रदेशात राहील,+ आणि योसेफचं घराणं उत्तरेकडे असलेल्या त्याच्याच प्रदेशात राहील.+ ६  म्हणून आता जा आणि देशाचा दौरा करा. त्याचे सात वाटे करा आणि त्याचा नकाशा तयार करून माझ्याकडे घेऊन या. मग कोणता वाटा कोणाला मिळावा हे ठरवण्यासाठी मी आपला देव यहोवा याच्यासमोर चिठ्ठ्या टाकीन.+ ७  पण लेवी वंशाला मात्र तुमच्यामध्ये कोणताही वाटा मिळणार नाही.+ कारण याजक म्हणून यहोवाची सेवा करणं हाच त्यांच्यासाठी वारसा आहे.+ गाद आणि रऊबेनचा वंश, तसंच मनश्‍शेचा अर्धा वंश+ यांना यहोवाचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडे दिलेला जमिनीचा वारसा त्यांना आधीच मिळालाय.” ८  मग देशाची माहिती मिळवायला ज्या माणसांना निवडलं होतं त्यांनी जायची तयारी केली. यहोशवाने त्यांना आज्ञा दिली: “जा आणि संपूर्ण देशाचा दौरा करा. त्याची सगळी माहिती मिळवून माझ्याकडे परत या. मग इथे शिलोमध्ये मी यहोवासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”+ ९  मग ती माणसं निघाली आणि त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. तिथे कोणकोणती शहरं आहेत याची नोंद त्यांनी पुस्तकात केली, आणि त्या प्रदेशाचे सात वाटे केले. त्यानंतर ते शिलो इथल्या छावणीत यहोशवाकडे परत आले. १०  मग यहोशवाने इस्राएली लोकांसाठी शिलोमध्ये यहोवासमोर चिठ्ठ्या टाकल्या;+ आणि त्यांच्या हिश्‍शांप्रमाणे त्यांना देश वाटून दिला.+ ११  पहिली चिठ्ठी बन्यामीन वंशाची निघाली. त्या वंशाच्या घराण्यांना मिळालेला प्रदेश हा यहूदा+ आणि योसेफ यांच्या प्रदेशाच्या मधे होता.+ १२  त्यांच्या प्रदेशाची उत्तरेकडची सीमा यार्देनपासून सुरू झाली. मग ती यरीहोच्या+ उत्तरेकडे असलेल्या उतारांवरून जाऊन, पश्‍चिमेकडे वर डोंगराळ प्रदेशात गेली. आणि तिथून पुढे ती बेथ-आवेनच्या+ ओसाड रानात गेली. १३  तिथून ती लूजच्या, म्हणजे बेथेलच्या+ दक्षिण उतारांकडे गेली. पुढे ती डोंगरावर असलेल्या अटारोथ-अद्दारपर्यंत+ गेली; हा डोंगर खालच्या बेथ-होरोनच्या+ दक्षिणेकडे आहे. १४  मग ही सीमा बेथ-होरोनच्या समोर असलेल्या डोंगरावरून दक्षिणेकडे वळली, आणि यहूदा वंशाचं शहर किर्याथ-बालपर्यंत, म्हणजे किर्याथ-यारीमपर्यंत+ येऊन संपली; ही बन्यामीन वंशाची पश्‍चिमेकडची सीमा. १५  दक्षिणेकडची सीमा किर्याथ-यारीमच्या टोकापासून सुरू झाली, आणि पश्‍चिमेकडे जाऊन पुढे नफ्तोहाच्या झऱ्‍यांपर्यंत+ गेली. १६  तिथून ती सीमा रेफाईम+ खोऱ्‍याच्या उत्तरेकडे, ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍याच्या’+ समोर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पोहोचली. पुढे ती खाली ‘हिन्‍नोम खोऱ्‍यात’ गेली आणि यबूसी+ शहराच्या दक्षिण उतारावरून एन-रोगेल+ इथे पोहोचली. १७  मग ती वळून उत्तरेकडे एन-शेमेशकडे गेली, आणि पुढे अदुम्मीमच्या+ चढासमोर असलेल्या गलीलोथपर्यंत जाऊन खाली बोहनच्या+ खडकाकडे+ निघाली; बोहन हा रऊबेनचा वंशज होता. १८  पुढे ती तशीच अराबाच्या समोर असलेल्या उत्तरेकडच्या उतारावरून खाली अराबाकडे गेली. १९  तिथून ती सीमा बेथ-होग्लाच्या+ उत्तरेकडच्या उतारावरून गेली, आणि क्षार समुद्राच्या*+ उत्तरेकडे असलेल्या खाडीजवळ, म्हणजे यार्देन नदीच्या दक्षिणेकडच्या मुखाजवळ जाऊन संपली. ही त्यांची दक्षिण सीमा आहे. २०  आणि यार्देन नदी ही त्यांची पूर्वेकडची सीमा आहे. बन्यामीन वंशाच्या घराण्यांना वारशात मिळालेल्या प्रदेशाची ही चारही बाजूंना असलेली सीमा होती. २१  बन्यामीन वंशाच्या घराण्यांना ही शहरं मिळाली: यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केझीस, २२  बेथ-अराबा,+ समाराईम, बेथेल,+ २३  अव्वीम, पारा, अफ्रा, २४  कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा;+ अशी एकूण १२ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. २५  गिबोन,+ रामा, बैरोथ, २६  मिस्पे, कफीरा, मोजा, २७  रेकेम, इरपैल तरला, २८  सेला,+ एलेफ, यबूसी म्हणजे यरुशलेम,+ गिबा+ आणि किर्याथ; अशी एकूण १४ शहरं आणि त्यांच्या आसपासच्या वस्त्या. हा बन्यामीन वंशाच्या घराण्यांना मिळालेला वारसा होता.

तळटीपा

म्हणजे, मृत समुद्र.