यहोशवा २:१-२४

  • यहोशवा दोन गुप्तहेरांना यरीहोत पाठवतो (१-३)

  • राहाब गुप्तहेरांना लपवते (४-७)

  • राहाबला दिलेली शपथ (८-२१क)

    • खूण म्हणून लाल रंगाचा दोर (१८)

  • गुप्तहेर यहोशवाकडे परत येतात (२१ख-२४)

 मग नूनचा मुलगा यहोशवा याने शिट्टिम+ इथून गुप्तपणे दोन हेर पाठवले. तो त्यांना म्हणाला: “जा, त्या देशाची आणि खासकरून यरीहो शहराची पाहणी करून या.” त्यामुळे ते निघाले आणि राहाब+ नावाच्या एका वेश्‍येच्या घरी येऊन राहिले. २  पण यरीहोच्या राजाला कोणीतरी सांगितलं, की आज रात्री काही इस्राएली माणसं देश हेरायला आली आहेत. ३  त्यामुळे यरीहोच्या राजाने राहाबला हुकूम पाठवला: “तुझ्या घरी राहत असलेल्या माणसांना बाहेर आण, कारण ती माणसं सगळा देश हेरायला आली आहेत.” ४  पण तिने त्या दोन गुप्तहेरांना लपवलं आणि ती म्हणाली: “हो, ती माणसं माझ्याकडे आली होती. पण ती कुठून आली होती ते मला माहीत नाही. ५  आणि अंधार पडल्यावर शहराचा दरवाजा बंद होण्याआधी ती निघून गेली. ती कुठे गेली माहीत नाही. पण तुम्ही जर लगेच त्यांचा पाठलाग केलात, तर त्यांना धरू शकाल.” ६  (खरंतर तिने त्यांना, घराच्या छतावर पसरवून ठेवलेल्या जवसाच्या ताटांमध्ये लपवून ठेवलं होतं.) ७  म्हणून राजाची माणसं त्यांचा पाठलाग करण्यासाठी यार्देनच्या उतारांपर्यंत+ गेली. ती बाहेर पडताच शहराचा दरवाजा बंद करण्यात आला. ८  मग गुप्तहेरांना झोप लागण्याआधी राहाब त्यांच्याकडे छतावर गेली. ९  ती त्यांना म्हणाली: “यहोवा हा देश तुम्हाला देईल+ याची मला पूर्ण खातरी आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे+ आणि तुमच्यामुळे देशातल्या सगळ्या लोकांचं धैर्य खचलंय.+ १०  कारण तुम्ही इजिप्तमधून* बाहेर पडलात तेव्हा यहोवाने तांबड्या समुद्रातलं पाणी कसं आटवलं ते आम्ही ऐकलंय.+ इतकंच नाही, तर यार्देनच्या पलीकडे* सीहोन+ आणि ओग+ या दोन अमोरी राजांचं तुम्ही काय केलं आणि त्यांचा पूर्णपणे कसा नाश केला हेसुद्धा आम्ही ऐकलंय. ११  ते ऐकून आमच्या काळजाचं पाणी पाणी झालंय, आणि आमच्यातल्या कोणालाही तुमचा सामना करायची हिंमत नाही. कारण तुमचा देव यहोवा हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा देव आहे.+ १२  तर आता यहोवाच्या नावाने मला वचन द्या, की जशी मी तुमच्यावर दया* केली तशी तुम्हीसुद्धा माझ्या वडिलांच्या घराण्यावर दया* कराल. आणि तुमचं वचन तुम्ही पाळाल याचा एखादा पुरावा* मला द्या. १३  माझ्या आईवडिलांना, माझ्या भाऊबहिणींना आणि त्यांच्या घरातल्या कोणालाही मारू नका; त्या सगळ्यांचा मृत्यूपासून बचाव करा.”+ १४  तेव्हा त्या माणसांनी तिला म्हटलं: “आम्ही इथे का आलो होतो हे जर तू गुप्त ठेवलंस, तर यहोवा जेव्हा हा देश आम्हाला देईल तेव्हा आम्ही तुला दया दाखवू आणि दिलेला शब्द पाळू. आम्ही जर आमचा शब्द मोडला, तर तुमच्याऐवजी आमचा जीव जावो!” १५  त्यानंतर तिने एका रस्सीच्या मदतीने त्यांना खिडकीतून खाली सोडलं. कारण तिचं घर शहराच्या भिंतीला लागून होतं; खरंतर तिचं घर शहराच्या भिंतीवरच होतं.+ १६  मग ती त्यांना म्हणाली: “डोंगरांकडे पळून जा आणि तीन दिवस तिथेच लपून राहा, म्हणजे पाठलाग करणाऱ्‍यांना तुम्ही सापडणार नाहीत. ते परत शहरात आल्यावर तुम्ही तुमच्या वाटेने जाऊ शकता.” १७  ती माणसं तिला म्हणाली: “तू आम्हाला जी शपथ घ्यायला लावलीस, तिला आम्ही बांधलेले आहोत.+ १८  पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. ती म्हणजे, आम्ही या देशात येऊ, तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला खाली सोडलंस त्या खिडकीला हा लाल रंगाचा दोर बांधून ठेव. आणि तुझ्या आईवडिलांना, भावांना आणि तुझ्या वडिलांच्या घरातल्या सगळ्यांना या घरात एकत्र कर.+ १९  जर कोणी तुझ्या घरातून बाहेर निघाला तर त्याच्या रक्‍ताचा दोष त्याच्यावरच येईल; त्यासाठी आम्ही दोषी असणार नाही. पण जर कोणी तुझ्या घरात असताना मारला गेला, तर त्याच्या रक्‍ताचा दोष आमच्यावर येईल. २०  पण आम्ही इथे कोणत्या हेतूने आलो होतो हे जर तू कोणाला सांगितलंस,+ तर तू आम्हाला घातलेल्या शपथेतून आम्ही मुक्‍त होऊ.” २१  ती म्हणाली: “ठीक आहे. तुम्ही म्हणता तसंच मी करीन.” मग तिने त्यांना पाठवून दिलं, आणि ते आपल्या मार्गाने गेले. त्यानंतर तिने तो लाल रंगाचा दोर खिडकीला बांधला. २२  तिथून निघून ते गुप्तहेर डोंगराळ प्रदेशाकडे गेले, आणि त्यांचा पाठलाग करणारे शहरात परत जाईपर्यंत ते तीन दिवस तिथेच राहिले. पाठलाग करणाऱ्‍यांनी प्रत्येक रस्त्यावर त्यांचा शोध केला, पण त्यांना ते सापडले नाहीत. २३  मग ते दोन गुप्तहेर डोंगराळ प्रदेशातून खाली उतरले आणि नदी पार करून नूनचा मुलगा यहोशवा याच्याकडे आले. आणि जे काही घडलं होतं, ते सगळं त्यांनी त्याला सांगितलं. २४  मग ते यहोशवाला म्हणाले: “यहोवाने तो संपूर्ण देश आपल्या हाती दिलाय.+ इतकंच नाही, तर आपल्या भीतीमुळे त्या देशातल्या सगळ्या लोकांचं धैर्य खचलंय.”+

तळटीपा

म्हणजे, पूर्वेकडे.
किंवा “मिसरमधून.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “भरवशालायक खूण.”