यहोशवा २०:१-९

  • शरण-शहरं (१-९)

२०  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: २  “इस्राएली लोकांना सांग, की ‘मी मोशेद्वारे तुम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे तुमच्यासाठी शरण-शहरं* निवडा.+ ३  म्हणजे एखाद्याच्या हातून जर चुकून किंवा नकळत कोणाचा खून झाला, तर त्याला या शहरांमध्ये पळून जाता येईल. ही शहरं रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून+ त्याचा बचाव करतील. ४  त्यासाठी त्याने यांपैकी एखाद्या शहराकडे पळून जावं,+ आणि शहराच्या दरवाजाजवळ उभं राहावं.+ तिथे त्याने शहराच्या वडिलांना घडलेली सगळी हकिगत सांगावी. मग त्यांनी त्याला शहरात घ्यावं आणि राहण्यासाठी जागा द्यावी. मग तो त्यांच्यासोबत त्या शहरात राहील. ५  रक्‍ताचा सूड घेणारा जर त्याचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचला, तर वडिलांनी त्याला त्याच्या हाती देऊ नये; कारण त्याच्या हातून नकळत आपल्या सोबत्याचा खून झाला होता. शिवाय त्याच्या मनात त्याच्याविषयी द्वेषही नव्हता.+ ६  मंडळीसमोर त्याची न्यायचौकशी होईपर्यंत+ आणि त्या वेळचा महायाजक जिवंत असेपर्यंत, त्याने त्याच शहरात राहावं.+ त्यानंतर त्याला वाटलं तर ज्या शहरातून तो पळून आला होता, तिथे त्याने आपल्या घरी परत जावं.’”+ ७  त्यामुळे इस्राएली लोकांनी ही शहरं वेगळी केली:* नफतालीच्या डोंगराळ प्रदेशात असलेल्या गालीलमधलं केदेश,+ एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातलं शखेम+ आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातलं किर्याथ-अर्बा,+ म्हणजे हेब्रोन. ८  तसंच यार्देनच्या प्रदेशात यरीहोच्या पूर्वेकडे त्यांनी ही शहरं निवडली: रऊबेन वंशाच्या पठारी भागातल्या ओसाड रानातलं बेसेर,+ गाद वंशाच्या गिलाद प्रदेशातलं रामोथ+ आणि मनश्‍शे+ वंशाच्या बाशान प्रदेशातलं गोलान.+ ९  ही शहरं सर्व इस्राएली लोकांसाठी आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या विदेशी लोकांसाठी नेमण्यात आली; म्हणजे जर एखाद्याच्या हातून चुकून कोणाचा खून झाला, तर तो या शहरांत पळून जाऊ शकेल;+ तसंच मंडळीसमोर त्याची न्यायचौकशी+ होण्याआधी, रक्‍ताचा सूड घेणाऱ्‍यापासून तो आपला जीव वाचवू शकेल.

तळटीपा

किंवा “पवित्र ठरवली.”