यहोशवा २२:१-३४

  • पूर्वेकडून आलेले वंश परत आपल्या घरी जातात (१-८)

  • यार्देन नदीजवळ बांधलेली वेदी (९-१२)

  • वेदी बांधण्यामागचा हेतू सांगण्यात आला (१३-२९)

  • वाद मिटतो (३०-३४)

२२  मग यहोशवाने रऊबेन आणि गाद वंशांना, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला बोलावलं, २  आणि तो त्यांना म्हणाला: “यहोवाचा सेवक मोशे याने ज्या आज्ञा दिल्या होत्या, त्या सगळ्या तुम्ही पाळल्या+ आणि मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐकली.+ ३  आजपर्यंत तुम्ही आपल्या बांधवांना साथ दिली+ आणि तुमचा देव यहोवा याच्या आज्ञांचं पालन केलं.+ ४  आता तुमचा देव यहोवा याने वचन दिलं होतं, त्याप्रमाणे त्याने तुमच्या बांधवांना शांती दिली आहे.+ त्यामुळे यहोवाचा सेवक मोशे याने यार्देन नदीच्या पलीकडे* तुम्हाला जो प्रदेश दिला होता तिथे आपल्या घरी परत जा.+ ५  फक्‍त एका गोष्टीची विशेष काळजी घ्या; यहोवाचा सेवक मोशे याने ज्या आज्ञा आणि नियमशास्त्र तुम्हाला दिलं होतं ते पाळा.+ म्हणजेच तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करा,+ त्याने सांगितलेल्या मार्गांनी चाला,+ त्याच्या आज्ञा पाळा+ आणि त्याला धरून राहा.+ तसंच पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने+ त्याची सेवा करा.”+ ६  मग यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन पाठवून दिलं, आणि ते आपल्या घरी गेले. ७  मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशान प्रदेशात त्यांच्या वारशाचा हिस्सा दिला होता;+ तर मनश्‍शेच्या उरलेल्या अर्ध्या वंशाला यहोशवाने यार्देनच्या पश्‍चिमेकडे त्यांच्या बांधवांसोबत हिस्सा दिला होता.+ इतकंच नाही, तर त्यांना घरी पाठवून देताना यहोशवाने त्यांना आशीर्वादही दिला. ८  तो त्यांना म्हणाला: “भरपूर धनसंपत्ती, मोठ्या प्रमाणात गुरंढोरं, सोनं, चांदी, तांबं, लोखंड आणि पुष्कळ कपडे घ्या आणि आपापल्या घरी परत जा;+ शत्रूंकडून मिळवलेली ही लूट आपल्या भावांसोबत वाटून घ्या.”+ ९  त्यानंतर रऊबेन आणि गादचा वंश, तसंच मनश्‍शेचा अर्धा वंश यांनी कनान देशातल्या शिलो इथून इतर इस्राएली लोकांचा निरोप घेतला, आणि ते गिलादच्या प्रदेशात परत जायला निघाले;+ हा त्यांना वारशात मिळालेला प्रदेश असून त्यात राहण्याची आज्ञा यहोवाने मोशेद्वारे त्यांना दिली होती.+ १०  रऊबेन आणि गादचा वंश, तसंच मनश्‍शेचा अर्धा वंश हे कनान देशातल्या यार्देनच्या प्रदेशात आले, तेव्हा त्यांनी यार्देन नदीजवळ एक मोठी व भव्य अशी वेदी बांधली. ११  इतर इस्राएली लोकांनी जेव्हा हे ऐकलं,+ तेव्हा ते म्हणाले: “रऊबेन आणि गादच्या वंशांनी, तसंच मनश्‍शेच्या अर्ध्या वंशाने आपल्या हद्दीत काय केलंय ते पाहा! त्यांनी यार्देनजवळ कनान देशाच्या सीमेवर एक वेदी बांधली आहे.” १२  जेव्हा सर्व इस्राएली लोकांनी हे ऐकलं तेव्हा त्यांच्याशी युद्ध करायला जाण्यासाठी ते शिलो+ इथे एकत्र जमले. १३  मग इस्राएली लोकांनी एलाजार याजकाचा मुलगा फिनहास+ याला रऊबेन, गाद आणि मनश्‍शेचा अर्धा वंश यांच्याकडे गिलाद इथे पाठवलं. १४  त्याच्यासोबत इस्राएलच्या प्रत्येक वंशाचा एक, असे दहा प्रधानही होते; ते आपापल्या घराण्यांचे प्रधान होते; प्रत्येक घराणं हे हजारो इस्राएली लोकांनी मिळून बनलेलं होतं.+ १५  ते गिलाद इथे रऊबेन, गाद आणि मनश्‍शेचा अर्धा वंश यांच्याकडे आले, आणि त्यांना म्हणाले: १६  “यहोवाचे सर्व लोक असं विचारत आहेत, की ‘तुम्ही इस्राएलचा देव यहोवा याच्याशी विश्‍वासघात का केला?’+ ही वेदी बांधून आणि यहोवाविरुद्ध बंड करून तुम्ही हेच दाखवून दिलं, की तुम्ही त्याला सोडून दिलंय.+ १७  पौरमध्ये आपण जे पाप केलं ते काय कमी होतं? आणि त्या वेळी यहोवाच्या लोकांवर किती भयंकर पीडा आली होती ते तुम्ही कसं विसरलात? त्या पापाचे परिणाम आपण आजपर्यंत भोगत आहोत.+ १८  आणि आता तुम्ही यहोवाला सोडून देत आहात! आज जर तुम्ही यहोवाविरुद्ध बंड केलं, तर उद्या इस्राएलच्या सगळ्या लोकांवर त्याचा क्रोध भडकेल.+ १९  तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुम्हाला मिळालेला प्रदेश अशुद्ध आहे, तर जिथे यहोवाच्या उपासनेचा मंडप आहे तिथे+ यहोवाच्या प्रदेशात या+ आणि आमच्यामध्ये येऊन राहा. पण यहोवाविरुद्ध मात्र बंड करू नका; आणि आपला देव यहोवा याच्या वेदीशिवाय आणखी एक वेदी बांधून आम्हालाही बंडखोर बनवू नका.+ २०  जेरहचा पुत्र आखान+ याने नाशासाठी असलेल्या गोष्टी चोरून विश्‍वासघात केला तेव्हासुद्धा सगळ्या इस्राएली लोकांवर देवाचा क्रोध भडकला नव्हता का?+ त्याच्या पापामुळे त्याचा एकट्याचाच नाही, तर इतरांचाही नाश झाला होता.”+ २१  त्यावर रऊबेन, गाद आणि मनश्‍शेचा अर्धा वंश हे इस्राएल घराण्यांच्या प्रमुखांना, म्हणजे हजारो इस्राएली लोकांनी मिळून बनलेल्या इस्राएल घराण्यांच्या प्रमुखांना म्हणाले:+ २२  “देवांचा देव यहोवा! हो, देवांचा देव यहोवा+ याला खरं काय ते माहीत आहे! आणि सर्व इस्राएली लोकांनाही ते कळेल. आम्ही जर यहोवाविरुद्ध बंड केलं असेल आणि त्याचा विश्‍वासघात केला असेल, तर आज आम्हाला जिवंत सोडू नका. २३  आम्ही जर यहोवाला सोडून देण्यासाठी, आणि होमार्पणं, अन्‍नार्पणं आणि शांती-अर्पणं वाहण्यासाठी वेदी बांधली असेल, तर यहोवा आम्हाला शिक्षा करो.+ २४  खरंतर आम्हाला एका गोष्टीची भीती वाटत होती आणि त्यामुळे आम्ही ही वेदी बांधली. आम्हाला वाटलं, की पुढेमागे कदाचित तुमची मुलं आमच्या मुलांना म्हणतील: ‘इस्राएलचा देव यहोवा याच्याशी तुमचा काय संबंध? २५  रऊबेन आणि गादच्या वंशजांनो, यहोवाने तुमच्या-आमच्यामध्ये यार्देन नदी सीमा ठरवली आहे; तेव्हा यहोवाशी तुमचा काहीएक संबंध नाही,’ असं म्हणून तुमची मुलं कदाचित आमच्या मुलांना यहोवाची उपासना करण्यापासून* अडवतील. २६  त्यामुळे आम्ही विचार केला, ‘आपण एक वेदी बांधू. होमार्पणं किंवा बलिदानं अर्पण करण्यासाठी नाही, २७  तर तुमच्या-आमच्यामध्ये आणि येणाऱ्‍या पिढ्यांमध्ये एक साक्ष असावी+ म्हणून एक वेदी बांधू; आम्ही पुढेही यहोवाला होमार्पणं, बलिदानं आणि शांती-अर्पणं वाहून त्याची उपासना करत राहू+ याची ती साक्ष ठरेल. आणि त्यामुळे भविष्यात तुमची मुलं आमच्या मुलांना असं म्हणू शकणार नाहीत, की “यहोवाशी तुमचा काहीएक संबंध नाही.”’ २८  म्हणून आम्ही विचार केला, की ‘भविष्यात जर ते आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना असं काही म्हणाले, तर आम्ही त्यांना सांगू: “यहोवाच्या वेदीचा हा नमुना पाहा! आमच्या वाडवडिलांनी होमार्पणं किंवा बलिदानं देण्यासाठी नाही, तर तुमच्या-आमच्यामध्ये साक्ष असावी म्हणून ती वेदी बांधली.”’ २९  आपला देव यहोवा याच्या उपासना मंडपासमोर त्याची वेदी असताना होमार्पणं, अन्‍नार्पणं आणि बलिदानं देण्यासाठी आणखी एक वेदी बांधून+ आम्ही यहोवाविरुद्ध बंड करण्याचा आणि यहोवाकडे पाठ फिरवण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही!”+ ३०  फिनहास याजकाने आणि हजारो इस्राएली लोकांनी मिळून बनलेल्या इस्राएल घराण्याच्या प्रधानांनी रऊबेन, गाद आणि मनश्‍शेच्या वंशजांचं हे म्हणणं ऐकलं तेव्हा त्यांचं समाधान झालं.+ ३१  मग, एलाजार याजकाचा मुलगा फिनहास हा रऊबेन, गाद आणि मनश्‍शेच्या वंशजांना म्हणाला: “आज आम्हाला खातरी पटली, की यहोवा आपल्यामध्ये आहे. कारण, तुम्ही यहोवाचा विश्‍वासघात केलेला नाही. आता यहोवा इस्राएली लोकांना शिक्षा करणार नाही.” ३२  त्यानंतर एलाजार याजकाचा मुलगा फिनहास आणि इस्राएली लोकांचे प्रधान गिलादमधून रऊबेन आणि गाद वंशजांपासून निघून कनानमध्ये परत आले; आणि त्यांनी इतर इस्राएली लोकांना घडलेली सगळी हकिगत सांगितली. ३३  ते ऐकून इस्राएली लोकांना आनंद झाला आणि त्यांनी देवाची स्तुती केली. त्यानंतर त्यांनी रऊबेन आणि गाद वंशजांशी युद्ध करण्याचा आणि ते राहत असलेल्या प्रदेशाचा नाश करण्याचा विचार सोडून दिला. ३४  त्यामुळे रऊबेन आणि गादच्या वंशांनी त्या वेदीला एक नाव दिलं* आणि ते म्हणाले: “यहोवा हाच खरा देव आहे याची ही वेदी आपल्यामध्ये साक्ष आहे.”

तळटीपा

म्हणजे, पूर्वेकडे.
शब्दशः “भय बाळगण्यापासून.”
मागच्या-पुढच्या संदर्भावरून दिसून येतं, की त्या वेदीला कदाचित “साक्ष” असं नाव दिलं असावं.