यहोशवा २३:१-१६

  • इस्राएलच्या पुढाऱ्‍यांना यहोशवाचा निरोप (१-१६)

    • यहोवाचा एकही शब्द अपुरा राहिला नाही (१४)

२३  यहोवाने इस्राएली लोकांना आजूबाजूच्या सर्व शत्रूंपासून आराम देऊन बराच काळ लोटला होता.+ तसंच यहोशवा वृद्ध होऊन आता त्याचं आयुष्यही संपत आलं होतं.+ २  तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएली लोकांना, त्यांच्या वडीलजनांना, प्रमुखांना, न्यायाधीशांना आणि अधिकाऱ्‍यांना+ बोलावून म्हटलं:+ “आता मी वृद्ध झालोय; माझं आयुष्य संपत आलंय. ३  तुमचा देव यहोवा याने तुमच्यासाठी या सर्व राष्ट्रांचं काय केलं ते तुम्ही स्वतः पाहिलंय. कारण तुमचा देव यहोवा तुमच्यासाठी लढत होता.+ ४  यार्देन नदीपासून पश्‍चिमेकडच्या महासागरापर्यंत* राहत असलेल्या सगळ्या लोकांना मी हाकलून लावलं+ आणि त्यांचा प्रदेश तुम्हाला नेमून दिला.*+ पण काही लोक अजूनही तुमच्यामध्ये राहत आहेत. असं असलं तरी त्यांचा प्रदेश मात्र तुमचा आहे. ५  तुमचा देव यहोवा यानेच त्यांना तुमच्यापुढून हाकलून दिलं+ व त्यांना इथून घालवून दिलं. आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिलं होतं, त्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश ताब्यात घेतला.+ ६  आता हिंमत धरा आणि मोशेच्या नियमशास्त्रात+ जे काही लिहिलंय त्याचं काळजीपूर्वक पालन करा; त्यापासून कधीही भरकटू नका.+ ७  तुमच्यामध्ये राहत असलेल्या इतर राष्ट्रांच्या लोकांमध्ये मिसळू नका.+ त्यांच्या देवांच्या नावांचा उल्लेखसुद्धा करू नका+ किंवा त्यांच्या नावाने शपथ घेऊ नका. त्यांची कधी उपासना करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका.+ ८  तुम्ही आजपर्यंत जसं तुमचा देव यहोवा याला धरून राहिला आहात, तसंच पुढेही त्याला धरून राहा.+ ९  यहोवा तुमच्यासमोरून मोठ्या आणि शक्‍तिशाली राष्ट्रांना घालवून देईल.+ आजपर्यंत तुमच्यापुढे एकही माणूस टिकू शकला नाही.+ १०  तुमचा देव यहोवा याने वचन दिलं होतं+ त्याप्रमाणे तो तुमच्यासाठी लढतो.+ म्हणून तुमच्यातला एक माणूस हजार माणसांना सहज पळवून लावेल.+ ११  त्यामुळे तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करत राहा,+ आणि असं करून आपल्या जिवाचं रक्षण करायची नेहमी खबरदारी घ्या.+ १२  पण तुम्ही जर देवाला सोडून तुमच्यामध्ये राहत असलेल्या इतर राष्ट्रांच्या लोकांना जाऊन मिळालात,+ आणि आपसात लग्नसंबंध जोडले,*+ किंवा मैत्री केली, १३  तर लक्षात ठेवा, तुमचा देव यहोवा या राष्ट्रांच्या लोकांना तुमच्यामधून घालवून देणार नाही.+ ते तुमच्यासाठी पाश आणि सापळा ठरतील. आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुमचा नाश होत नाही, तोपर्यंत ते तुमच्या पाठीवर चाबकाच्या फटक्यांसारखे+ आणि डोळ्यांत सलणाऱ्‍या काट्यांसारखे होतील. १४  पाहा! मी काही आता जास्त दिवस जगणार नाही.* आणि तुम्हाला हे पक्कं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल जितकी अभिवचनं दिली होती त्यांपैकी एकही अभिवचन निष्फळ ठरलेलं नाही; प्रत्येक अभिवचन तुमच्या बाबतीत पूर्ण झालंय. त्यातला एकही शब्द अपुरा राहिलेला नाही.+ १५  पण ज्याप्रमाणे तुमचा देव यहोवा याने चांगल्या गोष्टींबद्दल दिलेली आपली सगळी अभिवचनं पूर्ण केली,+ अगदी त्याचप्रमाणे तुमचा देव यहोवा याने संकटं आणण्याविषयी* जे काही म्हटलं होतं, तेसुद्धा तो नक्कीच पूर्ण करेल आणि तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून यहोवा तुमचा पूर्णपणे नाश करेल.+ १६  तुमचा देव यहोवा याने तुम्हाला जो करार पाळायची आज्ञा दिली आहे ती जर तुम्ही मोडली, आणि जाऊन इतर दैवतांची उपासना केली व त्यांच्या पाया पडलात, तर यहोवाचा क्रोध तुमच्यावर भडकेल+ आणि तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तो लगेच तुमचा नाश करेल.”+

तळटीपा

म्हणजे, भूमध्य समुद्रापर्यंत.
किंवा “चिठ्ठ्या टाकून वाटून दिला.”
किंवा “सोयरीक केली.”
शब्दशः “जगाच्या रितीप्रमाणे मी आता जात आहे.”
किंवा “शाप देण्याविषयी.”