यहोशवा ३:१-१७

  • इस्राएली लोक यार्देन पार करतात (१-१७)

 मग यहोशवा पहाटेच उठला. तो सर्व इस्राएली लोकांना घेऊन शिट्टिम+ इथून निघाला आणि यार्देनजवळ आला. यार्देन नदी पार करण्याआधी इस्राएली लोकांनी रात्री तिथेच मुक्काम केला. २  तीन दिवसांनंतर, लोकांचे अधिकारी+ छावणीत गेले ३  आणि त्यांनी सगळ्या लोकांना अशी आज्ञा दिली: “तुम्ही जेव्हा लेवी वंशाच्या याजकांना+ तुमचा देव यहोवा याच्या कराराची पेटी घेऊन जाताना पाहाल, तेव्हा लगेच आपलं ठिकाण सोडून त्या पेटीच्या पाठोपाठ जा; ४  म्हणजे कोणत्या मार्गाने जायचं हे तुम्हाला कळेल. कारण या मार्गाने तुम्ही कधीही प्रवास केलेला नाही. पण कराराच्या पेटीपासून जवळपास २,००० हातांचं* अंतर ठेवा; तिच्या जवळ जाऊ नका.” ५  मग यहोशवा लोकांना म्हणाला: “स्वतःला शुद्ध करा.+ कारण उद्या यहोवा तुमच्यासमोर अद्‌भुत गोष्टी करणार आहे.”+ ६  त्यानंतर यहोशवा याजकांना म्हणाला: “कराराची पेटी+ उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चाला.” त्यामुळे त्यांनी कराराची पेटी उचलली आणि ते लोकांच्या पुढे चालू लागले. ७  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “आजपासून मी सर्व इस्राएली लोकांच्या नजरेत तुझा मानसन्मान वाढवीन.+ त्यावरून त्यांना कळेल, की मी जसा मोशेसोबत होतो+ तसाच तुझ्यासोबतही आहे.+ ८  कराराची पेटी घेऊन जाणाऱ्‍या याजकांना अशी आज्ञा दे: ‘तुम्ही यार्देनच्या किनाऱ्‍याजवळ याल, तेव्हा पाण्यात जा आणि स्थिर उभे राहा.’”+ ९  यहोशवा इस्राएली लोकांना म्हणाला: “इथे या आणि तुमचा देव यहोवा याने काय सांगितलंय ते ऐका.” १०  यहोशवा पुढे म्हणाला: “यावरून तुम्हाला समजेल की जिवंत देव तुमच्यामध्ये आहे.+ आणि तो तुमच्या डोळ्यांदेखत कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी आणि यबूसी लोकांना नक्कीच घालवून देईल.+ ११  पाहा! संपूर्ण पृथ्वीचा प्रभू याच्या कराराची पेटी तुमच्यापुढे यार्देनमध्ये जात आहे. १२  आता इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक पुरुष, याप्रमाणे १२ पुरुष निवडा.+ १३  संपूर्ण पृथ्वीचा प्रभू यहोवा, याच्या कराराची पेटी घेऊन जाणाऱ्‍या याजकांचे पाय यार्देनच्या पाण्याला लागताच, वरून वाहत येणारा पाण्याचा प्रवाह थांबेल आणि भिंतीने* रोखल्याप्रमाणे तो प्रवाह स्थिर राहील.”+ १४  त्यामुळे यार्देन नदी पार करण्यासाठी सगळे लोक आपापल्या तंबूंमधून निघाले, तेव्हा कराराची पेटी+ घेऊन जाणारे याजक त्यांच्या पुढे गेले. १५  कराराची पेटी घेऊन जाणारे याजक यार्देन नदीजवळ पोहोचले, आणि त्यांचे पाय पाण्याला लागताच (कापणीच्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर यायचा+), १६  वरून येणारा पाण्याचा प्रवाह लगेच थांबला. तो प्रवाह फार दूर, आदाम नावाच्या शहराजवळ (हे सारतानाजवळ होतं) भिंतीप्रमाणे* थांबला; आणि अराबाच्या समुद्राकडे, म्हणजे क्षार समुद्राकडे* वाहून जाणारं पाणीही ओसरून गेलं. अशा प्रकारे पाण्याचा प्रवाह जागच्या जागी थांबला आणि लोक यार्देन पार करून पलीकडे, यरीहो शहराजवळ गेले. १७  सगळे इस्राएली लोक यार्देन पार करून पलीकडे जाईपर्यंत, यहोवाच्या कराराची पेटी घेऊन जाणारे याजक नदीच्या मधोमध, कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले.+ अशा रितीने, संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून यार्देन नदी पार केली.+

तळटीपा

सुमारे ८९० मी. (२,९२० फूट). अति. ख१४ पाहा.
किंवा “धरणाने.”
किंवा “धरणाप्रमाणे.”
म्हणजे, मृत समुद्र.