यहोशवा ४:१-२४

  • आठवण करून देण्यासाठी रचलेले दगड (१-२४)

 संपूर्ण राष्ट्राने यार्देन पार केल्यावर, यहोवा यहोशवाला म्हणाला: २  “इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक पुरुष, याप्रमाणे १२ पुरुषांना बोलावून घे.+ ३  आणि त्यांना अशी आज्ञा कर: ‘याजक यार्देनच्या मधोमध जिथे स्थिर उभे आहेत,+ तिथून १२ दगड घ्या आणि रात्री तुम्ही मुक्काम कराल तिथे ते ठेवा.’”+ ४  त्यामुळे इस्राएलच्या प्रत्येक वंशातून एक, याप्रमाणे यहोशवाने ज्या १२ पुरुषांना नियुक्‍त केलं होतं त्यांना त्याने बोलावून घेतलं. ५  आणि तो त्यांना म्हणाला: “यार्देनच्या मधोमध, ज्या ठिकाणी तुमचा देव यहोवा याच्या कराराची पेटी आहे तिच्या समोर जा. आणि इस्राएलमध्ये जितके वंश आहेत त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकाने तिथून एक दगड आपल्या खांद्यावर उचलून आणावा. ६  हे तुमच्यासाठी एक चिन्ह म्हणून राहील. पुढे कधी तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारलं, की ‘हे दगड इथे का ठेवलेत?’+ ७  तर त्यांना सांगा: ‘कारण यहोवाच्या कराराच्या पेटीसमोर यार्देनच्या पाण्याचे दोन भाग झाले होते.+ आणि कराराची पेटी यार्देन नदीतून जात असताना नदीचा प्रवाह जागच्या जागी थांबून राहिला होता. त्या घटनेची इस्राएली लोकांना नेहमी आठवण करून देण्यासाठी* हे दगड इथे ठेवलेत.’”+ ८  यहोशवाने आज्ञा दिली होती अगदी तसंच इस्राएली लोकांनी केलं. यहोवाने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे, त्यांनी यार्देनच्या मधोमध जाऊन इस्राएलच्या वंशांच्या संख्येप्रमाणे १२ दगड घेतले. आणि रात्री ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला तिथे ते रचून ठेवले. ९  यार्देनच्या मधोमध, जिथे कराराची पेटी घेऊन जाणारे याजक उभे होते,+ त्या ठिकाणीसुद्धा यहोशवाने १२ दगड रचून ठेवले. ते दगड आजही तिथेच आहेत. १०  यहोवाने यहोशवाद्वारे लोकांना जे काही करायची आज्ञा दिली होती ते सगळं, म्हणजे मोशेने यहोशवाला सांगितलं होतं ते सगळं पूर्ण होईपर्यंत कराराची पेटी घेऊन जाणारे याजक यार्देनच्या मधोमध तसेच स्थिर उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली. ११  सगळे लोक नदी पार करून गेल्यानंतर, यहोवाच्या कराराची पेटी घेऊन जाणाऱ्‍या याजकांनीसुद्धा सर्व लोकांसमोर नदी पार केली.+ १२  मोशेने दिलेल्या सूचनेप्रमाणे+ रऊबेन आणि गादचा वंश, तसंच मनश्‍शेचा अर्धा वंश इतर इस्राएली लोकांच्या आधी एका सैन्यदलाप्रमाणे नदी पार करून गेला.+ १३  युद्धासाठी तयार असलेले जवळजवळ ४०,००० सैनिक यहोवासमोर नदी पार करून यरीहोच्या ओसाड रानात गेले. १४  त्या दिवशी यहोवाने सर्व इस्राएली लोकांच्या नजरेत यहोशवाचा मानसन्मान वाढवला.+ आणि लोक जसा मोशेचा मनापासून आदर* करायचे,+ तसाच त्यांनी यहोशवाचाही तो जिवंत असेपर्यंत आदर केला. १५  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: १६  “साक्षपेटी+ घेऊन जाणाऱ्‍या याजकांना यार्देनमधून बाहेर येण्याची आज्ञा दे.” १७  म्हणून यहोशवा याजकांना म्हणाला: “यार्देनमधून बाहेर या.” १८  यहोवाच्या कराराची पेटी घेऊन यार्देनच्या मधोमध उभे असलेले याजक+ जेव्हा यार्देनमधून बाहेर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीवर पडले, तेव्हा यार्देन नदी पुन्हा तुडुंब भरून वाहू लागली.+ १९  इस्राएली लोकांनी पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी यार्देन नदी पार केली. आणि त्यांनी यरीहोच्या पूर्व सीमेकडे असलेल्या गिलगाल या ठिकाणी मुक्काम केला.+ २०  आणि जे १२ दगड ते यार्देन नदीतून घेऊन आले होते, ते यहोशवाने गिलगाल इथे रचून ठेवले.+ २१  मग तो इस्राएली लोकांना म्हणाला: “पुढे जेव्हा तुमची मुलं तुम्हाला विचारतील, की ‘हे दगड इथे का आहेत?’+ २२  तेव्हा त्यांना सांगा: ‘कारण इस्राएली लोकांनी कोरड्या जमिनीवरून चालत यार्देन नदी पार केली होती.+ २३  आणि जसं इस्राएली लोक तांबडा समुद्र पार करून जाईपर्यंत तुमचा देव यहोवा याने समुद्राचं पाणी आटवलं होतं, तसंच आम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत यहोवाने यार्देन नदीचंही पाणी आटवलं.+ २४  यहोवाचा हात किती शक्‍तिशाली आहे हे पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना समजावं,+ आणि तुम्ही तुमचा देव यहोवा याचं नेहमी भय बाळगावं म्हणून त्याने या गोष्टी केल्या.’”

तळटीपा

किंवा “कायमचं स्मारक म्हणून.”
शब्दशः “धाक बाळगला.”