यहोशवा ५:१-१५

  • गिलगाल इथे सुंता (१-९)

  • वल्हांडण सण पाळला; मान्‍ना बंद झाला (१०-१२)

  • यहोवाच्या सैन्याचा प्रमुख (१३-१५)

 इस्राएली लोक यार्देन नदी पार करून जाईपर्यंत यहोवाने नदीचं पाणी कसं आटवलं, हे जेव्हा यार्देनच्या पश्‍चिमेकडे* असलेल्या सर्व अमोरी+ राजांनी आणि समुद्राकडे असलेल्या सर्व कनानी+ राजांनी ऐकलं, तेव्हा त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं.+ आणि त्यांच्यात इस्राएली लोकांचा सामना करण्याची हिंमत उरली नाही.+ २  त्या वेळी यहोवा यहोशवाला म्हणाला: “गारगोटीच्या दगडाच्या सुऱ्‍या बनव आणि इस्राएली पुरुषांची सुंता* कर.”*+ ३  म्हणून यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्‍या बनवल्या आणि गिबअथ-हा-अरालोथ* या ठिकाणी इस्राएली पुरुषांची सुंता केली.+ ४  यहोशवाने त्यांची सुंता केली, कारण इजिप्तमधून निघालेल्या सर्व पुरुषांचा, म्हणजे लढाईसाठी पात्र असलेल्या* सर्व पुरुषांचा, इजिप्त सोडल्यानंतर ओसाड रानातून प्रवास करत असताना मृत्यू झाला होता.+ ५  इजिप्तमधून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती. पण इजिप्त सोडल्यानंतर ओसाड रानातून प्रवास करत असताना ज्यांचा जन्म झाला होता त्यांची मात्र सुंता झालेली नव्हती. ६  संपूर्ण राष्ट्राचा, म्हणजे ज्यांनी यहोवाचं ऐकलं नाही+ अशा लढाईसाठी पात्र असलेल्या सर्व पुरुषांचा मृत्यू होईपर्यंत, इस्राएली लोक ४० वर्षं+ ओसाड रानातच भटकत राहिले. कारण जो देश त्यांना देण्याचं वचन यहोवाने त्यांच्या वाडवडिलांना दिलं होतं,+ तो दुधामधाचा देश+ ते कधीच पाहणार नाहीत अशी शपथ यहोवाने घेतली होती.+ ७  आणि त्यांच्याऐवजी तो त्यांच्या मुलांना त्या देशात घेऊन गेला.+ त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण प्रवास करत असताना त्यांची सुंता झाली नव्हती. ८  संपूर्ण राष्ट्राची सुंता झाल्यानंतर त्यांनी बरं होईपर्यंत छावणीत विश्रांती घेतली. ९  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “इजिप्तचे लोक तुमची जी बदनामी करायचे, ती मी आज तुमच्यापासून दूर लोटून दिली आहे.” म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणाला गिलगाल*+ असं म्हणतात. १०  इस्राएली लोकांनी काही काळ गिलगालमध्येच मुक्काम केला. आणि त्या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी, त्यांनी यरीहोच्या ओसाड रानात वल्हांडण सण पाळला.+ ११  वल्हांडणाच्या दुसऱ्‍या दिवसापासून ते जमिनीचं उत्पन्‍न खाऊ लागले. त्या दिवशी त्यांनी बेखमीर भाकरी+ आणि हुरडा खाल्ला. १२  ज्या दिवशी त्यांनी जमिनीचं उत्पन्‍न खाल्लं त्या दिवसापासून त्यांना मान्‍ना मिळण्याचं बंद झालं. त्यानंतर इस्राएली लोकांना पुन्हा कधीही मान्‍ना मिळाला नाही;+ त्या वर्षापासून ते कनान देशाचा उपज खाऊ लागले.+ १३  यहोशवा यरीहोजवळ असताना त्याला अचानक एक पुरुष+ हातात तलवार घेऊन+ त्याच्यासमोर उभा असलेला दिसला. यहोशवा त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला विचारलं: “तू आमच्या बाजूने आहेस, की आमच्या शत्रूंच्या बाजूने?” १४  तो म्हणाला: “तू विचार करतोस तसं नाही. मी यहोवाच्या सैन्याचा प्रमुख*+ आहे.” हे ऐकताच यहोशवाने जमिनीवर पडून त्याला दंडवत घातला आणि तो त्याला म्हणाला: “माझ्या प्रभू, तुझ्या या सेवकासाठी तुझी काय आज्ञा आहे?” १५  तेव्हा यहोवाच्या सैन्याचा प्रमुख यहोशवाला म्हणाला: “तुझ्या पायांतले जोडे काढ. कारण तू जिथे उभा आहेस, ती जागा पवित्र आहे.” त्यामुळे यहोशवाने लगेच आपले जोडे काढले.+

तळटीपा

शब्दशः “समुद्राकडच्या बाजूला.”
शब्दशः “पुन्हा दुसऱ्‍यांदा सुंता कर.”
म्हणजे, “अग्रत्वचांची टेकडी.”
किंवा “सैन्यात भरती होण्याचं वय असलेल्या.”
म्हणजे, “लोटून देणं; दूर लोटणं.”
किंवा “राजकुमार.”