यहोशवा ६:१-२७

  • यरीहोची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली (१-२१)

  • राहाब आणि तिच्या कुटुंबाचा बचाव (२२-२७)

 इस्राएली लोकांच्या भीतीमुळे यरीहो शहराचे दरवाजे बंद करण्यात आले होते; कोणीही बाहेर जात नव्हतं किंवा आत येत नव्हतं.+ २  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “मी यरीहो शहर, त्याचा राजा आणि त्याचे शूर योद्धे तुझ्या हाती दिले आहेत.+ ३  तू आणि तुझ्यासोबत सर्व सैनिकांनी दिवसातून एकदा संपूर्ण शहराभोवती फेरी* घालावी. असं सहा दिवस करा. ४  तसंच सात याजकांनी एकेक रणशिंग* घेऊन कराराच्या पेटीपुढे चालावं. पण सातव्या दिवशी मात्र शहराभोवती सात वेळा फेऱ्‍या घाला. आणि त्या वेळी याजकांनी रणशिंगं फुंकावीत.+ ५  जेव्हा रणशिंगं फुंकली जातील आणि तुम्ही त्यांचा आवाज ऐकाल,* तेव्हा सर्व सैनिकांनी मोठ्याने ओरडून युद्धाची घोषणा करावी. तेव्हा शहराची भिंत कोसळून पडेल.+ मग सरळ शहरात घुसून त्यावर हल्ला करा.” ६  त्यामुळे नूनचा मुलगा यहोशवा याने याजकांना एकत्र बोलावलं. आणि तो त्यांना म्हणाला: “कराराची पेटी उचलून घ्या. आणि तुमच्यापैकी सात याजकांनी एकेक रणशिंग घेऊन यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे चालावं.”+ ७  मग तो सैनिकांना म्हणाला: “पुढे जा आणि शहराभोवती फेरी घाला. आणि शस्त्रधारी सैनिकांच्या तुकड्यांनी+ यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे चालावं.” ८  यहोशवाने सांगितल्याप्रमाणे, सात याजक एकेक रणशिंग घेऊन यहोवापुढे चालू लागले आणि रणशिंगं फुंकू लागले. आणि यहोवाच्या कराराची पेटी त्यांच्या पाठोपाठ नेली जात होती. ९  रणशिंगं फुंकली जात असताना सैनिकांच्या काही शस्त्रधारी तुकड्या, रणशिंगं फुंकणाऱ्‍या याजकांच्या पुढे चालत होत्या; तर, सैनिकांच्या इतर काही तुकड्या कराराच्या पेटीच्या मागे चालत होत्या. १०  यहोशवाने सैनिकांना अशी आज्ञा दिली होती: “ओरडू नका किंवा तुमचा आवाज कोणाच्याही कानावर पडू देऊ नका. ज्या दिवशी मी तुम्हाला म्हणेन, ‘मोठ्याने ओरडा!’ तेव्हाच ओरडा; तोपर्यंत तोंडातून एकही शब्द काढू नका.” ११  यहोशवाच्या सांगण्याप्रमाणे, यहोवाच्या कराराच्या पेटीची शहराभोवती एक फेरी झाली. त्यानंतर ते छावणीत परत आले आणि त्यांनी रात्री तिथे मुक्काम केला. १२  दुसऱ्‍या दिवशी यहोशवा सकाळी लवकर उठला. याजकांनी यहोवाच्या कराराची पेटी उचलून घेतली.+ १३  आणि सात याजक, यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे आपापलं रणशिंग फुंकत चालत होते. त्या वेळी, सैनिकांच्या शस्त्रधारी तुकड्या त्यांच्या पुढे चालत होत्या; तर सैनिकांच्या आणखी काही तुकड्या, यहोवाच्या कराराच्या पेटीच्या मागे चालत होत्या. १४  दुसऱ्‍या दिवशीसुद्धा त्यांनी शहराभोवती एक फेरी घातली आणि त्यानंतर ते छावणीत परत आले. असं त्यांनी सहा दिवस केलं.+ १५  मग सातव्या दिवशी, दिवस उजाडताच ते उठले आणि त्यांनी त्याच पद्धतीने शहराला सात वेळा फेऱ्‍या घातल्या. फक्‍त त्या दिवशी त्यांनी शहराभोवती सात वेळा फेऱ्‍या घातल्या.+ १६  आणि सातव्या फेरीच्या वेळी जेव्हा याजकांनी रणशिंगं फुंकली तेव्हा यहोशवा सैनिकांना म्हणाला: “मोठ्याने ओरडा,+ कारण यहोवाने हे शहर तुमच्या हाती दिलंय! १७  हे शहर आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी यहोवाच्या आहेत आणि त्याने त्यांचा नाश करण्याचं ठरवलंय.+ फक्‍त राहाब+ वेश्‍येला आणि तिच्यासोबत तिच्या घरात असलेल्यांना जिवंत ठेवण्यात येईल. कारण आपण पाठवलेल्या गुप्तहेरांना तिने लपवून ठेवलं होतं.+ १८  पण नाश करण्यासाठी ठरवलेल्या गोष्टींपासून दूर राहा.+ नाहीतर तुम्हाला त्या गोष्टींचा मोह होऊन तुम्ही त्या छावणीत आणाल.+ आणि त्यामुळे इस्राएलची छावणीसुद्धा नाशाच्या पात्र ठरेल आणि आपल्यावर संकट येईल.+ १९  पण सर्व सोनं-चांदी, तसंच तांब्याच्या आणि लोखंडाच्या वस्तू यहोवासाठी पवित्र आहेत.+ त्यामुळे ते सर्व यहोवाच्या भांडारात आणा.”+ २०  मग रणशिंगं फुंकण्यात आली आणि सैनिकांनी मोठ्या आवाजात युद्धाची घोषणा केली.+ त्यांनी रणशिंगांचा आवाज ऐकून घोषणा केली, त्याच वेळी शहराची भिंत कोसळून जमीनदोस्त झाली.+ त्यानंतर ते सरळ शहरात घुसले आणि त्यांनी ते ताब्यात घेतलं. २१  त्यांनी शहरातले तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष, तसंच बैल, मेंढरं आणि गाढवं या सगळ्यांचा तलवारीने नाश केला.+ २२  यहोशवाने ज्या दोन माणसांना देशाची पाहणी करण्यासाठी पाठवलं होतं त्यांना तो म्हणाला: “त्या वेश्‍येच्या घरात जा, आणि तुम्ही वचन दिलं होतं त्याप्रमाणे तिला आणि तिच्या घरातल्या सगळ्यांना बाहेर आणा.”+ २३  त्यामुळे ते गुप्तहेर गेले आणि त्यांनी राहाबला, तिच्या आईवडिलांना, भावांना तसंच तिच्या घरातल्या सगळ्यांना बाहेर आणलं. त्यांनी तिच्या संपूर्ण कुटुंबाला+ सुरक्षितपणे इस्राएलच्या छावणीबाहेर एका ठिकाणी नेलं. २४  मग त्यांनी शहर आणि त्यातलं सगळं काही जाळून टाकलं. पण सोनं-चांदी, तसंच तांब्याच्या आणि लोखंडाच्या वस्तू हे सगळं त्यांनी यहोवाच्या घरातल्या भांडारात जमा केलं.+ २५  यहोशवाने यरीहो शहर हेरण्यासाठी पाठवलेल्या गुप्तहेरांना राहाब वेश्‍येने लपवून ठेवलं होतं.+ त्यामुळे फक्‍त राहाब, तिच्या वडिलांचं घराणं आणि जे कोणी तिच्यासोबत होते त्या सगळ्यांना यहोशवाने जिवंत ठेवलं;+ आणि आजपर्यंत राहाब इस्राएलमध्ये राहत आहे.+ २६  त्या वेळी यहोशवाने अशी शपथ घेतली:* “जो कोणी हे यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल तो यहोवापुढे शापित ठरेल. त्याने शहराचा पाया घातला तर त्याचा पहिला मुलगा मरेल; आणि त्याने शहराचे दरवाजे बसवले तर त्याचा सगळ्यात लहान मुलगा मरेल.”+ २७  अशा प्रकारे यहोवा यहोशवासोबत होता,+ आणि पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत यहोशवाची कीर्ती पसरली.+

तळटीपा

किंवा “प्रदक्षिणा.”
शब्दशः “मेंढ्याचं शिंग.”
किंवा “बराच वेळ ऐकाल.”
किंवा कदाचित, “लोकांना शपथ घ्यायला लावली.”