यहोशवा ७:१-२६

  • इस्राएली लोकांचा आय शहरात पराभव (१-५)

  • यहोशवाची प्रार्थना (६-९)

  • पाप केल्यामुळे इस्राएली लोक हरतात (१०-१५)

  • आखान पकडला जातो; त्याला दगडमार करण्यात येतो (१६-२६)

 पण नाशासाठी ठरवण्यात आलेल्या गोष्टींबद्दल+ जी आज्ञा देण्यात आली होती, ती मोडून इस्राएली लोक अविश्‍वासूपणे वागले. आखान+ याने त्या गोष्टींतून काही वस्तू ठेवून घेतल्या होत्या. त्यामुळे इस्राएली लोकांवर यहोवाचा क्रोध भडकला.+ आखान हा यहूदा वंशातला असून कर्मीचा मुलगा होता; कर्मी जब्दीचा मुलगा, तर जब्दी जेरहचा मुलगा होता. २  इकडे, यहोशवाने यरीहोतून काही माणसांना आय+ शहरात पाठवलं. हे शहर बेथेलच्या+ पूर्वेकडे असून बेथ-आवेनच्या जवळ होतं. यहोशवा त्यांना म्हणाला: “जा, आणि ते ठिकाण हेरून या.” त्यामुळे त्या माणसांनी जाऊन आय शहर हेरलं. ३  आणि यहोशवाकडे परत येऊन ते म्हणाले: “सगळ्याच सैनिकांना तिकडे जायची गरज नाही. आय शहरात फार कमी लोक राहतात. त्यामुळे ते जिंकण्यासाठी दोन-तीन हजार पुरुषसुद्धा पुरेसे आहेत. म्हणून सगळ्या सैनिकांना तिथे पाठवून त्यांना दमवू नकोस.” ४  त्यामुळे जवळजवळ ३,००० सैनिक तिथे गेले. पण त्यांना आय शहरातल्या लोकांपासून पळ काढावा लागला.+ ५  तिथल्या लोकांनी शहराच्या दरवाजापासून खाली शबारीमच्या* उतारापर्यंत त्यांचा पाठलाग केला. आणि त्यांनी इस्राएलच्या सुमारे ३६ सैनिकांना ठार मारलं. त्यामुळे इस्राएली लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला आणि त्यांचं धैर्य खचलं.* ६  यहोशवाने हे ऐकलं तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले. तो आणि इस्राएलचे सगळे वडीलजन संध्याकाळपर्यंत यहोवाच्या कराराच्या पेटीपुढे पालथे पडून राहिले, आणि आपल्या डोक्यावर धूळ फेकत राहिले. ७  यहोशवा देवाला म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू आम्हाला यार्देनच्या पलीकडे इतकं दूर का आणलंस? अमोरी लोकांच्या हाती आमचा नाश करण्यासाठी तू आम्हाला इथे आणलंस का? त्यापेक्षा आम्ही यार्देनच्या पलीकडेच* सुखात राहिलो असतो! ८  हे यहोवा मला माफ कर, पण इस्राएली लोक ज्या प्रकारे शत्रूंना पाठ दाखवून पळाले, ते पाहून मी आणखी काय बोलणार? ९  कनानी लोक आणि देशातले सगळे लोक जेव्हा हे ऐकतील, तेव्हा ते आम्हाला चारही बाजूंनी घेरतील आणि पृथ्वीवरून आमचं नाव कायमचं मिटवून टाकतील. तेव्हा तुझ्या महान नावाला किती मोठा कलंक लागेल!”+ १०  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “ऊठ, असा जमिनीवर पडून शोक का करत आहेस? ११  इस्राएलने पाप केलंय. मी त्यांना जो करार+ पाळायला सांगितला होता, तो त्यांनी मोडलाय. नाशासाठी ठरवलेल्या गोष्टींमधून+ काही वस्तू चोरून+ त्यांनी त्या आपल्या सामानात लपवून ठेवल्या आहेत.+ १२  म्हणून इस्राएली लोक त्यांच्या शत्रूंचा सामना करू शकणार नाहीत. ते शत्रूंना पाठ दाखवून त्यांच्यापासून पळ काढतील. कारण आता ते नाशाच्या लायक ठरले आहेत. आणि जोपर्यंत नाशासाठी ठरवलेला माणूस तुमच्यामधून काढून टाकला जात नाही, तोपर्यंत मी तुमच्यासोबत असणार नाही.+ १३  तर आता ऊठ, आणि लोकांना शुद्ध कर.+ त्यांना सांग, ‘उद्यासाठी स्वतःला शुद्ध करा. कारण इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: “हे इस्राएल! तुमच्यामध्ये असा कोणीतरी आहे जो नाशाच्या लायक ठरवला गेला आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्यामधून काढून टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही शत्रूंचा सामना करू शकणार नाही. १४  सकाळी आपापल्या वंशांप्रमाणे एकत्र या. मग यहोवा जो वंश निवडेल+ तो आपापल्या घराण्याप्रमाणे पुढे येईल; मग यहोवा जे घराणं निवडेल ते आपापल्या कुटुंबाप्रमाणे पुढे येईल; आणि यहोवा ज्या कुटुंबाला निवडेल त्यातले पुरुष एकेक करून पुढे येतील. १५  आणि त्यांच्यापैकी ज्याच्याकडे नाशासाठी ठरवलेल्या वस्तू सापडतील, त्याला आणि त्याच्यासोबत त्याचं जे काही आहे ते सर्व जाळून टाकलं जाईल.+ कारण त्याने यहोवाचा करार+ मोडलाय आणि इस्राएलमध्ये लज्जास्पद काम केलंय.”’” १६  त्यामुळे दुसऱ्‍या दिवशी यहोशवा सकाळी लवकर उठला. त्याने सर्व इस्राएली लोकांना आपापल्या वंशांप्रमाणे देवासमोर एकत्र आणलं, तेव्हा यहूदाचा वंश वेगळा करण्यात आला. १७  मग त्याने यहूदाच्या घराण्यांना समोर आणलं, तेव्हा जेरहचं+ घराणं वेगळं केलं गेलं. मग जेरहच्या घराण्यातल्या सर्व कुटुंबांना समोर आणण्यात आलं, तेव्हा जब्दीच्या कुटुंबाला वेगळं करण्यात आलं. १८  शेवटी त्याने जब्दीच्या कुटुंबातल्या सर्व पुरुषांना एकेक करून समोर आणलं, तेव्हा आखानला वेगळं करण्यात आलं.+ यहूदा वंशातला आखान हा कर्मीचा मुलगा होता; कर्मी हा जब्दीचा, तर जब्दी जेरहचा मुलगा होता. १९  मग यहोशवा आखानला म्हणाला: “माझ्या मुला, इस्राएलचा देव यहोवा याचा आदर कर. त्याच्यापुढे आपलं पाप कबूल कर. माझ्यापासून काहीही लपवू नकोस. तू काय केलंस ते मला खरं खरं सांग.” २०  तेव्हा आखान यहोशवाला म्हणाला: “इस्राएलचा देव यहोवा याच्याविरुद्ध मीच पाप केलंय. मी काय केलं ते तुला सांगतो: २१  लुटीतल्या वस्तूंमध्ये जेव्हा मला शिनारचा+ एक अतिशय सुंदर आणि महागडा झगा, २०० शेकेल* चांदी आणि ५० शेकेल वजनाची एक सोन्याची वीट दिसली, तेव्हा मला त्यांचा मोह झाला आणि मी त्या घेतल्या. त्या वस्तू मी माझ्या तंबूत जमिनीत पुरून ठेवल्या आहेत; सोनं-चांदी सगळ्यात खाली ठेवलंय.” २२  तेव्हा यहोशवाने लगेच आपली माणसं पाठवली आणि ती माणसं धावत आखानच्या तंबूकडे गेली. तंबूत त्यांना झगा आणि त्याखाली लपवून ठेवलेलं सोनं-चांदी सापडलं. २३  त्यांनी तंबूतून त्या सगळ्या वस्तू घेतल्या, आणि यहोशवा व सर्व इस्राएली लोक यांच्याकडे आणून यहोवासमोर ठेवल्या. २४  मग यहोशवा आणि सर्व इस्राएली लोक यांनी जेरहचा मुलगा आखान+ याला; तसंच त्याच्याकडे असलेली चांदी, महागडा झगा, सोन्याची वीट,+ त्याची मुलं-मुली, त्याचे बैल, गाढवं, बकऱ्‍या, मेंढरं, त्याचा तंबू आणि त्याचं जे काही होतं ते सगळं अखोरच्या खोऱ्‍यात*+ आणलं. २५  यहोशवा म्हणाला: “तू आमच्यावर संकट का आणलंस?+ आता यहोवा तुझ्यावर संकट आणेल.” मग सगळ्या इस्राएली लोकांनी त्यांना दगडमार करून जाळून टाकलं.+ अशा प्रकारे त्या सगळ्यांना दगडमार करून ठार मारण्यात आलं. २६  मग त्यांनी त्याच्यावर दगडांचा मोठा ढिगारा रचला; तो आजही तिथे आहे. त्यानंतर यहोवाचा क्रोध शांत झाला.+ या घटनेमुळे आजही त्या ठिकाणाला आखोरचं* खोरं म्हणतात.

तळटीपा

म्हणजे, “खाणी.”
शब्दशः “काळजाचं पाणी पाणी झालं.”
म्हणजे, पूर्वेकडे.
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
म्हणजे, “संकट; अनर्थ.”