यहोशवा ८:१-३५

  • आय शहरावर हल्ला करायला यहोशवा काही सैनिकांना लपवून बसवतो (१-१३)

  • आय शहरावर कब्जा (१४-२९)

  • एबाल डोंगरावर नियमशास्त्र वाचलं जातं (३०-३५)

 मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “घाबरून जाऊ नकोस किंवा भिऊ नकोस.+ सगळ्या सैनिकांना घेऊन आय शहरावर हल्ला कर. त्या शहराचा राजा, त्याचे लोक, ते शहर आणि त्याचा सगळा प्रदेश मी तुझ्या हाती दिलाय.+ २  तू यरीहोच्या आणि त्याच्या राजाच्या बाबतीत जे केलं,+ तेच आय शहराच्या आणि त्याच्या राजाच्या बाबतीतही कर. पण आय शहरातली लूट आणि गुरंढोरं मात्र तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता. त्या शहरावर हल्ला करण्यासाठी सैनिकांना शहराच्या मागच्या बाजूला लपवून बसव.” ३  त्यामुळे यहोशवा आणि त्याच्यासोबत सगळे सैनिक आय शहरावर हल्ला करण्यासाठी निघाले. यहोशवाने ३०,००० शूर योद्धे निवडले आणि रात्रीच त्यांना पाठवून दिलं. ४  त्याने त्यांना आज्ञा दिली: “शहराच्या मागच्या बाजूला लपून बसा. शहरापासून फार दूर जाऊ नका आणि हल्ला करण्यासाठी सगळे तयार राहा. ५  मी आणि माझ्यासोबतचे सगळे लोक समोरच्या बाजूने शहराजवळ येऊ. मग मागच्या वेळेसारखं ते आमच्यावर हल्ला करायला बाहेर आले,+ की आम्ही त्यांच्यापासून पळ काढू. ६  त्यांना असं वाटेल की आम्ही घाबरून आधीसारखंच त्यांच्यापासून पळत आहोत,+ आणि ते आमचा पाठलाग करायला बाहेर येतील. तेव्हा आम्ही त्यांना शहरापासून दूर नेईपर्यंत पळ काढू. ७  मग लपून बसलेल्या ठिकाणाहून तुम्ही बाहेर या आणि शहरावर कब्जा करा. कारण तुमचा देव यहोवा ते शहर नक्की तुमच्या हाती देईल. ८  शहरावर कब्जा केल्यावर लगेच शहराला आग लावा.+ यहोवाने जसं सांगितलंय तसंच करा. ही माझी आज्ञा आहे.” ९  मग यहोशवाने त्यांना हल्ला करण्यासाठी लपून बसायच्या ठिकाणी पाठवून दिलं. ते आय शहराच्या पश्‍चिमेकडे, म्हणजे आय आणि बेथेलच्या मधे लपून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री बाकीच्या सैनिकांसोबत राहिला. १०  सकाळी लवकर उठून यहोशवाने सैनिकांना एकत्र केलं. मग त्याने आणि इस्राएलच्या वडिलांनी सैनिकांपुढे चालत जाऊन त्यांना आय शहराकडे नेलं. ११  त्याच्यासोबत असलेले सैनिक+ समोरच्या बाजूने शहराकडे गेले, आणि त्यांनी आय शहराच्या उत्तरेकडे छावणी केली. त्यांच्या आणि आय शहराच्या मधे फक्‍त एक खोरं होतं. १२  त्याच वेळी, यहोशवाने आय शहराच्या पश्‍चिमेकडे, म्हणजे आय आणि बेथेलच्या+ मधे जवळजवळ ५,००० माणसांना लपवून बसवलं होतं.+ १३  अशा प्रकारे, शहराच्या उत्तरेकडे सैनिकांनी मुख्य छावणी केली,+ आणि लपून बसलेले सैनिक शहराच्या पश्‍चिमेकडे होते. त्या रात्री यहोशवा खोऱ्‍यात गेला. १४  आय शहराच्या राजाने हे पाहिलं, तेव्हा तो आणि त्याचे लोक इस्राएलचा सामना करण्यासाठी पहाटेच शहराबाहेर पडले. त्यांचा सामना करण्यासाठी ते अशा ठिकाणी पोहोचले जिथून समोर अराबाचं मैदान दिसत होतं. पण आपल्यावर हल्ला करण्यासाठी शहराच्या मागे सैनिक लपून बसलेत हे राजाला माहीत नव्हतं. १५  आय शहराच्या लोकांनी हल्ला केला, तेव्हा यहोशवा आणि सर्व इस्राएली सैनिक ओसाड रानाकडे जाणाऱ्‍या रस्त्याने पळू लागले.+ १६  त्यामुळे त्यांचा पाठलाग करण्यासाठी आय शहरातल्या सर्व माणसांना बोलावण्यात आलं. यहोशवाचा पाठलाग करत ते शहरापासून दूर गेले. १७  आय शहरात आणि बेथेल शहरात असा एकही पुरुष मागे राहिला नाही, जो इस्राएलचा पाठलाग करण्यासाठी गेला नाही. शहराचे दरवाजे तसेच उघडे टाकून ते इस्राएली लोकांच्या मागे गेले. १८  मग यहोवा यहोशवाला म्हणाला: “तुझ्या हातात असलेली बरची* आय शहराच्या दिशेने रोखून धर;+ मी ते शहर तुझ्या हाती देतोय.”+ त्यामुळे यहोशवाने आपल्या हातातली बरची त्या शहराच्या दिशेने रोखून धरली. १९  यहोशवाने आपला हात पुढे करताच हल्ला करण्यासाठी लपून बसलेले सैनिक आपल्या जागेवरून उठले आणि शहरात घुसून त्यांनी त्यावर कब्जा केला. कब्जा केल्यावर त्यांनी लगेच शहराला आग लावली.+ २०  आय शहराच्या माणसांनी मागे वळून पाहिलं, तेव्हा त्यांना शहरातून वर उठणारे धुराचे लोट दिसले. त्यामुळे त्यांचा धीर खचला आणि कुठल्याही दिशेने पळण्याची ताकद त्यांच्यात उरली नाही. मग ओसाड रानाकडे पळणारे इस्राएली सैनिक पाठलाग करणाऱ्‍यांवर उलटले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. २१  यहोशवाने आणि त्याच्यासोबत असलेल्या सैनिकांनी जेव्हा पाहिलं, की लपून बसलेल्या सैनिकांनी शहरावर कब्जा मिळवला आहे आणि शहरातून धूर निघत आहे, तेव्हा त्यांनी उलटून आय शहराच्या माणसांवर हल्ला केला. २२  तसंच, शहरावर कब्जा मिळवणारे सैनिकसुद्धा हल्ला करण्यासाठी बाहेर आले. अशा रितीने आय शहराची माणसं दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडली. इस्राएली सैनिकांनी त्यांच्यावर असा हल्ला केला, की त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही किंवा त्यांच्या हातून निसटू शकला नाही.+ २३  पण, आय शहराच्या राजाला+ मात्र त्यांनी जिवंत पकडलं आणि यहोशवासमोर आणलं. २४  पाठलाग करत आलेल्या आय शहराच्या एकूण-एक माणसाला ओसाड रानात तलवारीने मारून टाकल्यानंतर, इस्राएलचे सगळे सैनिक परत आय शहरात गेले आणि उरलेल्या लोकांनाही त्यांनी तलवारीने मारून टाकलं. २५  त्या दिवशी आय शहराचे सगळे लोक, म्हणजे १२,००० स्त्री-पुरुष मारले गेले. २६  आय शहराच्या सगळ्या लोकांचा पूर्णपणे नाश करेपर्यंत यहोशवाने शहराकडे रोखून धरलेली बरची मागे घेतली नाही.+ २७  पण यहोवाने यहोशवाला आज्ञा दिली होती, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी आय शहरातली लूट आणि गुरंढोरं मात्र स्वतःसाठी ठेवून घेतली.+ २८  मग यहोशवाने आय शहर जाळून टाकलं आणि ते कायमचं दगडमातीचा ढिगारा बनलं.+ आणि आजसुद्धा ते तसंच आहे. २९  त्याने आय शहराच्या राजाला मारून टाकलं आणि संध्याकाळपर्यंत त्याचा मृतदेह वधस्तंभावर* लटकवून ठेवला. मग सूर्यास्त होण्याच्या वेळी यहोशवाने त्याचा मृतदेह खाली उतरवण्याची आज्ञा दिली.+ त्यानंतर त्यांनी तो मृतदेह शहराच्या दरवाजासमोर फेकून दिला, आणि त्यावर दगडांचा मोठा ढीग रचला; तो आजपर्यंत तिथेच आहे. ३०  त्यानंतर यहोशवाने इस्राएलचा देव यहोवा याच्यासाठी एबाल डोंगरावर+ एक वेदी बांधली. ३१  यहोवाचा सेवक मोशे याने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे आणि मोशेच्या नियमशास्त्रात+ लिहिल्याप्रमाणे त्याने, “अशा दगडांची वेदी बांधली ज्यांना लोखंडाच्या कोणत्याही हत्याराचा स्पर्श झालेला नव्हता.”+ त्या वेदीवर त्यांनी यहोवाला होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिली.+ ३२  मग मोशेने इस्राएली लोकांसमोर जे नियमशास्त्र लिहिलं होतं,+ ते यहोशवाने तिथे दगडांवर लिहून काढलं.+ ३३  सर्व इस्राएली लोक, तसंच त्यांचे वडीलजन, अधिकारी आणि न्यायाधीश हे यहोवाच्या कराराची पेटी घेऊन जाणाऱ्‍या लेवी वंशाच्या याजकांसमोर पेटीच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. त्यांच्यामध्ये मूळचे इस्राएली आणि विदेशी लोकसुद्धा होते.+ इस्राएली लोकांना आशीर्वाद मिळावा, म्हणून (यहोवाचा सेवक मोशे याने पूर्वी आज्ञा दिली होती त्याप्रमाणे+) त्यांच्यापैकी अर्धे लोक गरिज्जीम डोंगरासमोर, तर अर्धे लोक एबाल डोंगरासमोर+ उभे राहिले. ३४  त्यानंतर यहोशवाने नियमशास्त्रातली+ सर्व वचनं, त्यात लिहिलेले सर्व आशीर्वाद+ आणि शाप+ मोठ्याने वाचले. ३५  यहोशवाने इस्राएलच्या सर्व मंडळीसमोर मोशेच्या सगळ्या आज्ञा मोठ्याने वाचून दाखवल्या. त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही.+ इस्राएलच्या मंडळीमध्ये स्त्रिया, मुलंबाळं आणि त्यांच्यामध्ये राहणारे विदेशी लोकही होते.+

तळटीपा

म्हणजे, भाल्यासारखं एक शस्त्र.
किंवा “झाडावर.”