याकोब याचं पत्र १:१-२७
१ ठिकठिकाणी विखुरलेल्या १२ वंशांना, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब+ याचा
नमस्कार!
२ माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना.+
३ कारण तुम्हाला माहीत आहे, की तुमच्या विश्वासाची अशी पारख झाल्यामुळे धीर उत्पन्न होतो.+
४ पण, धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्ही सर्व बाबतींत परिपूर्ण ठराल आणि तुमच्यात कोणताही दोष राहणार नाही.+
५ तर मग, तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असली, तर त्याने ती देवाजवळ मागत राहावी+ म्हणजे त्याला ती दिली जाईल.+ कारण देव कोणालाही कमी न लेखता* सगळ्यांना उदारपणे बुद्धी देतो.+
६ पण, त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता+ विश्वासाने मागत राहावं,+ कारण शंका घेणारा वाऱ्याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातल्या लाटेसारखा आहे.
७ खरंतर, त्याने यहोवाकडून* काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये.
८ तो माणूस चंचल मनाचा+ आणि आपल्या सर्व कार्यांत अस्थिर आहे.
९ गरीब बांधवाने त्याला सन्मान मिळाल्याबद्दल आनंद* करावा,+
१० तर श्रीमंताने नमवण्यात आल्याबद्दल,+ कारण तो रानातल्या फुलासारखा नाहीसा होईल.
११ ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे रोप कोमेजून जातं, त्याचं फूल गळून पडतं आणि त्याचं सौंदर्य नष्ट होतं, त्याचप्रमाणे श्रीमंत माणूसही संपत्तीच्या मागे धावत असल्यामुळे नाहीसा होईल.+
१२ जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी!+ कारण परीक्षा पार केल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल.+ यहोवाने* आपल्यावर प्रेम करत राहणाऱ्यांना हा मुकुट देण्याचं वचन दिलं आहे.+
१३ संकट येतं, तेव्हा “देव माझी परीक्षा घेतोय,” असं कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.
१४ तर प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो* तेव्हा परीक्षेत पडतो.+
१५ मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप घडल्यावर मृत्यू ओढवतो.+
१६ माझ्या प्रिय बांधवांनो, फसू नका.
१७ प्रत्येक चांगली देणगी आणि परिपूर्ण दान वरून,+ म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या* पित्याकडून येतं.+ तो बदलत जाणाऱ्या सावल्यांप्रमाणे कधीही बदलत नाही.+
१८ त्याची इच्छा असल्यामुळेच त्याने आपल्याला सत्याच्या वचनाद्वारे जन्माला आणलं.+ हे यासाठी, की त्याने निर्माण केलेल्यांपैकी आपण एक प्रकारे पहिलं फळ बनावं.+
१९ माझ्या प्रिय बांधवांनो, ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं;+ लगेच रागावू नये,+
२० कारण रागाच्या आहारी जाणारा माणूस देवाच्या नीतिमत्त्वाप्रमाणे कार्य करू शकत नाही.+
२१ तेव्हा, सर्व प्रकारची अशुद्धता आणि वाईटपणाचा प्रत्येक अंश* आपल्यातून काढून टाका.+ तसंच, नम्र व्हा आणि तुमचं तारण करायला* समर्थ असलेली वचनं देवाला तुमच्या हृदयात रुजवू द्या.
२२ पण, खोट्या तर्काने स्वतःची फसवणूक करून फक्त वचन ऐकणारेच बनू नका, तर त्याप्रमाणे चालणारेही बना.+
२३ कारण जो वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे चालत नाही+ तो आरशात आपला चेहरा पाहणाऱ्या माणसासारखा आहे.
२४ कारण तो स्वतःला पाहून निघून जातो आणि आपण कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे लगेच विसरून जातो.
२५ पण जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचं बारकाईने परीक्षण करतो+ आणि त्याचं पालन करत राहतो तो ऐकून विसरणारा नाही, तर त्याप्रमाणे चालणारा बनतो आणि असं केल्यामुळे त्याला आनंद मिळेल.+
२६ आपण देवाचे उपासक* आहोत असं समजणारा एखादा माणूस आपल्या जिभेला लगाम घालत नसेल,*+ तर तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि त्याची उपासना व्यर्थ आहे.
२७ आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना हीच आहे, की आपण अनाथ+ आणि विधवा+ यांच्या कठीण परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी+ आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावं.+
तळटीपा
^ किंवा “दोष न लावता.”
^ शब्दशः “अभिमान बाळगावा.”
^ किंवा “जणू गळाला लागतो.”
^ किंवा “सूर्य, चंद्र आणि तारे यांसारख्या ज्योती निर्माण करणाऱ्या.”
^ किंवा “तुमचे जीव वाचवायला.”
^ किंवा कदाचित, “मर्यादेबाहेरचा वाईटपणा.”
^ किंवा “धार्मिक वृत्तीचे.”
^ किंवा “ताब्यात ठेवत नसेल.”