यिर्मया १२:१-१७

  • यिर्मयाची तक्रार (१-४)

  • यहोवाचं उत्तर (५-१७)

१२  हे यहोवा, मी तुझ्याकडे जेव्हा तक्रार घेऊन येतो,आणि न्यायाविषयी तुझ्याशी बोलतो, तेव्हा तूच नीतिमान ठरतोस.+ पण मग दुष्ट लोक आपल्या कामात यशस्वी का होतात?+ आणि विश्‍वासघातकी लोक निश्‍चिंत का असतात?  २  तू त्यांना एखाद्या रोपासारखं जमिनीत लावलं आणि त्यांनी मूळ धरलं. ते वाढले आणि त्यांनी फळ दिलं. त्यांच्या ओठांवर तर तू आहेस, पण त्यांच्या मनातल्या विचारांपासून तू फार दूर आहेस.+  ३  पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्‍वासू आहे.+ तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्‍या मेंढरांसारखं वेगळं काढ;कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव.  ४  आणखी किती काळ देशाचा असाच नाश होत राहील? आणखी किती दिवस रानातली झाडं-झुडपं सुकत राहतील?+ लोकांच्या दुष्ट कामांमुळे जनावरांचा आणि पक्ष्यांचा नाश झाला आहे. कारण लोक म्हणतात: “आपलं काय होईल हे तो पाहू शकत नाही.”  ५  मग देव मला म्हणाला: “पायी चालणाऱ्‍यांसोबत तू धावताना दमलास,तर घोड्यांसोबत तू शर्यतीत कसा धावशील?+ शांतीच्या देशात तुला सुरक्षित वाटतंय,पण यार्देन नदीच्या काठावर असलेल्या दाट जंगलांत तू काय करशील?  ६  कारण तुझे स्वतःचे भाऊ, तुझ्या वडिलांचं घराणंच तुझ्याशी विश्‍वासघाताने वागलंय.+ त्यांनी तुझ्याविरुद्ध आवाज चढवलाय. पण तू त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नकोस,ते तुझ्याशी गोडगोड बोलले तरी त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नकोस.”  ७  “मी माझ्या घराचा त्याग केलाय;+ मी माझ्या वारशाचा त्याग केलाय.+ जी मला परमप्रिय आहे, तिला मी तिच्या शत्रूंच्या हवाली केलंय.+  ८  माझा वारसा मला जंगलातल्या सिंहासारखा झालाय. त्याने माझ्यावर गर्जना केली. म्हणून मी त्याचा द्वेष करतो.  ९  माझा वारसा माझ्यासाठी ठिपकेदार* शिकारी पक्ष्यासारखा झालाय;इतर शिकारी पक्षी त्याला घेरतात आणि त्याच्यावर हल्ला करतात.+ रानातल्या सगळ्या प्राण्यांनो, या! एकत्र होऊन खायला या!+ १०  अनेक मेंढपाळांनी माझा द्राक्षमळा उद्ध्‌वस्त करून टाकलाय;+त्यांनी माझ्या हिश्‍शाची जमीन तुडवली आहे.+ त्यांनी माझ्या आवडीची जमीन ओसाड रान करून टाकली आहे. ११  ती पडीक झाली आहे. तिचा नाश झालाय;* ती माझ्यासमोर ओसाड पडून आहे.+ संपूर्ण देशाला उजाड करून टाकण्यात आलंय,पण कोणालाही त्याची पर्वा नाही.+ १२  ओसाड रानातल्या सगळ्या पाऊलवाटांवर नाश करणारे आले आहेत. कारण यहोवाची तलवार एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत देशाचा नाश करत आहे.+ तिथे कोणालाही शांती नाही. १३  त्यांनी गव्हाची पेरणी केली, पण कापणीच्या वेळी त्यांच्या वाट्याला काटेकुसळेच आले.+ त्यांनी बरीच मेहनत केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यहोवाच्या जळजळीत क्रोधामुळे,त्यांना आपल्या पिकाची लाज वाटेल.” १४  यहोवा असं म्हणतो: “जो वारसा मी माझ्या इस्राएली लोकांना दिला होता, त्याला हात लावणाऱ्‍या माझ्या सगळ्या दुष्ट शेजाऱ्‍यांना+ मी त्यांच्या देशातून उपटून टाकीन.+ आणि मी यहूदाच्या घराण्यालाही त्यांच्यातून उपटून टाकीन. १५  पण त्यांना उपटून टाकल्यावर, मी पुन्हा त्यांच्यावर दया करीन. आणि त्यांच्यातल्या प्रत्येकाला त्याच्या वारशाच्या प्रदेशाकडे परत आणीन.” १६  “ते जर माझ्या लोकांच्या चालीरिती शिकले, आणि जसं त्यांनी माझ्या लोकांना बआलच्या नावाने शपथ घ्यायला शिकवलं, तसं ते माझ्या नावाने शपथ घ्यायला शिकले आणि म्हणाले, ‘यहोवाच्या जीवनाची शपथ!’ तर माझ्या लोकांमध्ये त्यांची वस्ती होईल. १७  पण जर त्यांपैकी एखाद्या राष्ट्राने माझं ऐकलं नाही, तर मी त्याला उपटून टाकीन आणि त्याचा समूळ नाश करीन,” असं यहोवा म्हणतो.+

तळटीपा

किंवा “रंगीबेरंगी.”
किंवा कदाचित, “ती शोक करत आहे.”