यिर्मया १६:१-२१
१६ यहोवाकडून पुन्हा एकदा मला असा संदेश मिळाला:
२ “तू या ठिकाणी लग्न करू नकोस किंवा मुलंबाळं होऊ देऊ नकोस.
३ कारण इथे जन्मलेल्या मुलाबाळांबद्दल आणि या देशात त्यांना जन्म देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांबद्दल यहोवा असं म्हणतो:
४ ‘ते जीवघेण्या आजारांनी मरतील.+ त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही किंवा कोणी त्यांना पुरणार नाही; ते जमिनीवर खत म्हणून पडून राहतील.+ ते तलवारीने आणि दुष्काळाने मरतील.+ आणि त्यांची प्रेतं आकाशातल्या पक्ष्यांसाठी आणि जमिनीवरच्या प्राण्यांसाठी अन्न होईल.’
५ यहोवा म्हणतो:
‘ज्या घरात शोक करणाऱ्यांसाठी जेवण ठेवलं जातं तिथे जाऊ नकोस,तू शोक करायला किंवा सांत्वन करायला जाऊ नकोस.’+
‘कारण या लोकांमधून मी माझी शांती काढून घेतली आहे,माझं एकनिष्ठ प्रेम आणि दया मी त्यांच्यामधून काढून घेतली आहे,’ असं यहोवा म्हणतो.+
६ ‘या देशातले सगळे लहान-थोर मरतील.
त्यांना कोणी पुरणार नाही,त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही,आणि त्यांच्यासाठी कोणीही आपल्या शरीरावर घाव करून घेणार नाही किंवा डोक्याचं मुंडण करणार नाही.*
७ शोक करत असलेल्यांचं सांत्वन करायला,कोणीही जेवण देणार नाही.
त्यांची आई किंवा वडील यांचा जर मृत्यू झाला,तर कोणीही त्यांना सांत्वनाचा प्याला देणार नाही.
८ ज्या घरात मेजवानी आहे तिथे जाऊ नकोस,त्यांच्यासोबत खायला-प्यायला बसू नकोस.’
९ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी तुमच्याच जीवनकाळात आणि तुमच्याच डोळ्यांसमोर या ठिकाणी होणारा जल्लोषाचा आणि आनंदोत्सवाचा आवाज बंद करून टाकीन; वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज मी बंद करून टाकीन.’+
१० तू जेव्हा या गोष्टी लोकांना सांगशील, तेव्हा ते तुला असं विचारतील, ‘यहोवा आमच्यावर संकट आणण्याविषयी का बोलला? असं कोणतं पाप किंवा असा कोणता अपराध आम्ही आमच्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध केलाय?’+
११ तेव्हा तू त्यांना असं म्हण, ‘यहोवा म्हणतो, “कारण तुमच्या वाडवडिलांनी मला सोडून दिलं+ आणि इतर देवांच्या नादी लागून त्यांनी त्यांची सेवा केली व ते त्यांच्या पाया पडले.+ पण मला मात्र त्यांनी सोडून दिलं, आणि माझे नियम त्यांनी पाळले नाहीत.+
१२ आणि तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही वाईट वागलात.+ तुमच्यापैकी प्रत्येक जण, माझं ऐकण्याऐवजी स्वतःच्या हट्टी आणि दुष्ट मनाचं ऐकतो.+
१३ म्हणून मी तुम्हाला या देशातून काढून टाकीन आणि तुम्हाला व तुमच्या वाडवडिलांना माहीत नसलेल्या देशात फेकून देईन.+ तिथे तुम्हाला रात्रंदिवस इतर देवांची सेवा करावी लागेल,+ कारण मी तुमच्यावर मुळीच दयामाया करणार नाही.”’
१४ यहोवा म्हणतो: ‘पण असे दिवस येत आहेत जेव्हा, “इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणाऱ्या यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं ते म्हणणार नाहीत.+
१५ याउलट, “इस्राएली लोकांची उत्तरेच्या देशात आणि इतर सर्व देशांत पांगापांग करणाऱ्या आणि त्यांना तिथून बाहेर आणणाऱ्या यहोवाच्या जीवनाची शपथ!” असं ते म्हणतील. जो देश मी त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्यात मी त्यांना नक्की परत आणीन.’+
१६ यहोवा म्हणतो, ‘पाहा! मी पुष्कळ मच्छीमारांना बोलावतोय,ते येऊन त्यांना जाळ्यात पकडतील.
त्यानंतर मी पुष्कळ शिकाऱ्यांना बोलवीन,ते प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक टेकडीवर लपलेल्यांना,तसंच, प्रत्येक खडकाच्या कपारीत लपलेल्यांना शोधून त्यांची शिकार करतील.
१७ कारण ते जे काही करतात त्यावर माझी नजर आहे.
ते माझ्यापासून लपलेले नाहीत,किंवा त्यांचे अपराध माझ्या नजरेतून सुटलेले नाहीत.
१८ सगळ्यात आधी तर मी त्यांना त्यांच्या अपराधांचा आणि पापांचा पूर्ण मोबदला देईन.+
कारण त्यांनी आपल्या निर्जीव देवांच्या घृणास्पद मूर्तींनी माझा देश दूषित करून टाकलाय,आणि माझ्या वारशाचा प्रदेश त्यांनी आपल्या किळसवाण्या गोष्टींनी भरून टाकलाय.’”+
१९ हे यहोवा! तूच माझं बळ आणि माझा मजबूत गड आहेस,संकटाच्या काळात तूच माझं आश्रयस्थान आहेस.+
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांतल्या राष्ट्रांतून लोक तुझ्याकडे येतील,आणि म्हणतील: “आमच्या वाडवडिलांना वारशात फक्त खोटेपणा मिळाला;कोणताही फायदा नसलेल्या व्यर्थ गोष्टीच मिळाल्या.”+
२० एखादा माणूस स्वतःसाठी देव बनवू शकतो का?
तो जे काही बनवतो ते मुळात देव नाहीत.+
२१ “म्हणून आता मी त्यांना दाखवून देईन,या वेळी मी त्यांना माझी शक्ती आणि ताकद दाखवून देईन.
तेव्हा त्यांना कळेल, की माझं नाव यहोवा आहे.”
तळटीपा
^ देवाला सोडून गेलेले इस्राएली लोक मूर्तिपूजक राष्ट्रांच्या या प्रथा पाळायचे.