यिर्मया १८:१-२३

  • कुंभाराच्या हातातली माती (१-१२)

  • यहोवा इस्राएलकडे पाठ फिरवतो (१३-१७)

  • यिर्मयाविरुद्ध कट; त्याची विनंती (१८-२३)

१८  यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “ऊठ आणि कुंभाराच्या घरी जा.+ तिथे मी तुला माझा संदेश सांगीन.” ३  म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो. त्या वेळी तो त्याच्या चाकावर काम करत होता. ४  पण तो जे मातीचं भांडं बनवत होता, ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेलं. म्हणून मग कुंभाराने त्या मातीला हवा तसा आकार देऊन दुसरं एक भांडं बनवलं. ५  तेव्हा यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: ६  “यहोवा असं म्हणतो, ‘इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! या कुंभाराने जसं केलं तसं मी तुमच्या बाबतीतही करू शकत नाही का? पाहा! कुंभाराच्या हातात जशी माती असते, तसं हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, तुम्ही माझ्या हातात आहात.+ ७  एखाद्या राष्ट्राविषयी किंवा राज्याविषयी मी जर असं म्हणालो, की मी ते मुळासकट उपटून टाकीन, किंवा उलथून त्याचा नाश करीन;+ ८  पण त्या राष्ट्राने आपला दुष्टपणा सोडून दिला, तर मीसुद्धा त्याच्यावर संकट आणण्याचा माझा विचार बदलून टाकीन.+ ९  याउलट, एखाद्या राष्ट्राविषयी किंवा राज्याविषयी मी जर म्हणालो, की मी ते स्थापन करून उभारीन; १०  पण त्या राष्ट्राने माझ्या नजरेत वाईट ते केलं आणि माझं ऐकलं नाही, तर त्याचं भलं करण्याचा माझा विचार मी बदलून टाकीन.’ ११  आता यहूदाच्या माणसांना आणि यरुशलेमच्या लोकांना असं सांग: ‘यहोवा म्हणतो, “पाहा! मी तुमच्याविरुद्ध योजना करतोय आणि तुमच्यावर संकट आणायची तयारी करतोय. कृपा करून तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या, आपली वागणूक सुधारा आणि आपल्या चालीरिती बदला.”’”+ १२  पण ते म्हणाले: “असं करण्यात काय अर्थ आहे?+ आम्हाला वाटतं तसंच आम्ही वागू. आमच्यातला प्रत्येक जण हट्टीपणे आणि आपल्या दुष्ट मनाप्रमाणे वागेल.”+ १३  म्हणून यहोवा असं म्हणतो: “तुम्ही स्वतः इतर राष्ट्रांकडे जाऊन विचारा. असं काही कोणी कधी ऐकलंय का? इस्राएलच्या कुमारीने अतिशय भयंकर कृत्य केलंय.+ १४  लबानोनच्या खडकाळ उतारांवरचा बर्फ कधी नाहीसा होतो का? किंवा लबानोनच्या डोंगरांवरून वाहणारं थंड पाणी कधी आटतं का? १५  पण माझे लोक मात्र मला विसरून गेलेत.+ ते व्यर्थ गोष्टींसाठी बलिदानांचं हवन करतात.+ ज्या मार्गाने त्यांचे वाडवडील चालायचे त्या मार्गात ते लोकांना अडखळवतात,+आणि त्यांना ओबडधोबड असलेल्या आडवाटेने* चालायला लावतात. १६  त्यामुळे त्यांच्या देशाची कायमची अशी अवस्था होईल, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसेल,+आणि ते शिट्टी वाजवून त्याची थट्टा करतील.+ तिथून येणारा-जाणारा प्रत्येक जण देशाची अवस्था पाहून चकित होईल आणि थट्टेने आपलं डोकं हलवेल.+ १७  पूर्वेचा वारा जसं सुकलेलं गवत विखरून टाकतो, तसं मी त्यांना त्यांच्या शत्रूंपुढे विखरून टाकीन. ज्या दिवशी त्यांच्यावर संकट कोसळेल त्या दिवशी मी त्यांच्याकडे बघणारही नाही; मी त्यांच्याकडे पाठ फिरवीन.”+ १८  ते म्हणाले: “चला, आपण यिर्मयाविरुद्ध कट रचू.+ कारण याजकांकडून शिक्षण,* बुद्धिमान लोकांकडून सल्ला आणि संदेष्ट्यांकडून संदेश आपल्याला कायम मिळत राहील. आपण त्याच्यावर आरोप लावू आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू.” १९  हे यहोवा, माझ्याकडे लक्ष दे. माझे शत्रू काय बोलत आहेत ते ऐक. २०  चांगल्याची परतफेड वाइटाने करणं बरोबर आहे का? त्यांनी माझा जीव घ्यायला खड्डा खोदलाय.+ त्यांच्यावरचा तुझा राग शांत व्हावा,म्हणून त्यांच्याविषयी चांगलं बोलायला मी कसं तुझ्यासमोर उभं राहिलो ते आठव. २१  त्यांच्या मुलांना दुष्काळाच्या हवाली कर,आणि त्यांना तलवारीला बळी पडू दे.+ त्यांच्या बायका विधवा होऊ दे आणि त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर होऊ दे.+ त्यांची माणसं जीवघेण्या रोगाने मरू दे,आणि त्यांचे तरुण युद्धात तलवारीने ठार होऊ दे.+ २२  तू जेव्हा अचानक त्यांच्याविरुद्ध लुटारूंच्या टोळ्या आणशील,तेव्हा त्यांच्या घरांतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू येऊ दे. कारण मला पकडण्यासाठी त्यांनी खड्डा खोदला आहे,आणि मला अडकवण्यासाठी त्यांनी जाळं टाकलं आहे.+ २३  पण हे यहोवा! मला मारण्यासाठी त्यांनी केलेले कट तुला चांगले माहीत आहेत.+ त्यांच्या अपराधांची क्षमा करू नकोस,आणि तुझ्यासमोरून त्यांचे पाप पुसून टाकू नकोस. तू त्यांच्यावर क्रोधित होऊन त्यांना शिक्षा करशील,+तेव्हा त्यांना तुझ्यासमोर अडखळून पडू दे.+

तळटीपा

किंवा “न बांधलेल्या रस्त्याने.”
किंवा “नियम.”