यिर्मया २:१-३७

  • इस्राएली लोक यहोवाला सोडून इतर दैवतांच्या नादी लागतात (१-३७)

    • इस्राएल परक्या द्राक्षवेलीसारखी (२१)

    • तिचा झगा रक्‍ताने डागाळलेला (३४)

 यहोवाकडून मला संदेश मिळाला; तो मला म्हणाला: २  “जा आणि यरुशलेमला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “तू तरुण असताना माझ्यावर किती प्रेम* करायचीस ते मला चांगलं आठवतंय.+ तुझं माझ्याशी लग्न ठरलं, तेव्हा तुझं माझ्यावर किती प्रेम होतं!+ ओसाड रानातून, ज्या जमिनीत कधी बी पेरलं गेलं नाही, अशा रानातून तू माझ्या मागे-मागे कशी यायचीस,हे सगळं मला चांगलं आठवतं.+  ३  यहोवासाठी इस्राएल पवित्र होता;+ त्याच्यासाठी तो कापणीच्या पहिल्या पिकासारखा होता.”’ ‘जो कोणी त्याचं वाईट करायचा तो दोषी ठरायचा,आणि त्याच्यावर संकट यायचं,’ असं यहोवा म्हणतो.”+  ४  हे याकोबच्या घराण्या, ऐक! इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका.  ५  यहोवा असं म्हणतो: “तुमच्या वाडवडिलांना माझ्यात असा काय दोष दिसला,+ की ते इतके भरकटले आणि माझ्यापासून दूर गेले? आणि कवडीमोल मूर्तींच्या मागे जाऊन+ स्वतःही कवडीमोल झाले?+  ६  त्यांनी असं विचारलं नाही, की ‘आम्हाला इजिप्त* देशातून बाहेर आणणारा यहोवा कुठे आहे?+ ज्याने आम्हाला मार्ग दाखवत ओसाड रानातून,वाळवंटांच्या+ आणि खाचखळग्यांच्या प्रदेशातून,रुक्ष+ आणि दाट अंधाराच्या प्रदेशातून,जिथून कोणीही ये-जा करत नाही,आणि जिथे कोणीही राहत नाही,अशा प्रदेशातून नेलं, तो कुठे आहे?’  ७  मी तुम्हाला फळबागांच्या प्रदेशात आणलं,म्हणजे तुम्हाला तिथला उपज आणि चांगल्या गोष्टी खायला मिळतील.+ पण तुम्ही येऊन माझा देश भ्रष्ट केला;माझा वारशाचा प्रदेश तुम्ही किळसवाणा केला.+  ८  याजकांनीही असं विचारलं नाही, की ‘यहोवा कुठे आहे?’+ नियमशास्त्र शिकवण्याची जबाबदारी असलेल्यांनीही मला ओळखलं नाही,मेंढपाळांनी माझ्याविरुद्ध बंड केलं,+संदेष्ट्यांनी बआलच्या नावाने भविष्यवाण्या केल्या,+आणि ते अशा दैवतांच्या नादी लागले ज्यांच्यापासून काहीच फायदा नाही.  ९  ‘म्हणून मी तुमच्यावर आणखी दोष लावीन,+आणि तुमच्या मुलांच्या मुलांवरही दोष लावीन,’ असं यहोवा म्हणतो. १०  ‘कित्तीमच्या+ समुद्री-प्रदेशांकडे* जा आणि पाहा. केदारमध्ये+ माणसं पाठवा आणि कसून चौकशी करा;आणि असलं काही कधी घडलंय का ते पाहा. ११  कोणत्याही राष्ट्राने आपले देव खरे नसतानाही ते कधी बदलले का? पण, माझ्या लोकांनी मात्र कवडीमोल देवांसोबत माझ्या वैभवाची अदलाबदल केली.+ १२  हे आकाशा! जे काही घडलं ते पाहून तू चकित हो;भितीने थरथर काप,’ असं यहोवा म्हणतो. १३  ‘कारण माझ्या लोकांनी दोन वाईट गोष्टी केल्या आहेत: त्यांनी मला, जिवंत पाण्याच्या झऱ्‍याला, सोडून दिलंय,+आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके, गळके हौद स्वतःसाठी खणले आहेत.’ १४  ‘इस्राएल हा काय एखाद्या घराण्यात जन्माला आलेला दास किंवा गुलाम आहे का? मग त्याला लुटारूंच्या हाती का देण्यात आलं? १५  तरुण सिंह त्याच्यावर गर्जना करतात,+त्यांनी त्याच्यावर आपला आवाज चढवलाय. त्यांनी त्याच्या देशाची अशी अवस्था केली आहे, की ती पाहणाऱ्‍यांना दहशत बसते. त्याच्या शहरांना आग लावण्यात आली आहे, आणि एकही माणूस तिथे राहत नाही. १६  नोफ*+ आणि तहपन्हेस+ इथले लोक तुझ्या डोक्यावरचे केस खाऊन तुला टकलं करतात. १७  तुझा देव यहोवा तुला मार्ग दाखवत होता,तेव्हा तू त्याला सोडून दिलंस.+ असं करून तू स्वतःवरच हे संकट ओढवून घेतलं नाहीस का? १८  आता तुला इजिप्तला जाऊन शीहोरचं* पाणी का प्यायचंय?+ तुला अश्‍शूरला जाऊन फरात नदीचं पाणी का प्यायचंय?+ १९  तुझ्या दुष्टपणातूनच तू धडा शिकायला हवास,आणि तुझ्या अविश्‍वासूपणानेच तुझं ताडन करायला हवं. तुझा देव यहोवा याला सोडून देणं हे किती वाईट आहे,आणि त्याचे परिणाम किती भयानक आहेत हे तू समजून घे.+ तुला माझी जरासुद्धा भीती वाटली नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो. २०  ‘फार पूर्वीच मी तुझं जोखड* मोडून टाकलं,+आणि तुझ्या बेड्या तोडून टाकल्या. पण तू म्हणालीस: “मला नाही करायची तुझी सेवा.” तू प्रत्येक उंच टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली+ पसरायचीस आणि वेश्‍येची कामं करायचीस.+ २१  मी जेव्हा तुला जमिनीत लावलं, तेव्हा तू उत्तम बियांपासून उगवलेली उत्कृष्ट लाल द्राक्षवेल होतीस.+ मग आता तू माझ्यासमोर एका परक्या द्राक्षवेलीच्या सडलेल्या फांद्यांसारखी कशी बनलीस?’+ २२  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, की ‘तू स्वतःला कितीही साबण लावलास आणि सोड्याने स्वतःला कितीही धुतलंस,तरी तुझ्या दोषाचा डाग माझ्यासमोर तसाच राहील.’+ २३  तू कोणत्या तोंडाने असं म्हणतेस, की ‘मी स्वतःला अशुद्ध केलं नाही,आणि मी बआलांच्या नादी लागले नाही’? खोऱ्‍यात* तू काय-काय केलंस ते जरा बघ. तू कोण-कोणती कामं केलीस त्यांचा जरा विचार कर. तू इकडून तिकडे सैरावैरा धावणाऱ्‍या एका चपळ, तरुण उंटिणीसारखी आहेस. २४  तू अशा एका रानगाढवीसारखी आहेस, जिला ओसाड रानात राहायची सवय आहे. ती उत्तेजित झाली की वारा हुंगते. तिची लैंगिक इच्छा तीव्र होते तेव्हा तिला कोण रोखू शकतं? तिला शोधणाऱ्‍या नरांना जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत,कारण तिच्या ऋतूत ती त्यांना सहज सापडते. २५  तुझे पाय झिजू देऊ नकोस,आणि तुझा घसा कोरडा पडू देऊ नकोस. पण तू म्हणालीस, ‘नाही, आता हे शक्य नाही.+ मी परक्यांच्या* प्रेमात पडले आहे,+आणि मी त्यांच्याच मागे जाईन.’+ २६  चोरी पकडली गेल्यावर चोराला जसं लज्जित केलं जातं,तसं इस्राएलच्या घराण्याला लज्जित करण्यात आलंय. त्यांना, त्यांच्या राजांना आणि अधिकाऱ्‍यांना;त्यांच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना लज्जित करण्यात आलंय.+ २७  ते झाडाला म्हणतात, ‘तू माझा बाप आहेस,’+ आणि दगडाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’ पण माझ्याकडे ते पाठ फिरवतात; ते माझ्याकडे पाहत नाहीत.+ त्यांच्यावर संकट येईल तेव्हा मात्र ते म्हणतील,‘आम्हाला येऊन वाचव!’+ २८  तू स्वतःसाठी बनवलेले देव आता कुठे गेले?+ त्यांना जर शक्य असेल, तर तुझ्या संकटाच्या काळात त्यांनी येऊन तुला वाचवावं,कारण हे यहूदा, तुझ्या देवांची संख्या तुझ्या शहरांइतकीच भरमसाठ झाली आहे.+ २९  यहोवा म्हणतो: ‘तुम्ही सतत माझ्याशी वाद का घालता? तुम्ही सगळ्यांनी माझ्याविरुद्ध बंड का केलंय?’+ ३०  मी तुमच्या मुलांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.+ त्यांनी माझी शिस्त स्वीकारली नाही;+चवताळलेल्या सिंहासारखं तुम्ही स्वतःच तुमच्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकलं.+ ३१  या पिढीच्या लोकांनो, यहोवाच्या वचनाकडे लक्ष द्या. मी इस्राएलसाठी ओसाड रानासारखा,किंवा भयंकर काळोखासारखा झालोय का? या लोकांनी, माझ्या स्वतःच्या लोकांनी असं का म्हटलं, की ‘आम्हाला पाहिजे तिथे आम्ही जाऊ;आम्ही पुन्हा कधी तुझ्याकडे येणार नाही’?+ ३२  कुमारी कधी आपले दागिने विसरू शकते का? नवरी कधी आपला पट्टा* घालायला विसरू शकते का? पण माझे स्वतःचे लोक मात्र कितीतरी दिवसांपासून मला विसरून गेले आहेत.+ ३३  हे स्त्री, तू किती चलाखीने पुरुषांना आपल्या प्रेमात अडकवतेस! दुष्टपणे कसं वागायचं हे तू चांगलं शिकून घेतलं आहेस.+ ३४  तुझ्या अंगातला झगासुद्धा गरीब आणि निरपराध लोकांच्या रक्‍ताने डागाळलेला आहे,+मी त्यांना तुझ्या घरात घुसून चोरी करताना पाहिलं नाही,तरीसुद्धा तुझ्या कपड्यांवर मला त्यांच्या रक्‍ताचे डाग दिसतात.+ ३५  असं असूनही तू म्हणतेस, की ‘मी निर्दोष आहे. आणि माझ्यावरचा त्याचा राग नक्कीच शांत झालाय.’ पण आता मी तुझ्यावर न्यायदंड बजावीन,कारण तू म्हणतेस, ‘मी कोणतंच पाप केलेलं नाही.’ ३६  तुझ्या या चंचल वृत्तीचं तुला काहीच कसं वाटत नाही? तू अश्‍शूरमुळे जशी लज्जित झालीस,+तशीच इजिप्तमुळेही लज्जित होशील.+ ३७  आणि तू आपल्या डोक्यावर हात ठेवून शरमेने निघून जाशील.+ कारण ज्यांच्यावर तू भरवसा ठेवला होतास, त्यांना यहोवाने नाकारलंय;त्यांच्यामुळे तू कधीच यशस्वी होणार नाहीस.”

तळटीपा

किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “मिसर.”
किंवा “द्वीपांकडे.”
किंवा “मेम्फिस.”
म्हणजे, नाईल नदीची एक शाखा.
किंवा “परक्या दैवतांच्या.”
किंवा “छातीला बांधले जाणारे पट्टे.”