यिर्मया २१:१-१४

  • यहोवा सिद्‌कीयाची विनंती अमान्य करतो (१-७)

  • लोकांना जीवन किंवा मरण निवडण्याची संधी (८-१४)

२१  यिर्मयाला यहोवाकडून एक संदेश मिळाला. त्याला हा संदेश तेव्हा मिळाला जेव्हा सिद्‌कीया+ राजाने मासेयाचा मुलगा सफन्या+ याजक आणि मल्कीयाचा मुलगा पशहूर+ यांना यिर्मयाकडे असं विचारायला पाठवलं होतं: २  “बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर* आमच्याशी युद्ध करायला आलाय.+ म्हणून कृपा करून आमच्यासाठी यहोवाकडे मार्गदर्शन माग. कदाचित यहोवा आमच्यासाठी काहीतरी महान कार्य करेल, आणि बाबेलचा राजा आमच्यापासून निघून जाईल.”+ ३  त्यावर यिर्मया त्यांना म्हणाला: “तुम्ही सिद्‌कीयाला जाऊन सांगा, ४  ‘इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो: “शहराच्या भिंतींबाहेर वेढा देणाऱ्‍या बाबेलच्या राजाशी आणि खास्दी लोकांशी लढण्यासाठी तुमच्या हातात जी शस्त्रं आहेत, ती मी तुमच्यावरच उलटवीन.+ आणि ती* शहराच्या मधोमध गोळा करीन. ५  मी स्वतः तुमच्याशी लढाई करीन.+ मी माझा शक्‍तिशाली हात तुमच्यावर उचलीन आणि रागाने, संतापाने आणि मोठ्या क्रोधाने तुमच्याशी लढीन.+ ६  मी या शहरातल्या सगळ्या माणसांना आणि प्राण्यांना मारून टाकीन. ते सगळे जीवघेण्या रोगांनी मरतील.”’+ ७  ‘यहोवा म्हणतो “त्यानंतर मी यहूदाचा राजा सिद्‌कीया याला, त्याच्या सेवकांना आणि शहरातले जे लोक रोगराईपासून, तलवारीपासून व दुष्काळापासून वाचतील त्या सगळ्यांना त्यांच्या शत्रूंच्या, त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांच्या आणि बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हवाली करीन.+ तो त्यांना तलवारीने मारून टाकेल. तो कोणाचीही गय करणार नाही, किंवा कोणालाही दयामाया दाखवणार नाही.”’+ ८  आणि या लोकांना तू असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “मी तुम्हाला जीवनाचा मार्ग किंवा मृत्यूचा मार्ग निवडायची संधी देतोय. ९  जे लोक या शहरात राहतील ते तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरतील. पण जो कोणी बाहेर पडेल आणि शहराला वेढा घातलेल्या खास्दी लोकांना शरण जाईल तो जिवंत राहील; तो आपला जीव वाचवेल.”’+ १०  ‘“कारण, मी या शहराचं भलं नाही, तर त्याचा नाश करायचा पक्का निश्‍चय केलाय,”+ असं यहोवा म्हणतो. “हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल,+ आणि तो ते जाळून टाकेल.”+ ११  हे यहूदाच्या राजाच्या घराण्या! यहोवाचा संदेश ऐक. १२  हे दावीदच्या घराण्यातल्या लोकांनो, यहोवा असं म्हणतो: “दररोज खरेपणाने न्याय करा,आणि जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा.+ नाहीतर, तुमच्या दुष्ट कामांमुळे+ माझा क्रोध आगीसारखा तुमच्यावर भडकेल,+आणि तो कोणीही शांत करू शकणार नाही.”’ १३  ‘हे खोऱ्‍यात राहणाऱ्‍या रहिवाशा! हे सपाट प्रदेशातल्या खडका! बघ, मी तुझ्या विरोधात येतोय.’ असं यहोवा म्हणतो. ‘आणि तुम्ही जे असं म्हणता: “कोण आमच्या विरोधात येण्याची हिंमत करेल? आणि कोण आमच्या वस्त्यांवर हल्ला करू शकेल?” १४  त्या तुमच्याकडून मी तुमच्या कामांनुसार हिशोब घेईन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुमच्या जंगलाला आग लावून टाकीन,आणि त्यात तुमच्या आजूबाजूचं सगळं काही भस्म होऊन जाईल.’”+

तळटीपा

शब्दशः “नबुखद्रेस्सर,” एक वेगळं शब्दलेखन.
किंवा कदाचित, “त्या लोकांना.”