यिर्मया २२:१-३०

  • दुष्ट राजांविरुद्ध न्यायाचा संदेश (१-३०)

२२  यहोवा असं म्हणतो: “यहूदाच्या राजाच्या महालात जा आणि हा संदेश सांग. २  तू असं म्हण, ‘दावीदच्या राजासनावर बसणाऱ्‍या यहूदाच्या राजा! तू, तुझे सेवक आणि या दरवाजांतून आत येणारे सगळे लोक, यहोवाचा संदेश काय आहे तो ऐका. ३  यहोवा असं म्हणतो: “न्यायाने आणि नीतीने वागा. जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा. तुमच्यात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना वाईट वागणूक देऊ नका. अनाथांचं* आणि विधवांचं नुकसान करू नका.+ आणि या ठिकाणी निर्दोष रक्‍त सांडू नका.+ ४  तुम्ही या गोष्टींचं काळजीपूर्वक पालन केलं, तर दावीदच्या राजासनावर+ बसणारे राजे रथांवर आणि घोड्यांवर बसून या महालाच्या दरवाजांतून आत येतील; त्यांच्यासोबत त्यांचे सेवक आणि सगळे लोकही येतील.”’+ ५  ‘पण जर तुम्ही या गोष्टींचं पालन केलं नाही, तर मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, की हा राजमहाल पूर्णपणे उद्ध्‌वस्त होऊन जाईल,’ असं यहोवा म्हणतो.+ ६  यहूदाच्या राजाच्या महालाविषयी यहोवा म्हणतो,‘तू माझ्यासाठी गिलादसारखा,लबानोनच्या शिखरासारखा आहेस. पण मी तुला ओसाड रान बनवून टाकीन;तुझ्या एकाही शहरात लोक राहणार नाहीत.+  ७  आणि मी नाश करणाऱ्‍यांना तुझा नाश करण्यासाठी नेमीन;ते सगळे शस्त्रं घेऊन येतील.+ ते तुझी देवदाराची चांगली-चांगली झाडं कापून आगीत टाकतील.+ ८  आणि या शहराजवळून येणारे-जाणारे इतर राष्ट्रांचे लोक एकमेकांना विचारतील: “यहोवाने या महान शहराची अशी अवस्था का केली?”+ ९  तेव्हा ते म्हणतील: “कारण त्यांनी त्यांचा देव यहोवा याचा करार मोडला, आणि इतर दैवतांच्या पाया पडून त्यांनी त्यांची उपासना केली.”’+ १०  जो मेलाय त्याच्यासाठी रडू नका,त्याच्यासाठी शोक करू नका. याउलट, जो बंदिवासात चाललाय त्याच्यासाठी ढसाढसा रडा. कारण तो आपली जन्मभूमी पाहायला परत कधीच येऊ शकणार नाही. ११  जो आपल्या वडिलांच्या जागी राजा बनला+ आणि आता बंदिवासात गेलाय, त्या योशीयाच्या मुलाबद्दल, म्हणजे यहूदाचा राजा शल्लूम*+ याच्याबद्दल यहोवा असं म्हणतो: ‘तो परत कधीच इथे येणार नाही. १२  कारण, ज्या ठिकाणी त्याला बंदी बनवून नेण्यात आलंय, त्याच ठिकाणी तो मरेल. तो हा देश पुन्हा कधीच पाहू शकणार नाही.’+ १३  जो नीतीने आपलं घरं बांधत नाही,आणि न्यायाने वरच्या खोल्या बांधत नाही, त्याचा धिक्कार असो! जो आपल्या सोबत्याकडून फुकट सेवा करून घेतो,जो त्याला त्याची मजुरी देत नाही;+त्याचा धिक्कार असो! १४  जो म्हणतो, ‘मी स्वतःसाठी एक आलिशान घर बांधीन,आणि वरती मोठमोठ्या खोल्या काढीन. मी त्या घराला खिडक्या बनवीन,देवदाराच्या लाकडांच्या चौकटी बसवीन,आणि त्याला लाल रंग देईन,त्याचा धिक्कार असो!’ १५  तुला काय वाटतं, तू इतरांपेक्षा जास्त देवदाराची लाकडं वापरून राजमहाल बांधलास म्हणून तुझं राज्य टिकून राहील? तुझ्या वडिलानेही खाणंपिणं केलं,पण त्याने खरेपणाने न्याय केला आणि तो नीतीने वागला,+ म्हणून त्याचं भलं झालं. १६  त्याच्याकडे आलेल्या दीनदुबळ्यांना आणि गरिबांना त्याने न्याय दिला, म्हणून त्याचं चांगलं झालं. ‘मला ओळखण्याचा हाच अर्थ होत नाही का?’ असं यहोवा म्हणतो. १७  ‘पण तुझे डोळे आणि तुझं मन हे फक्‍त बेइमानीच्या कमाईकडे, निर्दोष रक्‍त सांडण्याकडे,आणि फसवणूक व लुबाडणूक करण्याकडे लागलंय.’ १८  म्हणून यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्याविषयी यहोवा म्हणतो,‘लोक सहसा शोक करताना म्हणतात: “अरेरे, माझ्या भावा! अरेरे, माझ्या बहिणी!” पण, त्याच्यासाठी कोणीही शोक करून असं म्हणणार नाही: “अरेरे! माझ्या मालकाचं वैभव कसं नाहीसं झालं!” १९  गाढवाच्या शवाचं जसं केलं जातं,तसंच त्याच्या बाबतीतही केलं जाईल;+त्याचं प्रेत यरुशलेमच्या दरवाजांबाहेर फरफटत नेऊन फेकून दिलं जाईल.’+ २०  वर लबानोनकडे जा आणि आक्रोश कर,बाशानमध्ये गळा काढून रड, आणि अबारीममधून मोठ्याने शोक कर.+ कारण तुझ्या सगळ्या प्रियकरांना चिरडून टाकण्यात आलंय.+ २१  तुझं सगळं काही सुरळीत चाललं होतं तेव्हा मी तुझ्याशी बोललो,पण तू म्हणालीस, ‘मी नाही ऐकणार.’+ तुझ्या तरुणपणापासून तू असंच वागत आलीस,तू कधीच माझं ऐकलं नाही.+ २२  वारा तुझ्या सगळ्या मेंढपाळांना उधळून लावेल,+आणि तुझे सगळे प्रियकर बंदिवासात जातील. तेव्हा तुझ्यावर आलेल्या सगळ्या संकटांमुळे तू लज्जित आणि अपमानित होशील. २३  हे लबानोनमध्ये राहणारी स्त्री,+देवदाराच्या झाडांमध्ये घरटं करून राहणारी स्त्री!+ बाळाला जन्म देणाऱ्‍या स्त्रीप्रमाणे जेव्हा तुला कळा येतील,तुला प्रसूतीच्या वेदना होतील, तेव्हा तू किती कण्हशील!”+ २४  “यहोवा म्हणतो, ‘हे यहोयाकीमच्या+ मुला, हे यहूदाच्या राजा कोन्या!*+ माझ्या जीवनाची शपथ, तू माझ्या उजव्या हातातली मुद्रेची अंगठी जरी असतास, तरी मी तुला काढून फेकून दिलं असतं! २५  मी तुला तुझ्या जिवावर टपलेल्यांच्या आणि ज्यांची तुला भीती वाटते त्यांच्या हाती देईन; मी तुला बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या आणि खास्दी लोकांच्या हाती देईन.+ २६  मी तुला आणि तुला जन्म देणाऱ्‍या तुझ्या आईला एका परक्या देशात फेकून देईन; जिथे तुझा जन्म झाला नाही अशा एका देशात मी तुम्हाला फेकून देईन. आणि तिथेच तुम्ही मराल. २७  तुला आपल्या देशात परत यायची आस लागेल, पण तू तिथे कधीच परत येणार नाहीस.+ २८  हा कोन्या तुच्छ आणि फुटक्या मडक्यासारखा आहे का? कोणालाही नको असलेल्या भांड्यासारखा तो आहे का? त्याला आणि त्याच्या वंशजांना खाली का फेकण्यात आलंय? त्यांना माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकण्यात आलंय?’+ २९  हे पृथ्वी!* हे पृथ्वी! हे पृथ्वी! यहोवाचा संदेश ऐक. ३०  यहोवा असं म्हणतो: ‘या माणसाविषयी असं लिही, की याला मुलबाळ नाही,त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याला यश मिळणार नाही. कारण त्याच्या वंशजांपैकी कोणीही,दावीदच्या राजासनावर बसणार नाही किंवा यहूदावर शासन करणार नाही.’”+

तळटीपा

किंवा “वडील नसलेल्या मुलांचं.”
याला यहोआहाज असंही म्हटलं आहे.
याला यहोयाखीन आणि यखन्या असंही म्हटलं आहे.
किंवा “देशा.”