यिर्मया २३:१-४०

  • चांगले आणि दुष्ट मेंढपाळ (१-४)

  • “नीतिमान अंकुर” याच्या राज्यात सुरक्षितता (५-८)

  • खोट्या संदेष्ट्यांना शिक्षा सुनावली जाते (९-३२)

  • “यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे” (३३-४०)

२३  यहोवा म्हणतो: “माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करणाऱ्‍या आणि त्यांची पांगापांग करणाऱ्‍या मेंढपाळांचा धिक्कार असो!”+ २  इस्राएलचा देव यहोवा आपल्या लोकांची राखण करणाऱ्‍या मेंढपाळांविषयी म्हणतो: “तुम्ही माझ्या मेंढरांना विखरून टाकलंत; तुम्ही त्यांची पांगापांग करत राहिलात आणि त्यांची काळजी घेतली नाही.”+ “म्हणून आता तुमच्या दुष्ट कामांमुळे मी तुमचा समाचार घेईन,” असं यहोवा म्हणतो. ३  “मग ज्या सगळ्या देशांमध्ये मी माझ्या मेंढरांची पांगापांग केली, तिथून मी माझ्या उरलेल्या मेंढरांना गोळा करीन+ आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन;+ ते फलदायी होतील व त्यांची संख्या वाढेल.+ ४  आणि त्यांच्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे मनापासून त्यांचा सांभाळ करतील.+ त्यानंतर माझी मेंढरं परत कधीच घाबरणार नाहीत, त्यांना कधीच भीती वाटणार नाही आणि त्यांच्यातलं एकही मेंढरू कधीच हरवणार नाही,” असं यहोवा म्हणतो. ५  “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी दावीदच्या वंशातून एक नीतिमान अंकुर उगवीन.*+ तो राजा म्हणून सुज्ञतेने, न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल,” असं यहोवा म्हणतो.+ ६  “त्याच्या शासनकाळात यहूदाचा बचाव होईल+ आणि इस्राएल सुरक्षित राहील.+ आणि त्याला, ‘यहोवा आमचं नीतिमत्त्व,’ या नावाने ओळखलं जाईल.”+ ७  यहोवा म्हणतो: “पण असे दिवस येत आहेत जेव्हा, ‘इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!’ असं ते म्हणणार नाहीत.+ ८  याउलट, ‘इस्राएलच्या घराण्यातल्या वंशजांची उत्तरेच्या आणि इतर सर्व देशांत पांगापांग करणाऱ्‍या आणि त्यांना तिथून बाहेर काढून परत आणणाऱ्‍या यहोवाच्या जीवनाची शपथ!’ असं ते म्हणतील. आणि ते आपल्या स्वतःच्या देशात राहतील.”+ ९  संदेष्ट्यांसाठी असलेला संदेश: माझं मन अतिशय दुःखी झालं आहे. माझी सगळी हाडं थरथर कापत आहेत. यहोवामुळे आणि त्याच्या पवित्र शब्दांमुळे,मी नशेत असलेल्या माणसासारखा झालो आहे,द्राक्षारस पिऊन झिंगलेल्या माणसासारखा मी झालो आहे. १०  कारण संपूर्ण देश व्यभिचारी लोकांनी भरून गेला आहे;+देश शापित झाल्यामुळे शोक करत आहे,+आणि रानातली कुरणं वाळून गेली आहेत.+ लोकांची वृत्ती वाईट झाली आहे आणि ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. ११  “संदेष्टे आणि याजक दोघंही भ्रष्ट* झाले आहेत.+ माझ्या मंदिरातसुद्धा मला त्यांचा दुष्टपणा पाहायला मिळालाय,” असं यहोवा म्हणतो.+ १२  “म्हणून त्यांचा मार्ग निसरडा आणि अंधकारमय होईल;+त्यांना ढकलून दिलं जाईल आणि ते पडतील. कारण, ज्या वर्षी मी त्यांच्याकडून हिशोब घेईन त्या वर्षी मी त्यांच्यावर संकट आणीन,” असं यहोवा म्हणतो. १३  “मी शोमरोनच्या+ संदेष्ट्यांमध्ये किळसवाण्या गोष्टी पाहिल्या आहेत. ते बआलच्या नावाने भविष्यवाण्या करतात,आणि माझ्या इस्राएली लोकांची दिशाभूल करतात. १४  मी यरुशलेमच्या संदेष्ट्यांमध्येही भयंकर गोष्टी पाहिल्या आहेत. ते व्यभिचार करतात+ आणि लबाडीने वागतात;+ते वाईट कामं करणाऱ्‍यांना उत्तेजन देतात,आणि आपल्या दुष्ट कामांपासून ते मागे वळत नाहीत. माझ्यासाठी ते सगळे सदोमसारखे झाले आहेत,+आणि या शहरात राहणारे सगळे लोक माझ्यासाठी गमोरासारखे झाले आहेत.”+ १५  म्हणून सैन्यांचा देव यहोवा या संदेष्ट्यांविषयी असं म्हणतो: “पाहा, मी त्यांना कडूदवणा* खायला लावीन,आणि त्यांना विषारी पाणी प्यायला देईन.+ कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळे देशातले सगळे लोक देवाला सोडून दूर गेले आहेत.”* १६  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तुम्हाला भविष्यवाणी सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांकडे लक्ष देऊ नका.+ ते तुम्हाला फसवत आहेत.* ते सांगत असलेले दृष्टान्त त्यांच्या स्वतःच्याच मनाचे आहेत;+ते यहोवाकडून नाहीत.+ १७  माझा अनादर करणाऱ्‍यांना ते वारंवार म्हणतात,‘यहोवाने म्हटलंय: “तुम्ही सुखात राहाल.”’+ तर स्वतःच्या हट्टी मनाप्रमाणे वागणाऱ्‍यांना ते म्हणतात,‘तुमच्यावर कुठलंही संकट येणार नाही.’+ १८  यहोवाच्या मित्रमंडळीत त्याचा संदेश ऐकायला आणि तो समजून घ्यायला कोण उभा आहे? कोणी त्याचा संदेश लक्ष देऊन ऐकलाय? १९  पाहा! यहोवाच्या क्रोधाचं भयानक वादळ सुटेल;चक्रीवादळासारखं ते गरगर फिरत दुष्ट लोकांच्या डोक्यावर येऊन आदळेल.+ २०  जोपर्यंत यहोवा आपल्या मनात ठरवलेल्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करत नाही,तोपर्यंत त्याचा क्रोध शांत होणार नाही. शेवटच्या काळात तुम्हाला या गोष्टी स्पष्टपणे कळतील. २१  मी संदेष्ट्यांना पाठवलं नाही, तरी ते धावत सुटले. मी त्यांच्याशी बोललो नाही, तरी त्यांनी भविष्यवाण्या सांगितल्या.+ २२  पण ते जर माझ्या मित्रमंडळीत असते,तर त्यांनी माझ्या लोकांना माझा संदेश सांगितला असता,आणि त्यांना आपल्या दुष्ट मार्गांपासून मागे फिरायला आणि आपली वाईट कामं सोडून द्यायला लावलं असतं.”+ २३  यहोवा म्हणतो: “मी फक्‍त जवळ असतानाच देव आहे का? दूर असतानाही मी देव नाही का?” २४  यहोवा म्हणतो: “जर कोणी गुप्त ठिकाणी लपून बसला, तर मी त्याला पाहू शकणार नाही का?”+ यहोवा म्हणतो: “स्वर्गात आणि पृथ्वीवर अशी एकतरी गोष्ट आहे का, जी माझ्या नजरेतून सुटू शकते?+ २५  माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी असं म्हणताना ऐकलं, ‘मी एक स्वप्न पाहिलंय! मी एक स्वप्न पाहिलंय!’+ २६  हे संदेष्टे आणखी किती दिवस खोट्या भविष्यवाण्या करत राहतील? ते आपल्याच मनाच्या गोष्टी सांगणारे फसवे संदेष्टे आहेत.+ २७  त्यांचे वाडवडील जसं बआल दैवतामुळे माझं नाव विसरून गेले,+ तसं माझ्या लोकांनीही माझं नाव विसरून जावं, म्हणून हे संदेष्टे एकमेकांना स्वप्नं सांगत आहेत. २८  एखाद्या संदेष्ट्याला जर स्वप्न पडलं, तर त्याला ते सांगू द्या; पण ज्याच्याकडे माझा संदेश आहे त्याने तो खरा-खरा सांगावा.” “धान्यापुढे गवताच्या काडीची काय किंमत?” असं यहोवा म्हणतो. २९  यहोवा म्हणतो, “माझा संदेश आगीसारखा+ आणि खडकांचा चुराडा करणाऱ्‍या हातोड्यासारखा नाही का?”+ ३०  यहोवा म्हणतो, “म्हणून पाहा! इतर संदेष्ट्यांकडून माझा संदेश चोरणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन.”+ ३१  यहोवा म्हणतो, “जे संदेष्टे म्हणतात, ‘देवाकडून असा संदेश आहे!’ त्यांना मी शिक्षा करीन.”+ ३२  यहोवा म्हणतो, “फुशारक्या मारून आणि खोटी स्वप्नं सांगून माझ्या लोकांची दिशाभूल करणाऱ्‍या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन.”+ “मी त्यांना पाठवलं नाही किंवा त्यांना आज्ञाही दिली नाही. म्हणून त्यांच्यापासून या लोकांना काहीच फायदा होणार नाही,”+ असं यहोवा म्हणतो. ३३  “जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा एखादा याजक तुला असं म्हणेल: ‘यहोवाचा संदेश ओझ्यासारखा आहे,’ तेव्हा तू त्यांना म्हण, ‘“तुम्ही स्वतःच एक ओझं आहात! आणि मी तुम्हाला टाकून देईन,”+ असं यहोवा म्हणतो.’ ३४  जे लोक किंवा जो संदेष्टा किंवा जो याजक असं म्हणतो, की ‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे,’ त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मी शिक्षा करीन. ३५  तुमच्यापैकी प्रत्येक जण आपल्या सोबत्याला आणि आपल्या भावाला असं विचारतो, ‘यहोवाने काय उत्तर दिलं? यहोवा आपल्याला काय म्हणाला?’ ३६  तेव्हा असं म्हणायचं बंद करा, की यहोवाचा संदेश एक ओझं आहे. तुम्ही आपल्या जिवंत देवाच्या संदेशाचा, सैन्यांचा देव यहोवा याच्या संदेशाचा स्वतःच्या मनाप्रमाणे अर्थ लावलाय आणि त्यात फेरबदल केलाय. आणि म्हणून तो तुमच्यासाठी ओझ्यासारखा झालाय. ३७  तू संदेष्ट्यांना असं म्हण, ‘यहोवाने काय उत्तर दिलं? यहोवा तुम्हाला काय म्हणाला? ३८  तुम्ही जर असं म्हणत राहिलात, की “यहोवाचा संदेश एक ओझं आहे!” तर यहोवा म्हणतो: “‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे’ असं म्हणू नका इतकं सांगूनही तुम्ही म्हणत राहता, ‘यहोवाचा संदेश एक ओझं आहे!’ ३९  म्हणून पाहा! मी तुम्हाला उचलून माझ्यासमोरून दूर फेकून देईन; जे शहर मी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिलं होतं, त्या शहरासकट मी तुम्हाला फेकून देईन. ४०  मी तुम्हाला कायमचं लज्जित करीन. आणि तुमचा असा अपमान करीन, की तो कधीही विसरला जाणार नाही.”’”+

तळटीपा

किंवा “वारस पुढे आणीन.”
किंवा “धर्मत्यागी.”
एक कडू वनस्पती.
किंवा “धर्मत्यागी बनले आहेत.”
किंवा “तुम्हाला खोट्या आशा दाखवत आहेत.”