यिर्मया २५:१-३८
२५ यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या चौथ्या वर्षी, यिर्मयाला यहूदाच्या सगळ्या लोकांविषयी देवाकडून संदेश मिळाला;+ ते वर्ष, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या शासनकाळाचं पहिलं वर्ष होतं.
२ यिर्मया संदेष्ट्याने यहूदाच्या सगळ्या लोकांबद्दल* आणि यरुशलेमच्या सगळ्या रहिवाशांबद्दल* असा संदेश दिला:
३ “यहूदाचा राजा, म्हणजे आमोनचा मुलगा योशीया याच्या शासनकाळाच्या १३ व्या वर्षापासून आजपर्यंत,+ गेली २३ वर्षं मला यहोवाकडून संदेश मिळत राहिला. आणि मी तो वारंवार तुम्हाला सांगत राहिलो. पण तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही.+
४ यहोवा आपल्या सेवकांना, म्हणजे आपल्या सगळ्या संदेष्ट्यांना वारंवार तुमच्याकडे पाठवत राहिला. पण तुम्ही त्यांचं ऐकलं नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.+
५ ते तुम्हाला सांगायचे, ‘कृपा करून, आपल्या वाईट मार्गांपासून मागे वळा आणि आपली वाईट कामं सोडून द्या.+ तुम्ही असं कराल, तर जो देश यहोवाने फार पूर्वी तुम्हाला आणि तुमच्या वाडवडिलांना दिला होता त्यात तुम्ही बराच काळ राहाल.
६ इतर देवांच्या नादी लागू नका, त्यांची सेवा करू नका किंवा त्यांच्या पाया पडू नका. आणि त्यांच्या मूर्ती बनवून माझा क्रोध भडकवू नका; नाहीतर मी तुमच्यावर संकट आणीन.’
७ ‘पण तुम्ही माझं ऐकलं नाही,’ असं यहोवा म्हणतो. ‘उलट, तुम्ही मूर्ती बनवून माझा क्रोध भडकवला आणि स्वतःवर संकट ओढवून घेतलं.’+
८ त्यामुळे सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘“तुम्ही माझं ऐकलं नाही,
९ म्हणून पाहा, मी उत्तरेकडच्या सगळ्या राष्ट्रांना बोलावून घेतोय,”+ असं यहोवा म्हणतो. “मी माझा सेवक, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याला बोलावून घेतोय.+ मी त्या सगळ्यांना या देशावर, इथल्या रहिवाशांवर आणि आसपासच्या या सर्व राष्ट्रांवर हल्ला करायला आणीन.+ ते येऊन त्यांचा नाश करतील. मी त्यांची अशी अवस्था करीन, की पाहणाऱ्यांना दहशत बसेल आणि लोक थट्टेने शिट्टी वाजवतील. मी त्यांना कायमचं उद्ध्वस्त करून टाकीन.
१० तिथे होणारा जल्लोषाचा व आनंदोत्सवाचा आवाज, वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज आणि जात्यावर धान्य दळण्याचा आवाज मी बंद करून टाकीन.+ तसंच, मी तिथल्या दिव्यांचा प्रकाशही विझवून टाकीन.
११ आणि हा संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊन जाईल. पाहणाऱ्यांना दहशत बसेल अशी याची अवस्था होईल. आणि या सर्व राष्ट्रांना ७० वर्षं बाबेलच्या राजाची गुलामी करावी लागेल.”’+
१२ ‘पण ७० वर्षं पूर्ण झाल्यावर+ मी बाबेलच्या राजाकडून आणि त्या राष्ट्राकडून त्यांच्या अपराधाचा हिशोब घेईन,’*+ असं यहोवा म्हणतो. ‘आणि मी खास्दी लोकांच्या देशाला कायमचं उद्ध्वस्त आणि ओसाड करून टाकीन.+
१३ त्या देशाच्या नाशाविषयी मी जे काही बोललो त्यातला एकूण एक शब्द मी पूर्ण करीन; यिर्मयाने सर्व राष्ट्रांविषयी केलेल्या ज्या भविष्यवाण्या या पुस्तकात लिहिल्या आहेत, त्या सगळ्या मी पूर्ण करीन.
१४ कारण अनेक राष्ट्रं आणि मोठमोठे राजे+ त्यांना आपले गुलाम बनवतील.+ आणि मी त्यांच्या कृत्यांप्रमाणे व त्यांच्या हातच्या कामांप्रमाणे त्यांची परतफेड करीन.’”+
१५ इस्राएलचा देव यहोवा मला म्हणाला: “माझ्या हातातला हा द्राक्षारसाचा प्याला, हा क्रोधाचा प्याला घे. आणि ज्या राष्ट्रांकडे मी तुला पाठवीन, त्या सर्वांना तो प्यायला लाव.
१६ तो प्याला पिऊन ते झोकांड्या खातील आणि वेड्यांसारखं वागतील; कारण मी त्यांच्यामध्ये तलवार पाठवतोय.”+
१७ तेव्हा मी यहोवाच्या हातातला तो प्याला घेतला आणि ज्या राष्ट्रांकडे यहोवाने मला पाठवलं त्या सगळ्यांना मी तो प्यायला लावला.+
१८ मी यरुशलेम आणि यहूदाच्या शहरांपासून सुरुवात केली.+ तिच्या राजांचा आणि अधिकाऱ्यांचा नाश व्हावा, त्यांची अवस्था पाहून लोकांना दहशत बसावी, त्यांनी थट्टेने शिट्टी वाजवावी आणि त्यांना शाप द्यावेत, म्हणून मी त्यांना तो प्याला प्यायला लावला.+ आणि आज तसंच घडतय.
१९ मग मी तो प्याला फारोला, म्हणजे इजिप्तच्या राजाला, त्याच्या सेवकांना, अधिकाऱ्यांना, त्याच्या सगळ्या लोकांना,+
२० आणि त्यांच्यामध्ये राहणाऱ्या विदेश्यांना प्यायला लावला. याशिवाय, मी ऊस देशातल्या सगळ्या राजांना, पलिष्ट्यांच्या राजांना,+ अष्कलोन,+ गाझा व एक्रोनच्या राजांना, तसंच अश्दोदच्या उरलेल्यांना तो प्याला प्यायला लावला.
२१ मी अदोम,+ मवाब+ आणि अम्मोनी लोकांना;+
२२ सोर आणि सीदोनच्या सगळ्या राजांना,+ समुद्रातल्या बेटावरच्या राजांना;
२३ ददान,+ तेमा, बूज आणि जे आपल्या डोक्याच्या बाजूचे केस* कापतात त्या सगळ्यांना;+
२४ अरबी लोकांच्या+ आणि ओसाड रानात राहणाऱ्या विदेश्यांच्या सगळ्या राजांना;
२५ जिम्री, एलाम+ आणि मेदच्या सगळ्या राजांना+ मी तो प्याला प्यायला लावला;
२६ याशिवाय, मी उत्तरेकडे असलेल्या जवळच्या आणि दूरच्या सगळ्या राजांना एकापाठोपाठ एक तो प्याला प्यायला लावला. तसंच, मी पृथ्वीवरच्या इतर सर्व राज्यांनाही तो प्यायला लावला. आणि शेवटी, शेशेखचा*+ राजाही तो प्याला पिईल.
२७ तू त्यांना असं सांग, ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “पीत राहा, नशा येईपर्यंत पीत राहा. उलट्या करा, खाली पडा आणि पुन्हा उठू नका.+ कारण, तुम्हाला ठार मारायला मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतोय.”’
२८ पण जर त्यांनी तो प्याला तुझ्या हातून घेतला नाही, तर त्यांना असं सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तुम्हाला हा प्याला प्यावाच लागेल!
२९ कारण पाहा! मी जर माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहरावर संकट आणायला सुरुवात केली आहे,+ तर मी तुम्हालाही शिक्षा करणार नाही का?”’+
‘तुम्हाला शिक्षा होईलच. कारण मी पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांविरुद्ध तलवार आणतोय,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.
३० तू त्यांना भविष्यवाणीतल्या या सगळ्या गोष्टी सांग. त्यांना असं म्हण:
‘यहोवा उंच ठिकाणावरून गर्जना करेल,तो आपल्या पवित्र निवासस्थानातून मोठ्या आवाजात बोलेल.
पृथ्वीवर असलेल्या आपल्या राहण्याच्या ठिकाणाविरुद्ध तो मोठ्याने गर्जना करेल.
द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवणारे जसं आनंदाने ओरडतात,तसं तो पृथ्वीवरच्या लोकांवर मिळवलेल्या विजयामुळे आनंदाने गीत गाईल.’
३१ यहोवा म्हणतो, ‘पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत एक मोठा आवाज घुमत राहील.
कारण यहोवाचा सगळ्या राष्ट्रांशी वाद आहे.
तो स्वतः सगळ्या लोकांचा न्याय करेल,+आणि दुष्टांना तलवारीच्या हवाली करेल.’
३२ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो:
‘पाहा! राष्ट्रा-राष्ट्रावर एक संकट कोसळतंय.+
आणि पृथ्वीच्या दुर्गम भागांतून एक मोठं वादळ सुटेल.+
३३ त्या दिवशी, यहोवाच्या हातून मेलेले लोक पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पडून राहतील. कोणीही त्यांच्यासाठी शोक करणार नाही. किंवा त्यांना गोळा करून पुरणार नाहीत. ते जमिनीसाठी खत म्हणून तसेच पडून राहतील.’
३४ मेंढपाळांनो! शोक करा, मोठ्याने रडा!
कळपातल्या प्रमुखांनो, धुळीत लोळा.
कारण तुमची कत्तल करायची आणि पांगापांग करायची वेळ जवळ आली आहे.
एखाद्या मौल्यवान मातीच्या भांड्यासारखा तुमचा खाली पडून चुराडा होईल!
३५ मेंढपाळांना पळून जायला कुठेही जागा उरली नाही,आणि कळपातल्या प्रमुखांना निसटून जाणं शक्य नाही.
३६ मेंढपाळांचा आक्रोश ऐका!
कळपातल्या प्रमुखांच्या रडण्याचा आवाज ऐका!
कारण यहोवा त्यांची कुरणं उद्ध्वस्त करतोय.
३७ ज्या ठिकाणी सुखशांती असायची,ती ठिकाणं यहोवाच्या जळजळीत क्रोधामुळे सामसूम झाली आहेत.
३८ गुहेतून बाहेर पडणाऱ्या तरुण सिंहाप्रमाणे तो बाहेर पडलाय.+
त्याच्या जळजळीत क्रोधामुळे आणि निर्दयी तलवारीमुळे,या देशाची अशी अवस्था झाली आहे, की पाहणाऱ्यांना दहशत बसेल.”
तळटीपा
^ किंवा “रहिवाशांना.”
^ किंवा “लोकांना.”
^ किंवा “अपराधाबद्दल शिक्षा करीन.”
^ किंवा “कल्ले.”
^ हे बाबेलचं दुसरं नाव असावं.