यिर्मया २६:१-२४

  • यिर्मयाला मारून टाकायची धमकी (१-१५)

  • यिर्मयाला वाचवलं जातं (१६-१९)

    • मीखाच्या भविष्यवाणीचा उल्लेख (१८)

  • उरीया संदेष्टा (२०-२४)

२६  यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला,+ यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “यहोवा म्हणतो, ‘यहोवाच्या मंदिराच्या अंगणात उभा राहा, आणि यहोवाच्या मंदिरात उपासना करायला येणाऱ्‍या यहूदाच्या शहरांतल्या सगळ्या लोकांना* संदेश दे. मी तुला सांगीन त्या सगळ्या गोष्टी तू त्यांना सांग; त्यातला एकही शब्द गाळू नकोस. ३  कदाचित ते लक्ष देतील आणि त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या दुष्ट मार्गापासून मागे वळेल. मग मीसुद्धा त्यांच्या दुष्ट कामांमुळे त्यांच्यावर संकट आणायचा जो विचार केलाय तो बदलेन.+ ४  त्यांना सांग: “यहोवा असं म्हणतो, ‘मी तुम्हाला दिलेले नियम* जर तुम्ही पाळले नाहीत, ५  आणि माझ्या सेवकांचं, म्हणजे मी वारंवार तुमच्याकडे पाठवत असलेल्या संदेष्ट्यांचं जर तुम्ही ऐकलं नाहीत,+ ६  तर मी या मंदिराची दशा शिलोसारखीच करीन.+ आणि या शहराची अशी अवस्था करीन, की पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं शाप देताना या शहराचं नाव वापरतील.’”’”+ ७  मग याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी यिर्मयाला यहोवाच्या मंदिरात या गोष्टी बोलताना ऐकलं.+ ८  यहोवाने यिर्मयाला आज्ञा केलेल्या सगळ्या गोष्टी त्याने सर्व लोकांना सांगितल्या, तेव्हा याजकांनी व संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी त्याला धरलं. ते त्याला म्हणाले: “तू आता नक्कीच मरशील! ९  तू यहोवाच्या नावाने अशी भविष्यवाणी का केलीस, की ‘या मंदिराची दशा शिलोसारखीच होईल आणि हे शहर उद्ध्‌वस्त होऊन त्यात कोणीही राहणार नाही’?” मग, सगळे लोक यहोवाच्या मंदिरात यिर्मयाभोवती जमा झाले. १०  यहूदाच्या अधिकाऱ्‍यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते राजमहालातून यहोवाच्या मंदिरात आले आणि यहोवाच्या मंदिराच्या नवीन दरवाजाजवळ जाऊन बसले.+ ११  मग याजक आणि संदेष्टे, अधिकाऱ्‍यांना आणि सगळ्या लोकांना म्हणाले: “या माणसाला मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे!+ कारण याने या शहराविरुद्ध भविष्यवाणी केली आहे आणि तुम्ही स्वतः ती ऐकली आहे.”+ १२  तेव्हा यिर्मया सगळ्या अधिकाऱ्‍यांना आणि सगळ्या लोकांना म्हणाला: “यहोवानेच मला या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध भविष्यवाणी करायला पाठवलंय. तुम्ही जे काही ऐकलं ते सगळं त्यानेच मला सांगायला लावलंय.+ १३  म्हणून आता तुमचे मार्ग बदला आणि तुमची वागणूक सुधारा. तुमचा देव यहोवा याचं ऐका. म्हणजे तुमच्यावर संकट आणण्याविषयी यहोवा जे बोललाय, त्याबद्दल तो आपलं मन बदलेल.+ १४  पण माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. माझ्या बाबतीत तुम्हाला जे योग्य वाटतं, जे बरोबर वाटतं ते करा. १५  पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मला मारून टाकलंत तर तुम्ही स्वतःवर, या शहरावर आणि इथल्या लोकांवर निर्दोष माणसाचा खून केल्याचा दोष ओढवून घ्याल. कारण खरंतर यहोवानेच मला या सगळ्या गोष्टी सांगायला तुमच्याकडे पाठवलंय.” १६  तेव्हा अधिकारी आणि सगळे लोक याजकांना आणि संदेष्ट्यांना म्हणाले: “या माणसाला मृत्युदंड मिळावा असं काहीच याने केलं नाही. कारण तो आपला देव यहोवा याच्या नावाने आपल्याशी बोललाय.” १७  त्यानंतर, देशातले काही वडीलजन उठले आणि लोकांच्या संपूर्ण मंडळीला असं म्हणू लागले: १८  “यहूदाचा राजा हिज्कीया+ याच्या शासनकाळात, मोरेशेथ इथला मीखा+ भविष्यवाणी करायचा. तो यहूदाच्या सगळ्या लोकांना म्हणाला, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “सीयोनला एखाद्या शेतासारखं नांगरलं जाईल,यरुशलेम दगडमातीचा ढिगारा होईल,+आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या उच्च स्थानांसारखा होईल.”’+ १९  तेव्हा काय यहूदाच्या हिज्कीया राजाने आणि यहूदाच्या सगळ्या लोकांनी त्याला मारून टाकलं? राजाने यहोवाचं भय बाळगलं नाही का, आणि यहोवाकडे दयेची भीक मागितली नाही का? आणि त्यामुळे यहोवानेसुद्धा त्यांच्यावर संकट आणण्याचा आपला विचार बदलला नाही का?+ आता आपणही स्वतःवर मोठं संकट ओढवून घेत आहोत. २०  या शहराविरुद्ध आणि या देशाविरुद्ध यहोवाच्या नावाने यिर्मयासारखीच भविष्यवाणी करणारा आणखी एक जण होता; तो म्हणजे किर्याथ-यारीम+ इथल्या शमायाचा मुलगा उरीया. २१  जेव्हा यहोयाकीम राजा,+ त्याचे सगळे शूर योद्धे आणि त्याचे सगळे अधिकारी यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा राजाने त्याला मारून टाकायचं ठरवलं.+ पण उरीयाला हे कळलं, तेव्हा तो खूप घाबरला आणि इजिप्तला पळून गेला. २२  मग यहोयाकीम राजाने अखबोरचा मुलगा एलनाथान+ याला आणि त्याच्यासोबत काही माणसांना इजिप्तला पाठवलं. २३  त्यांनी उरीयाला इजिप्तहून धरून आणलं आणि यहोयाकीम राजाकडे नेलं. तेव्हा राजाने त्याला तलवारीने मारून टाकलं+ आणि त्याचा मृतदेह सामान्य लोकांच्या कबरस्तानात फेकून दिला.” २४  पण शाफानचा+ मुलगा अहीकाम+ याचा यिर्मयाला पाठिंबा होता. म्हणून त्याने यिर्मयाला मरण्यासाठी लोकांच्या हाती पडू दिलं नाही.+

तळटीपा

किंवा “लोकांबद्दल.”
किंवा “शिक्षण.”