यिर्मया २८:१-१७

  • यिर्मया आणि खोटा संदेष्टा हनन्या (१-१७)

२८  त्याच वर्षी, म्हणजे सिद्‌कीया+ राजाच्या शासनकाळाच्या सुरुवातीला, चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोन+ इथल्या अज्जूरचा मुलगा, म्हणजे हनन्या संदेष्टा हा यहोवाच्या मंदिरात याजकांसमोर आणि सगळ्या लोकांसमोर मला असं म्हणाला: २  “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘मी बाबेलच्या राजाचं जू* मोडून टाकीन.+ ३  बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने यहोवाच्या मंदिरातली जी भांडी इथून बाबेलला नेली, ती सगळी मी दोन वर्षांच्या आत या ठिकाणी परत आणीन.’”+ ४  “यहोवा म्हणतो, ‘मी यहूदाच्या राजाला, म्हणजे यहोयाकीमचा+ मुलगा यखन्या+ याला आणि त्याच्यासोबत बाबेलच्या बंदिवासात गेलेल्या यहूदाच्या सगळ्या लोकांना+ या ठिकाणी परत आणीन. कारण मी बाबेलच्या राजाचं जू मोडून टाकीन.’” ५  मग, यहोवाच्या मंदिरात उभे असलेले याजक आणि सगळे लोक यांच्यासमोर यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याशी बोलला. ६  यिर्मया संदेष्टा त्याला म्हणाला: “आमेन!* यहोवा असंच करो! यहोवाच्या मंदिरातली भांडी आणि बंदिवासात गेलेल्या सगळ्या लोकांना यहोवा बाबेलमधून परत या ठिकाणी आणून तुझी भविष्यवाणी पूर्ण करो! ७  पण आता, मी तुला आणि या सगळ्या लोकांना जो संदेश सांगतोय तो कृपा करून ऐक. ८  फार पूर्वी, म्हणजे माझ्या आणि तुझ्या आधी जे संदेष्टे होते, ते अनेक देशांविषयी आणि मोठमोठ्या राज्यांविषयी सहसा अशी भविष्यवाणी करायचे, की त्यांच्यावर युद्धं, संकटं आणि पीडा* येतील. ९  म्हणून जर एखाद्या संदेष्ट्याने त्यांच्यापेक्षा वेगळी अशी शांतीची भविष्यवाणी केली, तर ती खरी ठरल्यावरच दिसून येईल, की त्याला खरोखर यहोवाने पाठवलंय.” १०  तेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरचं जू काढून ते मोडून टाकलं.+ ११  मग, सगळ्या लोकांसमोर हनन्या असं म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘अगदी असंच, मी सगळ्या राष्ट्रांवर असलेलं बाबेलच्या राजाचं, नबुखद्‌नेस्सरचं जू दोन वर्षांच्या आत मोडून टाकीन.’”+ त्यानंतर यिर्मया संदेष्टा तिथून निघून गेला. १२  हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरचं जू मोडून टाकल्यावर, यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १३  “जा, आणि हनन्याला असं सांग, ‘यहोवा म्हणतो: “तू लाकडी जू मोडून टाकलंस.+ पण त्याऐवजी आता लोखंडी जू बनवलं जाईल.” १४  कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “या सगळ्या राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याची सेवा करावी, म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवीन. त्या सगळ्यांना त्याची सेवा करावी लागेल.+ जंगलातल्या प्राण्यांनासुद्धा मी त्याच्या अधिकाराखाली करीन.”’”+ १५  मग यिर्मया संदेष्टा हनन्या+ संदेष्ट्याला म्हणाला: “हे हनन्या, ऐक! यहोवाने तुला पाठवलेलं नाही. तू या लोकांना खोट्या गोष्टीवर विश्‍वास ठेवायला लावलंस.+ १६  म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘बघ! मी पृथ्वीवरून तुझं नामोनिशाण मिटवून टाकीन. तू याच वर्षी मरशील. कारण तू लोकांना यहोवाविरुद्ध बंड करायला लावलंस.’”+ १७  मग त्याच वर्षी, सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.

तळटीपा

किंवा “असंच होवो.”
किंवा “रोगराई.”