यिर्मया ३:१-२५

  • इस्राएल मोठ्या प्रमाणात भ्रष्ट (१-५)

  • इस्राएल आणि यहूदा व्यभिचारासाठी दोषी (६-११)

  • पापी मार्गापासून मागे वळण्यासाठी केलेला आर्जव (१२-२५)

 लोक म्हणतात: “एखाद्या माणसाने आपल्या बायकोला सोडून दिलं आणि तिने जाऊन दुसऱ्‍या माणसाशी लग्न केलं, तर तिच्या पहिल्या नवऱ्‍याने परत तिच्याकडे जावं का?” हा देश खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट झाला आहे.+ यहोवा म्हणतो, “तू तुझ्या अनेक प्रियकरांसोबत व्यभिचार केलाय,+आणि आता तू परत माझ्याकडे यावं का?  २  आपली नजर वर कर आणि उजाड टेकड्यांकडे बघ! अशी एकतरी जागा उरली आहे का, जिथे तुझी अब्रू लुटली गेली नाही? तू रस्त्याच्या कडेला आपल्या प्रियकरांची अशी वाट पाहत बसतेस,जसं ओसाड रानात अरबी माणूस बसतो. तू व्यभिचाराने आणि दुष्ट कामाने,संपूर्ण देश भ्रष्ट करून टाकतेस.+  ३  म्हणून पावसाच्या सरी रोखून ठेवण्यात आल्या आहेत,+आणि वसंत ऋतूत पाऊस पडलेला नाही. व्यभिचार करूनसुद्धा तोंडावर शरमेचे कसलेच भाव नसलेल्या बायकोसारखी तू आहेस;तुला अजिबात लाज वाटत नाही.+  ४  आणि आता तू मला हाक मारून म्हणतेस,‘माझ्या पित्या, माझ्या तरुणपणापासून तूच माझा साथीदार आहेस!+  ५  कोणी कायम मनात राग धरतो का? कोणी नेहमी मनात कटुता बाळगतो का?’ तू असं बोलतेस खरं,पण तुला जितकी वाईट कामं करता येतात, तितकी तू करत राहतेस.”+ ६  योशीया+ राजाच्या काळात, यहोवा मला म्हणाला: “‘या अविश्‍वासू स्त्रीने, इस्राएलने काय-काय केलंय हे तू पाहिलंस का? तिने प्रत्येक उंच डोंगरावर जाऊन आणि प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली जाऊन व्यभिचार केलाय.+ ७  तिने इतकी वाईट कामं करूनसुद्धा मी तिला माझ्याकडे बोलवत राहिलो.+ पण ती काही माझ्याकडे परत आली नाही. आणि यहूदा आपल्या या विश्‍वासघातकी बहिणीचं वागणं बघत होती.+ ८  मी हे पाहिलं, तेव्हा अविश्‍वासू इस्राएलला मी सोडचिठ्ठी+ देऊन पाठवून दिलं. कारण तिने व्यभिचार केला.+ पण तिची विश्‍वासघातकी बहीण यहूदा ही मात्र घाबरली नाही. तिनेसुद्धा जाऊन व्यभिचार केला.+ ९  तिने आपल्या व्यभिचाराला हलकं समजलं. ती देश भ्रष्ट करत राहिली, आणि दगडांची व झाडांची पूजा करून व्यभिचार करत राहिली.+ १०  एवढं सगळं होऊनही, तिची विश्‍वासघातकी बहीण यहूदा पूर्ण मनाने माझ्याकडे परत वळली नाही; माझ्याकडे परत येत असल्याचा तिने फक्‍त दिखावा केला,’ असं यहोवा म्हणतो.” ११  मग यहोवा मला म्हणाला: “विश्‍वासघातकी यहूदाच्या मानाने अविश्‍वासू इस्राएल कमी दोषी आहे.+ १२  म्हणून आता तू उत्तरेकडे जा आणि अशी घोषणा कर:+ ‘यहोवा म्हणतो, “हे बंडखोर इस्राएल, माझ्याकडे परत ये.”’+ ‘“मी तुझ्याकडे रागाने बघणार नाही.+ कारण मी एकनिष्ठ देव आहे,” असं यहोवा म्हणतो.’ ‘“मी तुझ्याबद्दल कायम मनात राग धरणार नाही. १३  तू फक्‍त आपले अपराध कबूल कर. कारण तू तुझ्या देवाविरुद्ध, यहोवाविरुद्ध बंड केलंय. तू प्रत्येक हिरव्यागार झाडाखाली परक्यांसोबत* संबंध ठेवलेस, आणि माझं ऐकलं नाहीस,” असं यहोवा म्हणतो.’” १४  “बंडखोर मुलांनो, माझ्याकडे परत या,” असं यहोवा म्हणतो. “मीच तुमचा खरा मालक* आहे. मी प्रत्येक शहरातून एक आणि प्रत्येक घराण्यातून दोन असं तुम्हाला गोळा करीन, आणि सीयोनमध्ये घेऊन येईन.+ १५  मी तुम्हाला असे मेंढपाळ देईन, जे माझ्या इच्छेप्रमाणे वागतील.+ ते तुम्हाला चारा म्हणून ज्ञान आणि सखोल समज देतील. १६  त्या दिवसांत, तुमची संख्या वाढत जाईल आणि तुम्ही अगणित व्हाल,” असं यहोवा म्हणतो.+ “यापुढे पुन्हा कधी तुम्ही ‘यहोवाच्या कराराची पेटी!’ असं म्हणणार नाही. तुम्हाला त्या पेटीची कधी आठवण होणार नाही, तुम्हाला तिची कमी भासणार नाही किंवा तिचा विचार परत कधी तुमच्या मनात येणार नाही. आणि ती पेटी परत कधी बनवली जाणार नाही. १७  त्या वेळी, यरुशलेमला यहोवाचं राजासन म्हटलं जाईल.+ आणि सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना यहोवाच्या नावाचा गौरव करायला यरुशलेममध्ये एकत्र केलं जाईल.+ पुन्हा कधी ते आपल्या हट्टी आणि दुष्ट मनाप्रमाणे वागणार नाहीत.” १८  “त्या दिवसांत, यहूदाचं घराणं आणि इस्राएलचं घराणं एकत्र मिळून चालेल.+ मी तुमच्या वाडवडिलांना वारसा म्हणून जो देश दिला होता, त्यात ते उत्तरेकडच्या देशातून सोबत मिळून येतील.+ १९  मी विचार केला होता, की ‘मी तुला माझ्या मुलांमध्ये स्थान देईन आणि तुला राष्ट्रांमधला सगळ्यात सुंदर देश वारसा म्हणून देईन.’+ मला असंही वाटलं होतं, की तू मला पिता म्हणून हाक मारशील, आणि माझ्यामागे चालायचं सोडणार नाहीस. २०  ‘पण हे इस्राएल, एखादी बायको जशी आपल्या नवऱ्‍याचा विश्‍वासघात करून त्याला सोडून जाते, तसं तूही माझा विश्‍वासघात केला आहेस,’+ असं यहोवा म्हणतो.” २१  उजाड टेकड्यांवर आवाज ऐकू येत आहे,इस्राएली लोकांच्या रडण्याचा आणि विनवणी करण्याचा तो आवाज आहे. कारण त्यांनी वाकडा मार्ग निवडला आहे,आणि ते आपल्या देवाला, यहोवाला विसरून गेले आहेत.+ २२  “हे बंडखोर मुलांनो, माझ्याकडे परत या. मी तुम्हाला बरं करीन आणि पुन्हा कधीच तुम्ही बंडखोरपणे वागणार नाहीत.”+ “बघ, आम्ही तुझ्याकडे परत आलो आहोत. कारण हे यहोवा, तू आमचा देव आहेस.+ २३  टेकड्यांवरचा आणि डोंगरांवरचा गोंधळ हा सगळा खोटा ठरलाय.+ खरंच, आमचा देव यहोवा हाच इस्राएलचं तारण करणारा आहे.+ २४  पण, आमच्या तरुणपणापासून त्या लज्जास्पद दैवताने आमच्या वाडवडिलांनी केलेली सगळी मेहनत खाऊन टाकली आहे;+त्याने त्यांचे कळप आणि गुरंढोरं,त्यांची मुलं आणि मुली हे सगळं खाऊन टाकलं आहे. २५  आपण लज्जित होऊन खाली लोळायला हवं,आणि स्वतःला आपल्या बदनामीने झाकायला हवं. कारण आपल्या तरुणपणापासून आजपर्यंत,आपण आणि आपल्या वडिलांनी+ आपला देव यहोवा याच्याविरुद्ध पाप केलंय.+ शिवाय आपण आपल्या देवाचं, यहोवाचं ऐकलेलं नाही.”

तळटीपा

किंवा “परक्या दैवतांसोबत.”
किंवा कदाचित, “पती.”