यिर्मया ३०:१-२४
-
बरं करण्याची आणि पुनर्वसन करण्याची अभिवचनं (१-२४)
३० यिर्मयाला यहोवाकडून जो संदेश मिळाला, तो हा:
२ “इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ‘मी ज्या गोष्टी तुला सांगतोय, त्या सगळ्या एका पुस्तकात लिही.
३ कारण यहोवा म्हणतो, “बघ! असे दिवस येत आहेत, जेव्हा बंदिवासात असलेल्या इस्राएलच्या आणि यहूदाच्या माझ्या लोकांना मी गोळा करीन.”+ यहोवा म्हणतो, “जो देश मी त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्या देशात मी त्यांना परत घेऊन येईन आणि ते पुन्हा तिथे राहतील.”’”+
४ यहोवाने इस्राएल आणि यहूदाला जो संदेश दिला, तो हा:
५ यहोवा असं म्हणतो,“भीतीने किंकाळ्या फोडण्याचा आवाज ऐकू आलाय;सगळीकडे दहशत आहे, आणि कुठेही शांती नाही.
६ जरा विचारा, पुरुष कधी बाळाला जन्म देऊ शकतो का?
मग मला प्रत्येक शक्तिशाली पुरुष एखाद्या गर्भवती स्त्रीसारखा पोटावर* हात ठेवलेला का दिसतोय?+
प्रत्येकाचा चेहरा फिका का पडलाय?
७ खरंच, तो दिवस किती भयानक असेल!+
त्याच्यासारखा दुसरा दिवस नाही.
याकोबसाठी तो संकटाचा काळ असेल,पण तरी त्याला त्यातून वाचवलं जाईल.”
८ सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, “त्या दिवशी मी त्यांच्या मानेवर असलेलं जू मोडून टाकीन आणि त्यांच्या पट्ट्यांचे दोन तुकडे करीन. त्यानंतर परके* लोक पुन्हा कधीच त्यांना आपले गुलाम बनवणार नाहीत.
९ ते आपला देव यहोवा याची सेवा करतील. आणि मी त्यांच्यासाठी ज्याला नेमीन त्या त्यांच्या राजाची, दावीदचीही ते सेवा करतील.”+
१० यहोवा म्हणतो, “हे याकोब, माझ्या सेवका! तू घाबरू नकोस.
आणि हे इस्राएल! तू भिऊ नकोस.+
कारण तू जरी दूर असलास, तरी मी तुला वाचवीन,आणि तुझ्या वंशजांना बंदिवासातल्या देशातून सोडवीन.+
याकोब परत येईल. त्याला घाबरवणारा कोणीही नसेल; तो सुखशांतीत राहील.”+
११ यहोवा म्हणतो, “कारण तुझा बचाव करायला मी तुझ्यासोबत आहे.
ज्या सर्व राष्ट्रांमध्ये मी तुझी पांगापांग केली, त्यांचा मी समूळ नाश करीन;+पण तुझा मात्र मी समूळ नाश करणार नाही.+
मी तुला योग्य प्रमाणात शिस्त लावीन.*
आणि मी तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.”+
१२ कारण यहोवा असं म्हणतो:
“तुझ्या* जखमांसाठी कोणताही इलाज नाही.+
तुझे घाव बरे होऊ शकत नाहीत.
१३ तुझी बाजू मांडणारा कोणीही नाही,तुझ्या जखमा काही केल्या बऱ्या होऊ शकत नाहीत.
तुझ्यासाठी कोणताही उपचार नाही.
१४ तुझे सगळे प्रियकर तुला विसरून गेलेत.+
ते आता तुला विचारतही नाहीत.
एखाद्या शत्रूसारखा मी तुझ्यावर वार केलाय.+
एखाद्या निर्दयी माणसासारखी मी तुला शिक्षा केली आहे,कारण तू मोठमोठे अपराध आणि अनेक पापं केली आहेत.+
१५ तुला झालेल्या जखमांमुळे आता का रडतेस?
तुझ्या वेदनांवर काहीच उपाय नाही!
तू केलेल्या मोठमोठ्या अपराधांमुळे आणि अनेक पापांमुळेच,+मी तुझी अशी अवस्था केली आहे.
१६ तुझा नाश करणाऱ्यांचा नक्कीच नाश केला जाईल,+तुझे सगळे शत्रूही बंदिवासात जातील.+
तुला लुबाडणाऱ्यांना लुबाडलं जाईल,आणि तुझी लूटमार करणाऱ्या सगळ्यांना मी लूटमार करणाऱ्यांच्या हाती देईन.”+
१७ यहोवा म्हणतो, “त्यांनी तुला ‘कोणीही विचारत नसलेली सीयोन’ असं म्हणून टाकून दिलं.+
पण मी तुला बरं करीन आणि तुझ्या जखमा भरून काढीन.”+
१८ यहोवा असं म्हणतो:
“पाहा! मी याकोबच्या तंबूंमधल्या लोकांना बंदिवासातून गोळा करीन,+मी त्याच्या वस्तीस्थानांवर दया करीन.
शहर पुन्हा त्याच्या टेकडीवर उभारलं जाईल,+आणि मजबूत मनोरा आपल्या योग्य ठिकाणी उभा केला जाईल.
१९ त्यांच्यामधून उपकारस्तुतीचा आणि आनंदोत्सवाचा आवाज ऐकू येईल.+
मी त्यांची संख्या वाढवीन, ती कमी होणार नाही;+मी त्यांची संख्या अगणित करीन,*आणि त्यांना तुच्छ समजलं जाणार नाही.+
२० याकोबच्या वंशजांची पूर्वीसारखीच भरभराट होईल.
त्याच्या वंशजांपासून मी एक मजबूत राष्ट्र बनवीन.+
आणि त्याचा छळ करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.+
२१ त्याचा वैभवशाली शासक त्याच्या लोकांपैकीच असेल,तो त्याच्या लोकांमधूनच येईल.
मी त्याला माझ्याजवळ बोलवीन, आणि तो माझ्याजवळ येईल.
नाहीतर माझ्यासमोर यायची हिंमत कोणात आहे?” असं यहोवा म्हणतो.
२२ “तुम्ही माझे लोक व्हाल,+ आणि मी तुमचा देव होईन.”+
२३ पाहा! यहोवाच्या क्रोधाचं भयानक वादळ सुटेल;+गरगर फिरणाऱ्या वावटळीसारखं ते दुष्ट लोकांच्या डोक्यावर येऊन आदळेल.
२४ जोपर्यंत यहोवा आपल्या मनात ठरवलेल्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करत नाही,तोपर्यंत त्याचा जळजळीत क्रोध शांत होणार नाही.+
शेवटच्या काळात तुम्हाला या गोष्टी स्पष्टपणे कळतील.+
तळटीपा
^ किंवा “कंबरेवर.”
^ किंवा “विदेशी.”
^ किंवा “सुधारीन.”
^ हे सीयोनला उद्देशून म्हटलंय.
^ किंवा कदाचित, “मी त्यांना सन्मानित करीन.”