यिर्मया ३१:१-४०

  • इस्राएलचे उरलेले लोक देशात पुन्हा वस्ती करतील (१-३०)

    • राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे (१५)

  • एक नवीन करार (३१-४०)

३१  यहोवा म्हणतो: “त्या वेळी, मी इस्राएलच्या सगळ्या घराण्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+  २  यहोवा म्हणतो, “तलवारीपासून वाचलेल्या लोकांना ओसाड रानात देवाची कृपा मिळाली. इस्राएल आपल्या विसाव्याच्या ठिकाणी चालला होता.”  ३  यहोवा दुरून आला आणि त्याने मला दर्शन दिलं. तो मला म्हणाला: “मी कायम तुझ्यावर प्रेम करत आलोय. आणि एकनिष्ठ प्रेमाने मी तुला जवळ घेतलंय.*+  ४  हे इस्राएलच्या कुमारी, मी तुला परत उभारीन आणि तू पुन्हा उभी केली जाशील.+ तू पुन्हा आपल्या हातांत डफ घेशील,आणि आनंदाने नाचत बाहेर पडशील.+  ५  तू शोमरोनच्या डोंगरांवर पुन्हा द्राक्षमळे लावशील;+जे द्राक्षमळे लावतील तेच त्यांचं फळ खातील.+  ६  कारण असा एक दिवस येईल, जेव्हा एफ्राईमच्या डोंगरांवरचे पहारेकरी अशी हाक मारतील: ‘चला, आपण सीयोनकडे जाऊ; आपला देव यहोवा याच्याकडे जाऊ.’”+  ७  कारण यहोवा असं म्हणतो: “तुम्ही याकोबसाठी मोठ्या आनंदाने गीत गा. आनंदाने जयजयकार करा, कारण सर्व राष्ट्रांमध्ये तुम्ही सगळ्यात पुढे आहात.+ संदेशाची घोषणा करा; देवाची स्तुती करा आणि म्हणा,‘हे यहोवा! तुझ्या लोकांना वाचव, इस्राएलच्या उरलेल्या लोकांना वाचव.’+  ८  मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून परत आणतोय.+ पृथ्वीच्या अगदी दुर्गम भागांतून मी त्यांना गोळा करतोय.+ त्यांच्यामध्ये आंधळे आणि लंगडे असतील;+तसंच, गरोदर स्त्रिया आणि प्रसूतीची वेळ जवळ आलेल्या स्त्रियाही त्यांच्यामध्ये असतील. लोकांच्या एका मोठ्या समुदायासारखे ते सगळे इथे परत येतील.+  ९  ते रडत परत येतील.+ ते दयेची भीक मागत असताना मी त्यांना घेऊन येईन. त्यांना ठेच लागणार नाही अशा सपाट रस्त्यावरून,मी त्यांना पाण्याच्या झऱ्‍यांकडे नेईन.+ कारण मी इस्राएलचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.”+ १०  राष्ट्रांनो, यहोवाचा संदेश ऐका,आणि दूरवरच्या बेटांवर अशी घोषणा करा:+ “ज्याने इस्राएली लोकांची पांगापांग केली, तोच त्यांना गोळाही करेल. मेंढपाळ जसा आपल्या कळपाला सांभाळतो, तसा तोही त्यांचा सांभाळ करेल.+ ११  कारण यहोवा याकोबची सुटका करेल,+आणि याकोबपेक्षा शक्‍तिशाली असलेल्याच्या हातून तो त्याला सोडवेल.*+ १२  ते येतील आणि सीयोनच्या उंच ठिकाणावर आनंदाने जयजयकार करतील.+ यहोवाकडून चांगल्या गोष्टी मिळाल्यामुळे* त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद झळकेल;धान्य, नवा द्राक्षारस+ आणि तेलामुळे,तसंच, कळपातल्या आणि गुराढोरांतल्या बछड्यांमुळे त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद झळकेल.+ ते पुन्हा कधीच कमजोर होणार नाहीत,+उलट, ते भरपूर पाणी मिळालेल्या बागेसारखे होतील.”+ १३  “त्या वेळी कुमारी आनंदाने नाचू लागेल,आणि तरुण व वृद्ध माणसंसुद्धा एकत्र नाचतील.+ मी त्यांचा शोक आनंदात बदलून टाकीन.+ मी त्यांचं सांत्वन करीन, आणि त्यांच्या दुःखाच्या बदल्यात त्यांना आनंद देईन.+ १४  मी याजकांना भरपूर अन्‍न देऊन तृप्त करीन,मी दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे माझे लोक तृप्त होतील,”+ असं यहोवा म्हणतो. १५  “यहोवा म्हणतो: ‘रामा+ इथून शोक करण्याचा आणि दुःखाने रडण्याचा आवाज ऐकू येतोय: राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे.+ काही केल्या तिचं सांत्वन होत नाही,कारण तिची मुलं आता नाहीत.’”+ १६  यहोवा तिला म्हणतो: “‘रडू नकोस, आपले अश्रू आवर. कारण तुला तुझ्या कामाचं प्रतिफळ मिळेल. तुझी मुलं शत्रूच्या देशातून परत येतील,’+ असं यहोवा म्हणतो. १७  ‘भविष्यासाठी तुला आशा आहे,’+ असं यहोवा म्हणतो. ‘तुझी मुलं आपल्या प्रदेशात परत येतील.’”+ १८  “मी एफ्राईमचं कण्हणं ऐकलंय,तो म्हणाला, ‘जू वाहण्यासाठी अजून तयार न झालेल्या वासरासारखा मी होतो,पण तू मला सुधारलंस आणि मी सुधरलो. हे यहोवा! तू माझा देव आहेस,म्हणून मला आपल्याकडे वळव आणि मी लगेच वळीन. १९  मला पस्तावा झाला आणि मी तुझ्याकडे परत आलो;+तू मला समजावून सांगितलंस, तेव्हा मी दुःखाने मांडीवर मारून घेतलं. तरुणपणी मी जे केलं, त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटली,आणि मी माझ्याच नजरेत पडलो.’”+ २०  “एफ्राईम माझ्या नजरेत लाखमोलाचा मुलगा नाही का? ते माझं लाडकं मूल नाही का?+ मी जितक्यांदा त्याला फटकारतो, तितक्यांदा मला त्याची आठवणही येते. म्हणूनच माझा जीव त्याच्यासाठी हळहळतो.+ मी नक्की त्याच्यावर दया करीन,” असं यहोवा म्हणतो.+ २१  “हे इस्राएलच्या कुमारी, रस्त्यांवर आपल्यासाठी चिन्हं आणि खुणांचे खांब उभे कर.+ ज्या मार्गाने तुला जायचंय, त्या महामार्गाकडे लक्ष दे.+ हे इस्राएलच्या कुमारी, परत ये! तुझ्या या शहरांकडे परत ये. २२  हे विश्‍वासघात करणाऱ्‍या मुली, तू अजून किती दिवस भटकत राहशील? यहोवाने पृथ्वीवर काहीतरी नवीन केलंय: स्त्री आतुरतेने पुरुषाला शोधेल.” २३  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “मी बंदिवानांना गोळा करून परत आणीन, तेव्हा ते यहूदाच्या देशात आणि त्याच्या शहरांमध्ये पुन्हा असं म्हणतील: ‘हे नीतिमत्त्वाच्या निवासस्थाना,+ हे पवित्र पर्वता,+ यहोवा तुला आशीर्वादित करो!’ २४  आणि यहूदाच्या देशात आणि त्याच्या सगळ्या शहरांत लोकवस्ती होईल; शेतकरी आणि मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे तिथे शांतीने एकत्र राहतील.+ २५  कारण, थकून गेलेल्या प्रत्येक जिवाला मी ताजंतवानं करीन आणि कमजोर झालेल्या प्रत्येकाला मी बळ देईन.”+ २६  त्यानंतर, मला जाग आली आणि मी डोळे उघडले. मला खूप छान झोप लागली होती. २७  यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यातल्या लोकांची संख्या वाढवीन आणि त्यांच्या प्राण्यांची भरभराट करीन.”+ २८  “आणि मी जसं त्यांना उपटून टाकायला, खाली पाडायला, मोडून टाकायला, त्यांचा नाश करायला आणि त्यांचं नुकसान करायला त्यांच्यावर नजर ठेवून होतो,+ तसंच त्यांना पुन्हा रोवायला आणि पुन्हा उभारायला मी त्यांच्यावर नजर ठेवीन,”+ असं यहोवा म्हणतो. २९  “त्या दिवसांत ते परत कधी असं म्हणणार नाहीत: ‘आंबट द्राक्षं वडिलांनी खाल्ली, पण दात मात्र मुलांचे आंबले.’+ ३०  उलट, जो आंबट द्राक्षं खाईल त्याचेच दात आंबतील. प्रत्येक जण स्वतःच्याच अपराधामुळे मरेल.” ३१  यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्यासोबत आणि यहूदाच्या घराण्यासोबत एक नवीन करार करीन.+ ३२  मी त्यांच्या वाडवडिलांचा हात धरून त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या दिवशी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार नसेल.+ ‘मीच त्यांचा खरा मालक* होतो, पण तरीसुद्धा त्यांनी माझा तो करार मोडला,’+ असं यहोवा म्हणतो.” ३३  यहोवा म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएलच्या घराण्याशी असा करार करीन: मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन+ आणि ते नियम त्यांच्या हृदयावर लिहीन.+ मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”+ ३४  “यापुढे कोणीही आपल्या शेजाऱ्‍याला किंवा आपल्या भावाला असं म्हणून शिकवणार नाही, की ‘यहोवाची ओळख करून घे!’+ कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मला ओळखतील,”+ असं यहोवा म्हणतो. “मी त्यांचे अपराध माफ करीन, आणि त्यांची पापं पुन्हा कधीच लक्षात ठेवणार नाही.”+ ३५  ज्याने दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य बनवला,आणि रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्राला व ताऱ्‍यांना नियम घालून दिले;जो समुद्राची उलथापालथ करतो आणि त्याच्या लाटांना उसळायला लावतो,ज्याचं नाव सैन्यांचा देव यहोवा आहे, तो यहोवा असं म्हणतो:+ ३६  “‘हे नियम जसे कायम टिकून राहतील,तसं एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे वंशज कायम माझ्यासमोर टिकून राहतील,’ असं यहोवा म्हणतो.”+ ३७  यहोवा म्हणतो: “‘जसं आकाशाचं मोजमाप करणं शक्य नाही आणि जसं पृथ्वीच्या पायाचा शोध लावणं शक्य नाही, तसं इस्राएलच्या वंशजांनी केलेल्या वाईट कामांमुळे मी त्या सगळ्यांचा त्याग करणं शक्य नाही,’ असं यहोवा म्हणतो.”+ ३८  यहोवा म्हणतो: “पाहा! असे दिवस येत आहेत, जेव्हा यहोवासाठी हे शहर हनानेलच्या बुरुजापासून+ कोपऱ्‍याच्या दरवाजापर्यंत+ बांधलं जाईल.+ ३९  आणि मोजमाप करायची दोरी+ थेट गारेबच्या टेकडीपर्यंत जाईल आणि तिथून पुढे गवाथकडे वळेल. ४०  आणि प्रेतांचं व राखेचं* संपूर्ण खोरं, तसंच किद्रोन खोऱ्‍यापर्यंतची+ आणि पूर्वेकडे ‘घोडा फाटकाच्या’+ कोपऱ्‍यापर्यंतची सगळी शेतं यहोवासाठी पवित्र असतील.+ ती पुन्हा कधीच उद्ध्‌वस्त होणार नाहीत किंवा त्यांचा कधीही नाश होणार नाही.”

तळटीपा

किंवा “मी तुझ्यावर एकनिष्ठ प्रेम करत आलोय.”
किंवा “परत मिळवेल.”
किंवा “यहोवाच्या चांगुलपणामुळे.”
किंवा कदाचित, “पती.”
किंवा “चरबीयुक्‍त राखेचं,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेल्या राखेचं.