यिर्मया ३२:१-४४

  • यिर्मया शेत विकत घेतो (१-१५)

  • यिर्मयाची प्रार्थना (१६-२५)

  • यहोवाचं उत्तर (२६-४४)

३२  यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्या शासनकाळाच्या १० व्या वर्षी, म्हणजे नबुखद्‌नेस्सर राजाच्या शासनकाळाच्या १८ व्या वर्षी यिर्मयाला यहोवाकडून संदेश मिळाला.+ २  त्या वेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला होता. आणि यिर्मया हा यहूदाच्या राजाच्या महालात, ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ कैद होता.+ ३  कारण यहूदाचा राजा सिद्‌कीया याने त्याला कैद केलं होतं.+ तो यिर्मयाला म्हणाला, “तू अशी भविष्यवाणी का करतोस? तू म्हणतोस: ‘यहोवा असं म्हणाला, की “मी हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती देईन आणि तो त्यावर कब्जा करेल.+ ४  आणि यहूदाचा राजा सिद्‌कीया हा खास्दी लोकांच्या हातून सुटणार नाही. तो नक्की बाबेलच्या राजाच्या हाती दिला जाईल. सिद्‌कीया आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील आणि प्रत्यक्ष त्याच्याशी बोलेल.”’+ ५  यहोवा म्हणतो, ‘बाबेलचा राजा हा सिद्‌कीयाला बाबेलला घेऊन जाईल. आणि जोपर्यंत मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत त्याला तिथेच राहावं लागेल. तुम्ही जरी खास्दी लोकांशी लढत राहिलात, तरी तुम्ही जिंकणार नाहीत.’”+ ६  यिर्मया म्हणाला, “मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ७  ‘तुझे काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि तुला म्हणेल, “अनाथोथमधलं+ माझं शेत विकत घे. कारण ते विकत घ्यायचा* पहिला हक्क तुझा आहे.”’”+ ८  मग यहोवाने सांगितलं होतं तसंच झालं. माझा चुलत भाऊ हानामेल ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’ माझ्याकडे आला आणि मला म्हणाला: “बन्यामीनच्या प्रदेशात अनाथोथमध्ये असलेलं माझं शेत कृपा करून विकत घे. कारण, ते विकत घ्यायचा आणि ते सोडवण्याचा हक्क तुझ्याकडे आहे. तू ते आपल्यासाठी विकत घे.” तेव्हा मला कळलं, की हे यहोवाच्याच इच्छेने होत आहे. ९  म्हणून मग, मी माझा चुलत भाऊ हानामेल याच्याकडून अनाथोथमधलं त्याचं शेत विकत घेतलं. मी त्याला सात शेकेल* आणि दहा चांदीचे तुकडे तोलून दिले.+ १०  मग मी खरेदीखत तयार केलं,+ त्यावर मोहर लावली, साक्षीदारांना बोलावलं+ आणि तराजूत पैसे तोलले. ११  नंतर, मी त्या खरेदीखताच्या दोन्ही प्रती घेतल्या; म्हणजे नियमाप्रमाणे व कायद्याप्रमाणे मोहरबंद केलेली एक प्रत, आणि मोहरबंद नसलेली दुसरी प्रत. १२  आणि त्या प्रती मी महसेयाचा नातू, म्हणजे नेरीयाचा+ मुलगा बारूख+ याला दिल्या; माझा चुलत भाऊ हानामेल याच्यासमोर, तसंच खरेदीखतावर सही करणाऱ्‍या साक्षीदारांसमोर आणि ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ बसलेल्या सगळ्या यहुद्यांसमोर मी त्या त्याला दिल्या. १३  मग मी त्यांच्यासमोर बारूखला अशी आज्ञा दिली, १४  “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘खरेदीखताच्या या दोन्ही प्रती, म्हणजे मोहरबंद असलेली आणि मोहरबंद नसलेली प्रत घे आणि एका मातीच्या भांड्यात ठेव, म्हणजे त्या बऱ्‍याच दिवस टिकून राहतील.’ १५  कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘या देशात घरंदारं, शेतीवाडी आणि द्राक्षमळे पुन्हा विकत घेतली जातील.’”+ १६  मग नेरीयाचा मुलगा बारूख याला खरेदीखत दिल्यावर मी यहोवाला प्रार्थना केली; मी म्हणालो: १७  “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! बघ, तू तुझ्या अफाट सामर्थ्याने आणि तुझ्या शक्‍तिशाली हाताने आकाश आणि पृथ्वी बनवली.+ तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही. १८  तू हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करतोस; पण, वडिलांच्या अपराधांबद्दल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांना शिक्षाही करतोस.+ तूच खरा, महान आणि शक्‍तिशाली देव आहेस. सैन्यांचा देव यहोवा हे तुझं नाव आहे. १९  तुझे उद्देश अद्‌भुत आणि तुझी कार्यं महान आहेत.+ तू माणसांची सगळी कामं पाहतोस+ आणि प्रत्येकाला त्याच्या कामांप्रमाणे आणि वागणुकीप्रमाणे मोबदला देतोस.+ २०  तू इजिप्तमध्ये अनेक चिन्हं आणि चमत्कार केलेस. ते आजपर्यंत लोकांना माहीत आहेत. अशा प्रकारे, तू इस्राएलमध्ये आणि सर्व मानवांमध्ये आपलं नाव महान केलंस,+ आणि आजही ते महान आहे. २१  तू इजिप्तमध्ये चिन्हं, चमत्कार आणि दहशत निर्माण करणारी कार्यं केलीस; आणि आपल्या महान सामर्थ्याने, शक्‍तिशाली हाताने तू तुझ्या इस्राएली लोकांना तिथून बाहेर आणलंस.+ २२  मग तू त्यांना हा देश दिलास; त्यांच्या वाडवडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे दूध आणि मध वाहत असलेला हा देश+ तू त्यांना दिलास.+ २३  त्यांनी येऊन या देशाचा ताबा घेतला. पण त्यांनी तुझं ऐकलं नाही आणि तुझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत. तू त्यांना जे काही सांगितलं होतंस, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही. आणि म्हणून तू ही सगळी संकटं त्यांच्यावर येऊ दिलीस.+ २४  बघ! सैन्याने शहराला वेढा घातलाय. शहर काबीज करण्यासाठी त्यांनी शहराभोवती दगडमातीचा ढिगारा उभारलाय.+ हे शहर तलवारीमुळे,+ दुष्काळामुळे आणि रोगराईमुळे+ हल्ला करणाऱ्‍या खास्दी लोकांच्या हातात नक्कीच पडेल; तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली आहे, आणि तुला हे दिसतच आहे. २५  हे सर्वोच्च प्रभू यहोवा, हे शहर तर नक्कीच खास्दी लोकांच्या हाती पडणार आहे. मग तू मला असं का म्हणालास की, ‘पैसे देऊन शेत विकत घे आणि साक्षीदारांना बोलव?’” २६  त्यावर यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २७  “बघ! मी यहोवा, सगळ्या मानवजातीचा देव आहे. माझ्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य आहे का? २८  म्हणून यहोवा असं म्हणतो, ‘पाहा, मी हे शहर खास्दी लोकांच्या आणि बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती देतोय आणि तो या शहरावर कब्जा करेल.+ २९  आणि या शहराविरुद्ध लढणारे खास्दी लोक आत घुसतील आणि शहराला आग लावून ते भस्म करतील.+ तसंच, ज्या घरांच्या छतांवर लोकांनी बआल दैवतासाठी बलिदानं दिली व इतर दैवतांसाठी पेयार्पणं ओतली आणि माझा क्रोध भडकवला, ती सगळी घरंही जळून खाक होतील.’+ ३०  ‘कारण इस्राएल आणि यहूदाचे लोक त्यांच्या तरुणपणापासून माझ्या नजरेत जे वाईट तेच करत आलेत.+ इस्राएलचे लोक वाईट कामं करून माझा क्रोध भडकवत राहतात,’ असं यहोवा म्हणतो. ३१  ‘हे शहर बांधण्यात आलं तेव्हापासून आजपर्यंत या शहराने नेहमीच माझा राग, माझा क्रोध भडकवलाय.+ म्हणून मी या शहराला माझ्या नजरेसमोरून दूर करतोय.+ ३२  इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी पुष्कळ वाईट कामं करून माझा क्रोध भडकवलाय; त्यांनी, त्यांच्या राजांनी,+ अधिकाऱ्‍यांनी,+ याजकांनी, संदेष्ट्यांनी+ आणि यहूदाच्या व यरुशलेमच्या माणसांनी माझा क्रोध भडकवल्यामुळे मी या शहराला माझ्या नजरेसमोरून दूर करतोय. ३३  माझ्याकडे तोंड करण्याऐवजी त्यांनी नेहमीच माझ्याकडे पाठ फिरवली.+ मी त्यांना शिकवण्याचा वारंवार प्रयत्न करत राहिलो, पण एकानेही माझं ऐकलं नाही; कोणीही माझी शिस्त स्वीकारली नाही.+ ३४  तसंच, माझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या मंदिरात आपल्या घृणास्पद मूर्ती ठेवून त्यांनी ते अशुद्ध केलं.+ ३५  शिवाय, त्यांनी बआलसाठी ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’*+ उच्च स्थानं बांधली; आपल्या मुला-मुलींचा मोलखपुढे आगीत होम करण्यासाठी त्यांनी ती बांधली.+ पण असं काही करायची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती,+ किंवा असला विचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नव्हता. असलं घृणास्पद कृत्य करून त्यांनी यहूदाला पाप करायला लावलं.’ ३६  म्हणून ज्या शहराविषयी तुम्ही असं म्हणता, की ते तलवारीमुळे, दुष्काळामुळे आणि रोगराईमुळे बाबेलच्या राजाच्या हाती दिलं जाईल, त्या शहराविषयी इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो, ३७  ‘पाहा! मी माझ्या रागामुळे, क्रोधामुळे आणि भयंकर संतापामुळे ज्या सर्व देशांमध्ये त्यांची पांगापांग केली, तिथून त्या सगळ्यांना गोळा करून+ मी परत या ठिकाणी आणीन आणि ते इथे सुरक्षित राहतील.+ ३८  ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.+ ३९  त्यांनी कायम माझं भय बाळगावं, म्हणून मी त्यांचं मन एक करीन+ आणि त्या सगळ्यांना एकाच मार्गावर चालवीन. त्यामुळे त्यांचं आणि त्यांच्यामागे त्यांच्या मुलाबाळांचं भलं होईल.+ ४०  मी त्यांच्यासोबत सर्वकाळ टिकणारा करार करीन.+ तो असा, की त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करायचं मी कधीच सोडणार नाही.+ त्यांनी माझ्यापासून बहकू नये, म्हणून मी त्यांच्या मनात माझं भय निर्माण करीन.+ ४१  त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यात मला खूप आनंद वाटेल.+ मी त्यांना मनापासून, अगदी अंतःकरणापासून या देशात कायमचं रुजवीन.’”+ ४२  “यहोवा म्हणतो, ‘मी जसं या लोकांवर हे मोठं संकट आणलं, तसंच मी त्यांना चांगल्या गोष्टी देण्याचं माझं वचनही पूर्ण करीन.+ ४३  तुम्ही म्हणता, “हा देश ओसाड आहे. इथे एकही माणूस किंवा प्राणी नाही. आणि हा खास्द्यांच्या हाती देण्यात आलाय.” पण, याच देशात पुन्हा शेतांची खरेदी केली जाईल.’+ ४४  ‘बन्यामीनच्या प्रदेशात,+ यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत, यहूदाच्या शहरांत,+ डोंगराळ प्रदेशातल्या शहरांत, सखल प्रदेशातल्या शहरांत आणि दक्षिणेकडच्या शहरांत पैसे देऊन शेतांची खरेदी केली जाईल. खरेदीखतं तयार करून ती मोहरबंद केली जातील आणि साक्षीदारांना बोलावलं जाईल.+ कारण बंदी बनवून नेलेल्या लोकांना मी परत घेऊन येईन,’+ असं यहोवा म्हणतो.”

तळटीपा

शब्दशः “सोडवण्याचा.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
शब्दार्थसूचीत “गेहेन्‍ना” पाहा.