यिर्मया ३३:१-२६

  • पुनर्वसन करण्याची अभिवचनं (१-१३)

  • ‘नीतिमान अंकुराच्या’ राज्यात सुरक्षा (१४-१६)

  • दावीद आणि याजक यांच्यासोबत करार (१७-२६)

    • दिवस आणि रात्र यांबद्दलचा करार (२०)

३३  यिर्मया अजूनही ‘पहारेकऱ्‍यांच्या अंगणात’+ कैद होता. त्या वेळी, त्याला यहोवाकडून दुसऱ्‍यांदा असा संदेश मिळाला: २  “पृथ्वी निर्माण करणारा यहोवा, ती घडवणारा आणि तिला स्थिर करणारा यहोवा, ज्याचं नाव यहोवा आहे तो असं म्हणतो, ३  ‘मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. मी तुला मोठ्या आनंदाने अशा गोष्टी सांगीन ज्या अद्‌भुत आणि समजण्यापलीकडे आहेत; अशा गोष्टी ज्या तुला माहीत नाहीत.’”+ ४  “मी यहोवाने, इस्राएलच्या देवाने, यहूदाच्या राजांच्या पाडून टाकण्यात आलेल्या घरांबद्दल आणि या शहरातल्या पाडून टाकण्यात आलेल्या घरांबद्दल एक संदेश दिलाय; शहराभोवती चढ तयार करून तलवारीने हल्ला करायला येणाऱ्‍या सैन्यापासून रक्षण व्हावं, म्हणून जी घरं पाडून टाकण्यात आली त्या घरांबद्दल हा संदेश आहे.+ ५  तसंच, खास्दी लोकांशी लढायला येणाऱ्‍या लोकांबद्दलही, म्हणजे ज्यांना मी माझ्या क्रोधाने आणि संतापाने मारून टाकलं आणि ज्यांच्या प्रेतांनी ही ठिकाणं भरून गेली, आणि ज्यांच्या दुष्ट कामांमुळे मी या शहरापासून माझं तोंड फिरवलंय त्या लोकांबद्दलही हा संदेश आहे. तो असा: ६  ‘पाहा! मी यरुशलेम नगरीला बरं करीन आणि तिला चांगलं आरोग्य देईन.+ मी लोकांनाही बरं करीन. मी त्यांना भरपूर शांती देईन आणि सत्य प्रकट करीन.+ ७  मी यहूदाच्या आणि इस्राएलच्या बंदिवानांना परत घेऊन येईन;+ आणि त्यांची स्थिती पहिल्यासारखी चांगली करीन.+ ८  त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या पापांच्या सगळ्या दोषापासून मी त्यांना शुद्ध करीन.+ आणि त्यांनी माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या पापांची आणि अपराधांची मी त्यांना क्षमा करीन.+ ९  या नगरीचं नाव ऐकून मला अतिशय आनंद होईल. मी तिच्यासाठी ज्या सर्व चांगल्या गोष्टी करीन त्यांबद्दल ऐकून पृथ्वीवरची सगळी राष्ट्रं माझी स्तुती आणि सन्मान करतील.+ मी तिच्यासाठी ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी करीन आणि तिला जी शांती देईन,+ त्यामुळे सर्व राष्ट्रं घाबरतील आणि त्यांचा थरकाप उडेल.’”+ १०  “यहोवा म्हणतो: ‘तुम्ही म्हणाल, की ही जागा ओसाड झाली आहे. इथे एकही माणूस किंवा प्राणी नाही. यहूदातली शहरं आणि यरुशलेममधले रस्ते सामसूम पडले आहेत; तिथे ना माणूस राहतो ना प्राणी. पण तिथे पुन्हा एकदा ११  आनंदोत्सवाचा आवाज आणि वधू-वरासोबत आनंद साजरा करण्याचा आवाज ऐकू येईल.+ तसंच, तिथे असं म्हणणाऱ्‍यांचाही आवाज ऐकू येईल: “सैन्यांचा देव यहोवा याचे आभार माना! कारण यहोवा चांगला आहे.+ त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम टिकून राहतं!”’+ यहोवा म्हणतो, ‘मी या देशातल्या बंदिवानांना परत घेऊन येईन आणि त्यांची स्थिती आधीसारखीच चांगली करीन. तेव्हा ते यहोवाच्या मंदिरात उपकारस्तुतीची अर्पणं घेऊन येतील.’”+ १२  “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘एकही माणूस किंवा प्राणी नसलेल्या या ओसाड देशात आणि इथल्या सगळ्या शहरांमध्ये पुन्हा एकदा हिरवीगार कुरणं पाहायला मिळतील. आणि मेंढरांना विसावा मिळावा म्हणून मेंढपाळ त्यांना तिथे नेतील.’+ १३  ‘डोंगराळ प्रदेशातल्या शहरांत, सखल प्रदेशातल्या शहरांत, दक्षिणेकडच्या शहरांत, बन्यामीनच्या प्रदेशात, यरुशलेमच्या आसपासच्या प्रदेशांत+ आणि यहूदाच्या शहरांत+ मेंढरांचे कळप पुन्हा एकदा त्यांना मोजणाऱ्‍या मेंढपाळांच्या हातांखालून जातील,’ असं यहोवा म्हणतो.” १४  “यहोवा म्हणतो: ‘पाहा! असे दिवस येत आहेत जेव्हा मी इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यांचं भलं करण्याचं जे अभिवचन दिलं होतं, ते मी पूर्ण करीन.+ १५  त्या दिवसांत आणि त्या काळात दावीदसाठी एक नीतिमान अंकुर* फुटेल असं मी करीन.+ तो न्यायाने आणि नीतीने देशात शासन करेल.+ १६  त्या दिवसांत, यहूदाचा बचाव होईल+ आणि यरुशलेम नगरी सुरक्षित राहील.+ आणि तिला, ‘यहोवा आमचं नीतिमत्त्व,’ या नावाने ओळखलं जाईल.’”+ १७  “कारण यहोवा म्हणतो: ‘असं कधीही होणार नाही, की इस्राएलच्या घराण्याच्या राजासनावर बसायला दावीदच्या वंशाचा एकही पुरुष नाही.+ १८  तसंच, माझ्यासमोर उभं राहून होमार्पण द्यायला, अन्‍नार्पणांचं हवन करायला आणि इतर बलिदानं द्यायला लेवीय याजकांपैकी एकही पुरुष नाही, असंही कधी होणार नाही.’” १९  यिर्मयाला यहोवाकडून परत एकदा असा संदेश मिळाला: २०  “यहोवा असं म्हणतो: ‘दिवसाने आणि रात्रीने आपल्या ठरावीक वेळी यावं यासाठी मी जो करार केलाय तो जर तुम्ही मोडू शकलात,+ २१  तरच माझा सेवक दावीद याच्याशी मी केलेला करार मोडला जाईल,+ आणि त्याच्या राजासनावर बसायला त्याच्या मुलांपैकी एकही मुलगा नसेल.+ तसंच, मी माझ्या सेवकांशी, म्हणजे लेवीय याजकांशी केलेला करारही मोडेल.+ २२  ज्याप्रमाणे, आकाशातलं सैन्य मोजलं जाऊ शकत नाही आणि समुद्रकिनाऱ्‍यावरची वाळू मापली जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे मी माझा सेवक दावीद याच्या वंशजांची* आणि माझी सेवा करणारे लेवी यांच्या वंशजांची* संख्या इतकी वाढवीन, की ती मोजली जाऊ शकणार नाही.’” २३  यिर्मयाला यहोवाकडून परत एकदा असा संदेश मिळाला: २४  “हे लोक काय म्हणत आहेत ते तू ऐकलं नाहीस का? ते म्हणतात, ‘यहोवाने जी दोन घराणी निवडलीत, त्यांना तो टाकून देईल.’ ते माझ्या लोकांशी आदराने वागत नाहीत, आणि त्यांना राष्ट्र समजत नाहीत. २५  यहोवा म्हणतो: ‘मी दिवस व रात्र यांविषयी केलेला करार, आणि आकाश व पृथ्वी यांना घालून दिलेले नियम+ जितके पक्के आहेत,+ २६  तितकीच ही गोष्टही पक्की आहे, की याकोब आणि माझा सेवक दावीद यांच्या वंशजाला* मी कधीच टाकणार नाही; मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या वंशजांवर* राज्य करण्यासाठी दावीदच्या वंशजातून* शासकांना निवडत राहीन. कारण मी त्यांच्या बदिवानांना गोळा करून परत आणीन+ आणि त्यांच्यावर दया करीन.’”+

तळटीपा

किंवा “वारस.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “बीज.”